आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Health_1  H x W
 
 
पावसाळा म्हटलं की, स्वास्थ्याच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी सुरू होतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच काहीना काही अस्वास्थ्याची लक्षणे उद्भवतात. सध्याच्या ‘कोविड’च्या पार्श्वभूमीत साधा सर्दी-ताप झाला म्हटलं तरी माणूस घाबरुन जातो, धास्तावतो. अशाच काही तक्रारींबद्दल काही साधे-सोपे उपाय आपण आजच्या लेखातून जाणून घेऊया.
 
 
 
या लेखातील उपाय हे प्राथमिक स्वरुपात घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत. पण, याने आराम पडला नाही, तर औषधोपचार मात्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करावे. नाक चोंदणे, घसा खवखवणे, कानात दडा बसणे, कान दुखणे, कर्णस्राव होणे, नाक गळणे, सर्दी-खोकला, अंग ठणकणे, कणकण, तोंडाला चव नसणे, गळून जाणे, डोकं जड होणे, ताप इत्यादी लक्षणे लहान मुलांमध्ये अधिक दिसतात. बाल्यावस्था ही कफावस्था असते. त्यामुळे या वयात इतरांच्या तुलनेने (०-१६ वर्षे वयोगट) कफाच्या तक्रारी जास्त आढळतात. मोठ्यांमध्येही पावसात भिजल्याने दमट-ओल्या वातावरणात प्रवास व काम करणे इ. कारणांनी वरील लक्षणे उत्पन्न होतात. यासाठी सर्वात पहिले म्हणजे, ओले कपडे अंगावर ठेवू नयेत. दमट कपडे घालू नयेत. अंघोळ करताना कोमट पाणी घ्यावे, गार नाही. केस धुतल्यास केस सुकवावे, पाणी आत मुरेल, असे ठेवू नये.
 
 
नाक चोंदलेले असल्यास वाफारा घ्यावा. साध्या पाण्याचा न घेता त्यात एक-दोन थेंब निलगिरी तेल घालावे किंवा ओवा अर्क घालावा. चेहर्‍यावर वाफ घेताना डोळ्यांवर वाफ घेऊ नये. डोळ्यांना वाफेपासून वाचवावे. तोंडातून-घशातून, कानातून ही वाफ घ्यावी. वाफ घ्यायच्या आधी चेहर्‍याला थोडं तेल/तूप लावल्यास चेहरा भाजत नाही. ज्यांची ‘सेन्सिटिव्ह स्कीन’ आहे, त्यांनी वाफ घेण्यापूर्वी चेहर्‍याला थोडे खोबरेल तेल लावूनच नंतर वाफ घ्यावी, म्हणजे अपाय होत नाही. घसा खवखवत असल्यास, टोचल्यासारखे होत असल्यास गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. त्यात सैंधव घालून किंवा हळद घालून पाणी गरम करावे व ते गुळण्यांसाठी वापरावे, याने खवखव कमी होण्यास मदत होते. घसा आतून लाल झाला असेल, तर सैंधव टाळावे. फक्त हळदीच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. याने घशात चिकटलेला कफ सुटण्यास मदत होते. वाफारा घेतल्याने गाल व कपाळातील पोकळ्या (सायनस) कफाने भरल्यासारखे वाटत असल्यास ते कमी होते. कानातला दडा व कानदुखी पण कमी होण्यास मदत होते.
 
 
 
सुंठीचा लेप, वेखंडाचा लेप कपाळावर व घशावर लावल्यास सर्दी-पडसं कमी होण्यास मदत होते. सर्दीमुळे डोकं चढलेलं असल्यास, जड झालेलं असल्यास दुधात किंवा तुपात सुंठीचा लेप तयार करावा. तो थोडा गरम करुन लावावा. याने आराम पडतो. पाण्यातून सुंठीचा लेप लावल्यास काही वेळेस त्वचेची जळजळ होते, त्वचा लाल होते, हे टाळण्यासाठी तुपातून किंवा दुधातून लेप लावावा. लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला असतेवेळी गळ्यात लसणीची माळ घालावी. लसणीच्या पाकळ्या घालाव्यात. लसणीच्या पाकळ्या सोलून दोरीने त्या गुंफाव्यात व गळ्यात ही माळ घालावी. याने नाकापासून घसापर्यंतचा कफाने लिप्त झालेला मार्ग सुटण्यास मदत होते, पण हे सतत करावे. एक-दोन दिवस करुन थांबू नये.  ओवा तव्यावर भाजून रुमालात, कॉटनच्या पातळ कापडात पुरचुंडी बांधून, त्याने चेहरा-मान-पाठ-कान शेकावे. यानेदेखील कफ सुटण्यास मदत होते. भाजताना ओवा जर हुंगला, तर सटासट शिंका येऊन कफ निघून जातो. श्वसनमार्ग मोकळा होण्यास उपयोग होतो.
 
