कुणी विचार करेल का? विचार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jul-2021   
Total Views |

flood _1  H x W

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने-पुराने हाहाकार माजवला. दरडी कोसळल्या, घरे कोसळली. लोक चिरडली. लोक मेली. पोरंबाळं अनाथ झाली. कुठं म्हातार्‍या, डोळ्यांत लेकरू मेलं म्हणून पाणी ओसरलेलं नाही. घरात पाणी, दारात पाणी, शिवारात पाणी आणि डोळ्यातही तुडूंब पाणी. नैसर्गिक आपत्ती आहे. मान्य आहे की, निसर्गापुढे कुणाचे काय चालणार? पण म्हणून निसर्गाला दोष देत जे झाले ते होणारच होते म्हणून हात झटकून राहणार का? दु:खितांचे अश्रू कुणीही कितीही पुसले, तरी ती सल कायमच हृदयात राहणारच. महाराष्ट्राच्या जनतेचे मन मोठेच आहे. मराठी अस्मितेच्या नावावर लोकांनी यांची दंगाखोरी रडतखडत का होईना, सहन केली. ‘पदरी पडलं पवित्र झालं’ची असाहाय्यता महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवली. पावसाने झोडपणं आणि दादल्याने मारणं, तर कुणाकडे दाद मागायची, ही म्हण ग्रामीण महाराष्ट्रात आहे. सध्या महाराष्ट्रात या म्हणीची रिहर्सल सुरू आहे. पावसाने उद्ध्वस्त केले आणि राज्य सरकारने दादच दिली नाही, तर काय करायचे? गप्प राहायचे. असो. सध्या दरडी कोसळून विस्थापित होणार्‍या कुटुंबासाठी राज्य सरकार आणि त्याच्या प्रशासकीय यंत्रणांकडे काय नियोजन आहे? अर्थात, सवयीप्रमाणे सत्ताधारी नेते भरपूर आश्वासने देतील. पण त्यांची कार्यवाही होईल का? राहत्या धोकादायक घरातून बाहेर काढण्यासाठी लोकांना नोटीस तत्परतेने दिली जाते. पण हे लोक कुठे कसे राहतील? यांच्या धोकादायक स्थितीतील का असेना, पण त्या घराचे नंतर काय होईल? त्यातील जीव मारून मारून विकत घेेतलेल्या सामानांचे, वस्तूंचे काय होईल? याचा विचार प्रशासन करणारच नाही. कारण, प्रशासनासाठी हे भविष्यात दरडी कोसळून पडणारं घर म्हणजे एक नंबर आहे. तो नंबर त्यांना तेथून बाहेर काढायचा आहे बस. पुढे या लोकांनी जगावं की मरावं हे त्यांचे त्यांनी पाहावे. त्या हतबलतेचे काय? या तात्पुरत्या विस्थापित झालेल्या लोकांचा मानवी भावनेतून कुणी विचार करेल का? विचार?

पटोले... छे छे मीच सर्वश्रेष्ठ !


पाऊस असा अनैसर्गिक की विचारता सोय नाही. अनैसर्गिक शब्द किती छान, असे शब्द सुचतात म्हणून तर मला अजूनही तिथे कार्यकारी म्हणून ठेवलंय. पाऊस कोसळला, तर झोपड्या कोसळणारच ना? याला काय भविष्य सांगावं लागेल? आम्हाला काही तुम्ही निवडून दिले नाही. तुम्ही मतपेटीत भरभरून मते टाकली असती, तर आम्ही तुमची काळजी करायला बांधिल होतो. पण तसे नाही ना? दिल्लीच्या मॅडम आणि बारामतीचे थोरले साहेब यांच्या मिनतवाव्या कराव्या लागल्या होत्या. त्यात सध्या ते पटोले माझी ‘स्टाईल’ मारायला बघतात. मी काहीबाही बोलून ‘फेमस’ राहण्याचा प्रयत्न करतो, तर ते पण ‘कट टू कट’ कॉपी करून माझ्यासारखे वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतात. काहीही, कसेही बोलण्याची आणि वर सर्वेसर्वा नसतानाही तसे मिरवण्याची कला माझ्याकडेच आहे. तर विषय होता पाऊस. लोकहो, मोठ्या साहेबांसारखे व्हा. काय तो पाऊस होता! टपटप! साहेबांचे केस, चश्मा, नव्हे नव्हे सगळे साहेबच पावसात चिंब भिजले होते. पण साहेबांनी संधी सोडली का? संधी म्हणजे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी हो. तर ती सोडली का? पावसात भिजून गपगार उभे राहून भाषण करत होते ते. त्यांचा आदर्श घ्या. पावसात भिजून गपगार राहा. आम्ही साहेबांबरोबर राहून आशावादी झालो आहोत. होय, आम्ही आशावादी! म्हणजे काय म्हणून काय विचारता? हे बघा, असे वादळ होणे, असा पाऊस पडणे, असा पूर येणे म्हणजे लोकांचा सत्यानाश होणारच. त्यांना मदत नको का करायला? मग मदत कोण करणार? ते मोदी करतीलच लोकांना मदत आणि लोकांच्या नावावर आम्ही आहोतच ना केंद्राकडे हात पसरायला. मदत मिळणार? ती कशी वाटायची? लोकांना वाटायची हो, नाही तर तुम्हाला काही वाटायचे. आता आणखी काही विचारू नका समजलं. मी का सत्तेत आहे? काय म्हणता, मग मी का बोलतो? का म्हणजे? कारण, पटोलेंपेक्षा मीच सर्वश्रेष्ठ काहीबाही बोलणारा आहे समजलं...



@@AUTHORINFO_V1@@