स्वनामत्यागाचे तैवानी दुःख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2021   
Total Views |

Taiwan_1  H x W
 
‘ऑलिम्पिक’मध्ये भाग घेणार्‍या प्रत्येक देशाच्या खेळाडू वा संघाचे आपापल्या क्रीडा प्रकारात सुवर्ण, रौप्य वा कांस्य पदक जिंकून स्वदेशाचे नाव रोशन करण्याचे स्वप्न असते. पदक जिंकल्यानंतर स्वराष्ट्रध्वज फडकताना पाहून, राष्ट्रगीत ऐकून संबंधित खेळाडू वा संघाला अत्यानंद होतो, ऊर अभिमानाने भरून येतो. पण, नेमका हाच सन्मानाचा क्षण चीनच्या दडपशाहीमुळे तैवानला अनुभवता येत नाही, आला नाही. तैवानची प्रमुख ‘वेटलिफ्टर’ कुओ हसिंग-चुन हिने मंगळवारी ‘टोकियो ऑलिम्पिक’ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरले. पण, विजयानंतर ती आपले पदक स्वीकारण्यासाठी पोडियमवर पोहोचली, तर तिथले दृश्य निराळेच होते. एरवी प्रत्येक खेळाडूने वा संघाने पदक जिंकल्यानंतर त्या त्या देशाचा राष्ट्रध्वज फडकावला जातो, राष्ट्रगीत वाजवले जाते. पण, कुओ हसिंग-चुनच्या पदक स्वीकारतेवेळी तिथे ना तैवानचा राष्ट्रध्वज होता, ना तैवानचे राष्ट्रगीत वाजवले गेले. इतकेच नव्हे, तर तैवान स्वतःला ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेमध्ये तैवानदेखील म्हणू शकत नाही. अर्थातच, हा प्रसंग तैवानी नागरिकांसाठी अतिशय वेदनादायक म्हटला पाहिजे. पण, असे का होते? तर जाणून घेऊया त्याबद्दलच.
 
 
 
तैवानला ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास दीर्घ कालावधीपासून त्याच्या विशिष्ट आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे एक ‘होस्ट नेम’ दिलेले आहे. तैवान लोकशाही देश असून त्याची लोकसंख्या २.३ कोटी आहे. तैवानचे स्वतःचे चलन असून सरकारही आहे. तथापि, असे असूनही चीनमुळे तैवानची स्थिती वादग्रस्त झालेली आहे. चीनधील कम्युनिस्ट सरकारचे तैवानवर कधीही नियंत्रण नव्हते, तरी त्याकडे दुर्लक्ष करून चीन तैवानला ‘वन चायना’ धोरणांतर्गत आपलाच प्रदेश मानतो. जागतिक पटलावर तैवानला एकटे पाडण्याचाही चीनचा मनसुबा असून तो अन्य देश वा आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांकडून तैवान शब्दाच्या वापरावर तत्काळ आक्षेपही घेतो. त्यातूनच १९८१ साली आंतरराष्ट्रीय ‘ऑलिम्पिक’ समितीने स्पर्धेसाठी तैवानचे ‘चिनी तैपेई’ नाव निश्चित केले. त्यानुसार तैवानमधील खेळाडू ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत भाग तर घेऊ शकतात. पण, स्वतःला एका सार्वभौम देशाचा घटक म्हणवून घेऊ शकत नाहीत. परिणामी, आपल्या लाल व शुभ्र राष्ट्रध्वजाच्या जागेवर तैवानचे खेळाडू ‘ऑलिम्पिक’मध्ये सहभागी होणार्‍या पाच खंडांचे वर्तुळप्रतीक अंकित केलेल्या शुभ्र ध्वजाखाली स्पर्धेमध्ये खेळतात. विजेते खेळाडू पोडियमवर येतात, त्यावेळी तैवानचा राष्ट्रध्वज फडकावला जात नाही वा राष्ट्रगीतही गायले जात नाही.
 
 
 
 
दरम्यान, तैवानला अशी वागणूक देणे अवमानकारकच आहे. कारण, ‘ऑलिम्पिक’मध्ये अन्य वादग्रस्त वा किमान मान्यताप्राप्त देश जसे की पॅलेस्टाईनला आपले नाव व ध्वज वापरण्याची परवानगी मिळालेली आहे. पण, तशी परवानगी तैवानला नाही. त्याचाही एक इतिहास आहे. त्यानुसार, १९५२ सालच्या ‘ऑलिम्पिक’मध्ये तैवान आणि चीन दोघांनाही स्पर्धेचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यावेळी दोन्ही सरकारांनी स्वतःच्या चिनी प्रतिनिधित्वाचा दावा केला होता. परंतु, अखेरीस तैवानला हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. चार वर्षांनी तैवानने स्पर्धेत ‘फार्मोसा-चायना’ नावाने भाग घेतला.
 
 
 
सोळाव्या शतकात पोर्तुगाली नाविकांनी तैवानला ‘फार्मोसा’ नाव दिले होते, त्याचा अर्थ ‘सुंदर’ असा होतो. मात्र, ते पाहून चीनने ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेवरच बहिष्कार घातला आणि नंतर जागतिक ‘ऑलिम्पिक’ समितीचे सदस्यत्वही सोडले. १९६० साली तैवानने जागतिक ‘ऑलिम्पिक’ समितीच्या परवानगीने तैवान नावानेच स्पर्धेत भाग घेतला. पण, तैवानच्या तत्कालीन सरकारचा या नावाला आक्षेप होता व त्याची इच्छा ‘रिपब्लिक ऑफ चायना’ नावाने स्पर्धेत भाग घेण्याची होती. त्यानंतर १९६० व १९६४च्या स्पर्धेत तैवानने तैवान नावानेच स्पर्धेत भाग घेतला. १९७२ मध्ये तैवानने ‘ऑलिम्पक’मध्ये ‘रिपब्लिक ऑफ चायना’ नावाने शेवटचा भाग घेतला. पण, १९७९ मध्ये हे नावच रद्द केले गेले. नंतर जागतिक ‘ऑलिम्पिक’ समितीने बीजिंगमधील सरकारला चीनचा अधिकृत प्रतिनिधी मानले व त्यानंतर १९८१ मध्ये तैवानला पुन्हा ‘ऑलिम्पिक’मध्ये भाग घेण्याची परवानगी मिळाली. पण, ‘चिनी तैपेई’ नावाने. तेव्हापासून तैवान याच नावाने ‘ऑलिम्पिक’मध्ये भाग घेत आहे. मात्र, स्वतःचे नाव त्यागून दुसर्‍या कुठल्यातरी नावाने स्पर्धेत भाग घेणे दुःखदच आणि तेच दुःख तैवानी खेळाडू अजूनही भोगताना दिसत आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@