 
 
मध-हळद चाटण वारंवार थोडे थोडे घेतल्याने कोरडा खोकला, दाट कफ निघण्यास मदत होते. त्यात तुळशीचा रस घातल्यास सर्दी-पडसं-ताप व जंत या सर्वांवरच उपयोग होतो. आल्याचा रस जर मध-हळद चाटणातून दिला, तर मळमळ, भूक न लागणे, अन्न न पचणे इ.तक्रारींवर फायदा होतो. ज्यांना वारंवार चिकट कफाची प्रकृती आहे, त्यांनी रोज एक चमचा आळशी भाजून खावी. (पावसाचे तीन महिने) याने कफ वितळून बाहेर पडण्यास मदत होते. ओवा भाजून त्यात थोडं सैंधव व हळद घातल्यास कफाच्या विविध तक्रारींवर फायदा होतो.  ताज्या कोरफडीचा गर एक चमचा घेतल्याने न सुटणारा दाट कफ सुटण्यास मदत होते, यासाठी कोरफडीची पात स्वच्छ धुऊन घ्यावी, त्याचे काटे व वरील हिरवं साल काढून टाकावे. आतील पारदर्शक गर जो असतो तो मिक्सरमधून फिरवून चमच्याने फेटून घ्यावा. हा रस तयार एक चमचा व मध एक चमचा असे दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे. जुनाट सर्दी, डोक्यात-छातीत साठलेली सर्दी काढण्यास कोरफडीचा गर अत्यंत उपयोगी ठरतो.
 
 
 
कान ठणकणे, दुखणे, वाहणे इ. साठी वार्‍यावर जाणे टाळावे व जावे लागत असल्यास थेट कानांना वारा लागू देऊ नये. यासाठी कानात कापसाचे बोळे घालावे. वाफ घेतल्याने ठणका कमी होऊ शकतो. लसणीचं तेल कानात घालावे, यानेही ठणका आणि स्राव कमी होण्यास मदत होते. खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल गरम करावे. त्यात लसणीच्या पाकळ्या सोलून ठेचून घालाव्यात आणि गार झाले की गाळून घ्यावे. ड्रॉपरच्या साहाय्याने कानात चार-चार थेंब घालावेत. कोरफडीसारखाच अडुळशाच्या पानांचाही रस चिकट कफ, सुका खोकला इ. कमी करण्यास मदत करतो. हा रसही मधातून घेतल्यास आराम पडतो. कणकण असताना सर्वप्रथम लंघन करावे. शरीररोष्मा वृद्धी म्हणजे शरीरातील घटक (wbc) त्यांचे प्रतिबंधात्मक कार्य (इन्फेक्शनच्या विरुद्ध) करत आहेत. यासाठी शरीराची विविध यंत्रणा त्यांना मदत करण्यासाठी सज्ज असते. लंघन केल्याने, हलकासा सुपाचा आहार घेतल्याने हे कार्य करण्यास हातभार लागतो. पचायला जड, चमचमीत, तिखट-मसालेदार किंवा खूप सारी फळे/ज्यूस घेतल्यास प्रतिबंधाचे कार्य अविरत होत नाही. गवती चहा, आलं, मिरी, तुळस इ. घटकांचा वापर करुन काढा तयात करावा. त्यात हळद, ज्येष्ठमध, वावडिंग इ. घातले तरी चालेल. वरील जिन्नस पाण्यात घालून पाणी निम्मे किंवा पाव भाग उरेपर्यंत आटवावे व गाळून घेऊन पाणी/काढा प्यायला द्यावा. याने तोंडाची गेलेली चव, घशात कफ लिप्तता जी जाणवते, ती कमी होते. ताप, कणकण कमी होण्यासही मदत होते. या पद्धतीने घरच्या घरी काही साधेसोप्पे उपाय करुन प्रतिबंधात्मक उपाय अवलंबावेत. (क्रमश:)
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@