मुंबई : टोकियो ऑलिम्पिक २०२१मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मीराबाई चानू वगळता इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तिरंदाजी पाठोपाठ भारतीय पुरुष बॉक्सरदेखील पदक मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. अशामध्ये महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने उपांत्यपूर्व फेरी गाठली असून आता पदक प्राप्तीसाठी फक्त एका विजयाची गरज आहे.
महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनने पहिला सामना जिंकला आहे. लवलिनाने राउंड ऑफ १६च्या सामन्यात जर्मनीच्या नेदिन अपेत्झचा ३-२ने पराभव केला. आता लवलिना अंतिम ८ मध्ये पोहोचली आहे. तिला पदक जिंकण्यासाठी आणखी एक सामना जिंकावा लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय लवलिनाचा सामना चीनच्या चेन नेन हिच्याशी होणार आहे. २०१८च्या जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चेनने लवलिनाला पराभूत केले होते. या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी लवलिनाकडे आहे.