‘महावीरचक्र’ विजेता दिगेंद्र कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2021   
Total Views |

Digendra Kumar_1 &nb
 
 
 
काल २६ जुलै रोजी ‘कारगील विजय दिन’ उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने कारगीलच्या शौर्याचे पहिले मानकरी म्हणून ज्या दिगेंद्र कुमार यांना ओळखले जाते, त्यांच्या शौर्य आणि साहसाची ही कथा...
 
 
 
तव्या दिवशी ते ‘कोमा’तून बाहेर आले आणि डोळे उघडल्या उघडल्या त्यांनी सहकार्‍यांना प्रश्न केला, “आपण शत्रूपर्यंत पोहोचलो का?” यावर समोरच्या सहकार्‍याने सांगितले, “आपण युद्ध जिंकलं. आपण कारगील जिंकलं.” तीन छातीत, एक हातावर आणि एक पायावर गोळी लागून मरणाच्या दारात ‘कोमा’त पोहोचून परत आलेल्या त्या जवानाला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. या जवानाचे नाव आहे कारगील हिरो दिगेंद्र कुमार, ‘महावीरचक्र’ विजेता नायक दिगेंद्र कुमार. होय दिगेंद्र यांच्या साहस आणि निर्णयक्षमतेमुळेच त्यांना त्यांचे सहकारी ‘कोब्रा’ म्हणतात. तर दिगेंद्र यांनी कारगीलच्या त्या कराल पहाडावर पहिल्यांदा आपल्या भारताचा झेंडा फडकवला. त्याआधी ३७ पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले. पाकिस्तानच्या मेजरचे शिरकाण केले. अत्यंत चपळतेने १५ हजार फूट कारगीलवर असणार्‍या पाकिस्तानी सैनिकांना आस्मान दाखवून नेस्तनाबूत केले. पाकिस्तानी सैन्य १५ हजार फूट पहाडावर. त्या पहाडाच्या सर्वात उंच कळसावर जाऊन भारताचा झेंडा फडकावणे केवळ अशक्यच! अशा वेळेस सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी, मार्गदर्शन देण्यासाठी सैन्याचे प्रमुख आले. त्यांनी विचारले, “पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या उंच शिखरावर प्राणप्रिय भारताचा झेंडा कोण फडकवेल? जोश?” त्यांचे वाक्य संपते ना संपते, तोच दिगेंद्र कुमार यांनी हात वर केला. “मी करणार!!” अधिकारी म्हणाले, “नुसते बोलून उपयोगाचे नाही, त्यासाठी काय करावे लागेल, याचा काही आराखडा आहे का?” दिगेंद्र आत्मविश्वासाने म्हणाले, “हो! आहे.” त्यांनी त्यांचा कृती आराखडा, त्यासाठीचे नियोजन सांगितले. अधिकार्‍यांनी त्यावर क्षणात विचार केला. होकार दिला. कारवाई सुरू झाली. जणू छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमीकाव्याचे ते मूर्तरूप होते. दिगेंद्र म्हणतात, “आपल्याला देशासाठी युद्धात सहभागी होता आले, याचा आनंद प्रत्येक सैनिकाला होता. नाही नाही, प्रत्येक सैनिकाची इच्छा असते की, त्यांला वीरमरण यावे.” याआधीही दिगेंद्र यांनी कुपवाडा येथे चार दहशतवाद्यांना एकट्याने कंठस्नान घातले होते. हजरतबल येथे नियुक्ती झाली असता, एका दहशतवाद्याला मारून बाकीच्या शेकडो दहशतवाद्यांना शरणागती पत्करायला लावली होती, तर श्रीलंकेमध्येही तामिळ संघर्ष सुरू असताना कितीतरी दहशतवाद्यांवर कारवाई केली होती. थोडक्यात, दिगेंद्र कुमार यांची कारकिर्द म्हणजे शूरता! शूरता!! आणि केवळ शूरता!!!
 
