मिशन ऑलिम्पिक : जिद्द अन् संघर्षाचा अपूर्व संगम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2021   
Total Views |

Olympic_1  H x
 

टोकियो ‘ऑलिम्पिक’ची दिमाखात सुरुवात

 
 
टोकियो (संदीप चव्हाण) : ‘अंझुरु योरी उमु गा यासुशी...’ जपानच्या शहाणपणाच्या म्हणीमध्ये ही म्हण खूप लोकप्रिय आहे. म्हणजेच बढाया मारण्यापेक्षा जन्माला घालणे सोपे असते. गेले दीड वर्ष जपान याच दिव्यातून जात होतो. कमी बोलणे आणि अधिक काम करणे, टोकियो ‘ऑलिम्पिक’ होणार की नाही याची जगभरात चर्चा सुरु असताना जपानमात्र मान मोडून काम करीत राहिले. त्यांच्या याच अफाट जिद्दीचा आणि संघर्षाचा अपूर्व संगम आजच्या उद्घाटन सोहळ्यात अवघ्या जगाला पाहायला मिळाला. ‘ऑलिम्पिक’ची ‘थीम’ही याच धारणेच्या अवतीभोवती गुंफली होती. जपानी माणसे तशी मुळात उत्साहाने भारलेली. त्यांच्या याच उत्साहाचा आणि मेहनतीचा संगम या उद्घाटन सोहळ्यात पहायला मिळाला. हिरोशिमा आणि नागासकीवरील अणुबाँम्बच्या हल्यानंतर जपान राखेतून पुन्हा उभे राहिले. जेव्हा अस्तित्वावरच घाला येतो तेव्हा जपान जिद्दीने पेटून उठतो आणि यशस्वीही होतो. इतिहास याला साक्षी होता आज वर्तमानानही जपानच्या या असीम जिद्दीला कबुली दिली.
 
 
 
अथेन्समध्ये पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित केलेली ‘ऑलिम्पिक ज्योत’ २० मार्च, २०२० रोजी जपानमध्ये दाखल झाली. खरंतर २०२० च्या जुलैमध्ये हे ‘ऑलिम्पिक’ होणार होते. पण कोरोनामुळे एक वर्षांनी अखेर या ‘ऑलिम्पिक’ ज्योतीने मुख्य स्टेडियममधील ज्योत प्रज्वलित केली. ‘ऑलिम्पिक ज्योती’चा हा प्रवास एकूणच मानवी जिद्दीचा, संघर्षाचा, स्नेहाचा आणि एकतेचे प्रतीक आहे. यजमान जपानसहित जगभरातून एकूण २०६ देशांच्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी नोंदवला आहे. यापैकी अनेक सहभागी देशांत कोरोनामुळे हाहाकार उडाला होता. मृत्यूचे भयाण तांडव अवघ्या जगाने पाहिले. अवघ्या जगाचा जणू श्वास रोखला गेला होता. पण या ’ऑलिम्पिक’मध्ये कुणाही देशाला कोरोनाचे कारण देत ‘ऑलिम्पिक’ समिती आणि जपानने प्रवेश नाकारला नाही आणि म्हणूनच यावर्षी ‘फास्टर, हायर आणि स्ट्राँगर’ या ‘ऑलिम्पिक’च्या ब्रीदवाक्यात ‘टुगेदर’ हा नवा शब्द जोडण्यात आलाय. आधुनिक ‘ऑलिम्पिक’च्या गेल्या १२५ वर्षांत ‘ऑलिम्पिक’च्या ब्रीदवाक्यात पहिल्यांदा बदल करण्यात आलाय. ‘टुगेदर’ या शब्दाचा येथे अनेकांत एकता असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहोत. आपण सगळे मिळून कोरोनाचा मुकाबला करु शकतो, हेच ‘ऑलिम्पिक’च्या निमित्ताने जपानने अवघ्या जगाला दाखवून दिले. स्टेडियमध्ये प्रेक्षक नसले तरी खेळाडूंच्या उत्साहाला मात्र उधाण आले होते. टीव्हीच्या माध्यमातून तब्बल ४०० कोटी म्हणजेच पृथ्वीच्या निम्या लोकसंख्येने या ‘ऑलिम्पिक’ सोहळ्याचा आनंद लुटल्याचा अनुमान आहे.
 
 
 
या ‘ऑलिम्पिक’ सोहळ्यात बांगलादेशचे ’नोबेल पुरस्कार’ विजेते प्राध्यापक मोहम्मद युनुस यांना ‘ऑलिम्पिक लॉरेल पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. बांगलादेशने आजवर दहा ‘ऑलिम्पिक’मध्ये भाग घेतलाय. पण त्यांना आजवर एकही मेडल जिंकता आलेले नाही. ग्रामीण बँकेच्या यश्स्वी स्थापनेसाठी त्यांना ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला होता. त्यानंतर त्यांनी बांगलादेशात ‘मिशन ऑलिम्पिक’ हाती घेतलंय. त्याचीच दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. केनियाचा महान धावपटू किप किइनो यांच्यानंतर ‘ऑलिम्पिक लॉरेल पुरस्कार’ मिळणवणारी ते दुसरे व्यक्ती ठरले आहेत.
 
 
जपानी वर्णमालेनुसार भारतीय संघ स्टेडियममध्ये प्रवेश करणारा २१ वा संघ होता. २०२१ मध्ये प्रवेश करणारा २१ वा संघ हा भारतासाठी शुभशकुनच आहे, असे माझा जपानी मित्र मला म्हणाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे फक्त १८ खेळाडू आणि सहा अधिकारीच फक्त संचलनात सहभागी झाले. मनिका बात्रा आणि शरथ कमलची संचलनातून माघार. दुसर्‍यादिवशी दोघांचे सामने असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
 
 
 
अवकाशातून मानवी अंश या पृथ्वीवर पडतो आणि रुजतो. एक महिला खेळाडू या अंशाची पृथ्वीला स्पर्श करून अनुभूती घेते आणि तिच्या वेगवान धावण्यानिशी हे रोपटे वाढीस लागते. खेळ आणि त्यातील वेग हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, कोरोनाही त्याला रोखू शकत नाही, असा जणू संदेशच त्यातून दिला गेला.
 
 
‘कुची वा वाझीवाइ नो मोतो’ म्हणजे तोडं हे सगळ्या व्याधीचे मूळ आहे, अशी एक जपानी धारणा आहे. ‘कोविड’मुळे स्टेडियममधील उपस्थित सगळेच मास्क परिधान करून होते. पण त्या मास्क पलीकडे लपलेला प्रत्येक चेहरा आम्ही हरलेलो नाही आणि हरणारही नाही, याची साक्ष देत होता.
 
 
 
‘होरेता यामाइ नि कुसुरी नाशी’ म्हणजे प्रेमात पडण्यासाठी कोणतेच औषध लागत नाही, असं जपानी मानतात. तेव्हा प्रेम करा. स्वत:वर करा. जगावर करा. प्रेमाने प्रेम वाढते, असा संदेश देत या टोकियो ‘ऑलिम्पिक’च्या उद्घाटन सोहळ्यात पारवा अवकाशात झेपावला, उद्याच्या उज्ज्वल आणि शांततामय जगाचे आश्वासक चित्र प्रतिबिंबत करण्यासाठी. येत्या ८ ऑगस्टपर्यंत रंगणार्‍या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत गाठली जाणारी मानवी क्षमतेच्या नवनव्या उंचीचे जणू ते प्रतीक ठरावे...
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@