क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. सांघिक खेळ असला तरी अनेकदा या खेळादरम्यान संघातील खेळाडूंमध्येच मतभेद असल्याचे समोर येते. खेळाडूच काय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांमध्येही असलेले मतभेदही अनेकदा चव्हाट्यावर आल्याची अनेक उदाहरणे क्रिकेट जगतात पाहायला मिळतात. उदाहरण घ्यायचेच झाल्यास अलीकडच्या भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसर्या सामन्याचे घेता येईल. दुसरा एकदिवसीय सामना हा श्रीलंका जिंकणार, असे अनेकांना वाटत होते. मात्र, दीपक चहरने केलेल्या खेळीमुळे भारताने श्रीलंकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. त्यामुळे श्रीलंकेचा विद्यमान कर्णधार दसुक शनाका आणि हंगामी प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांच्यात सामन्यानंतर मैदानातच जुंपल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील वाद समाजमाध्यमांवरही तुफान व्हायरल झाला. यानंतर संपूर्ण जगातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. सामना म्हटला तर हार-जीत होणारच. मात्र, कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची आपली तयारी हवी. कारण, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. येथे कधीही काहीही घडू शकते. गोलंदाजांनी शतकी भागीदारी करत अनेक सामने जिंकवल्याच्या इतिहासाची नोंदही क्रिकेटमध्ये आहे. ‘विश्वचषका’सारख्या महत्त्वाच्या सामन्यांदरम्यानही उलटफेर झाल्याची उदाहरणे क्रिकेट जगतात आहेत. त्यामुळे कोणालाही कमी समजून चालणार नाही. सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्व फलंदाज बाद झाले, आता गोलंदाज किती फलंदाजी करून सामना जिंकवतील, असा अंदाज बांधणे चुकीचे असून जोपर्यंत सामना जिंकत नाही, तोपर्यंत सुटकेचा निःश्वास टाकू नये, हेच क्रिकेटचे सूत्र सांगते. त्यामुळे श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी आणि कर्णधाराने वादावादी करण्याऐवजी आपण कुठे कमी पडलो, याचे मंथन करणे गरजेचे आहे. आपण कुठे कमी पडलो आणि काय करायला हवे होते, यावरही मंथन करणे गरजेचे आहे. आपल्या उणिवा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ असून वाद नव्हे, ही तर संवादाची वेळ असल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.
वादाचा इतिहास जुनाच!
खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवणे हे काही क्रिकेट जगतामध्ये नवीन नाही. याआधी असे अनेक प्रसंग घडल्याचा इतिहास आहे. २००५ साली ग्रेग चॅपल यांची भारताच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यातील मतभेद यादरम्यान अनेकदा समोर आले होते. प्रशिक्षक चॅपल आणि कर्णधार सौरव गांगुली यांच्यासह अनेक खेळाडूंमध्ये वादावादी झाल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी त्यावेळी दिले होते. या वादावादी मैदानावर कधीच उघडपणे समोर आल्या नव्हत्या. मात्र, वादावादीमुळे खेळाडूंसह संघावर परिणाम झाला. २००४च्या ‘विश्वचषक’ स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा भारतीय संघ २००७च्या ‘विश्वचषक’ स्पर्धेत बाद फेरीही गाठू शकला नाही. दुबळ्या बांगलादेशच्या संघाकडून भारताला मानहानीरीत्या पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर चॅपेल यांची गच्छंती तर झालीच. मात्र, संघातील खेळाडूंचा ताळमेळ पुन्हा बसविण्यात भारताला बरीच मेहनत करावी लागली. त्यामुळे वादावादीचे ग्रहण न लागलेलेच बरे, असे क्रिकेट समीक्षक सांगतात. भारताचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची ज्यावेळी भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतरही कर्णधार मिताली राज यांच्यासोबत त्यांचे मतभेद असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. रमेश पोवार यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडले. यानंतर नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. नव्या प्रशिक्षकांचा कार्यकाळ संपल्यानंतर पोवार यांची या पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली. आता रमेश पोवार यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि मिताली राज यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ खेळत असून, उत्तम कामगिरीही करत आहे. मतभेद हे असतातच; मात्र वादावादी करून विषय सोडवण्याऐवजी योग्य संवाद साधून जर विषय सोडवला तर यातून मार्ग निघतो. केवळ भारतातच हे घडले असे नाही. क्रिकेट जगतातील अनेक संघांना या समस्येचा सामना करावा लागल्याचा इतिहास आहे. काहींनी हे वाद विकोपाला नेले, तर काहींनी सामंजस्यातून सोडवण्यातच आपली भलाई मानली आहे.
- रामचंद्र नाईक