 
 
दिगेंद्र यांचे दोन भाऊही त्यांच्यासोबत कारगील युद्धात देशसेवा करत होते. तसे पाहायला गेले, तर दिगेंद्र यांना पिढीजात शौर्याचा वारसा. हे कुटुंब राजस्थानचे. त्यांचे वडील शिवदानसिंह परसवाल हे ‘आझाद हिंद सेने’त होते, तर आई राजकौर उर्फ गोठलीदेवी यासुद्धा वीरच. मुलांनी कशालाही घाबरू नये, भय हे मुलांच्या शब्दकोषात नसावे, असे संस्कार त्यांनी मुलांना दिले. पुढे ‘आझाद हिंद सेने’च्या सैनिकांना पकडण्याचे सूत्र सुरू झाल्यावर त्यांनाही पकडून देशाबाहेर कुठेतरी डांबण्यात आले. तेथून ते निसटले आणि भारतात आले. १९४८ साल होते. त्यावेळी शिवदान भारतीय सैन्यात भरती झाले. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यावेळी युद्धात त्यांनीही शौर्य गाजवले होते. त्यांच्या जबड्याला गोळी मारली. ती गोळी श्वसनलिकेच्या बाजूला गळ्यात अडकली. पण, त्यावेळी गोळी काढणे, शस्त्रक्रिया करणेही शक्य झाले नाही. शिवदान त्या गोळीसोबतच घरी आले. त्यावेळी दिगेंद्र लहान होते. शिवदान यांच्या कडेवर असताना दिगेंद्र यांनी त्यांच्या गळ्यातल्या गाठीसारख्या दिसणार्‍या गोळीला पकडले. त्यावेळी शिवदान म्हणाले, “सोड बाळा, हे माझ्या वीरतेचे प्रतीक आहे. शत्रूला मारून हे मिळवलं. तुलाही मोठेपणी देशाच्या शत्रूला मारायचे आहे.” पुढे मोठे झाल्यावर तर शिवदान दिगेंद्र कुमार यांना नेहमी सांगत की, “‘वीर भोग्य वसुंधरा.’ वीरच या देशाच्या मातीला शोभतात. वीर आणि बुद्धिमान असणे हेच मानवी जीवाचे साफल्य आहे.” असो. शिवदान यांचे मित्र ‘हिंद केसरी’ होते. मोठे कुस्तीपटू होते. त्यांच्यामुळे दिगेंद्र यांनाही कुस्तीची आवड निर्माण झाली. शाळेत असताना तीनदा ते राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत उतरले. दहावीनंतर त्यांनी सैन्यात जायचा निर्णय घेतला. पुढे ‘कमांडो’चे प्रशिक्षण घेतले. या सगळ्या प्रशिक्षणात ते प्रथम क्रमांकावर होते. प्रशिक्षण केंद्रावरचे ‘वीर भोग्य वसुंधरा’ हे वाक्य पाहून त्यांना वडिलांची आठवण होई. पुढे कारगीलचा इतिहास आणि त्यांचे शौर्य सर्वश्रुत आहे. ज्यावेळी त्यांना ‘महावीरचक्र’ पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी शिवदान रेडिओवर ती बातमी एकत होते. ते राजकौर यांना म्हणाले, “ऐकतेस का, आपल्या मुलाने आपल्याला अमर केले. शौर्याचा वारसा चालवला.”
 
 
 
दिगेंद्र जीवंतपणीच शौर्याची दंतकथा झाले. काही वर्षांपासून ते सैन्यातून निवृत्त झाले. सध्या देशातील युवकांमध्ये देशप्रेम, शौर्याचा वारसा जागृत करण्यासाठी ते कार्यरत आहेत. “हा देश वीरांचा आहे. या देशाचा भविष्यकाळही वीरांचाच आहे. त्यासाठी आज वीरसंस्कार करणे गरजेचे,” असे त्यांचे मत. निवृत्त सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठीही ते अग्रेसर आहेत. कारगील हिरो, ‘महावीरचक्र’ विजेता दिगेंद्र कुमार... शूरा मी वंदिले..!
 
 
@@AUTHORINFO_V1@@