होय, हा अमेरिकेचा पराभवच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2021   
Total Views |

afg_1  H x W: 0
 
 
व्हिएतनाम युद्ध असेल की आता अफगाणिस्तानात दोन दशके सर्व ताकद पणाशी लावल्यानंतरही पदरी पडलेली निराशा. अमेरिकेने वरकरणी जरी हा पराभव मान्य केला नसला तरी अमेरिकन सैन्यामध्ये मात्र याविषयी तीव्र नाराजी दिसून येते.
 
 
 
अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यानंतर आज जवळपास ७० टक्क्यांहून अधिक भूप्रदेशावर तालिबानने कब्जा केला. पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या दहशतीचे काळे ढग दाटून आले असून संपूर्ण जगाचे लक्ष आता अफगाणिस्तानकडे केंद्रित झालेले दिसते. दुसरीकडे अमेरिकेने अफगाणिस्तानातून जरी माघार घेतली असली तरी महासत्तेचा माज मात्र अद्याप कायम आहेच. ‘अफगाणिस्तानला तालिबानमुक्त करण्यात आम्ही अपयशी ठरलो, कमी पडलो’ हे स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा बायडन सरकार कदापि दाखवू शकले नाही आणि म्हणा ते अपेक्षितच! कारण, महासत्ता कितीही आपटली, पडली तरी कुणासमोर आम्ही झुकत नाही, हाच अमेरिकाचा तोरा! मग ते व्हिएतनाम युद्ध असेल की आता अफगाणिस्तानात दोन दशके सर्व ताकद पणाशी लावल्यानंतरही पदरी पडलेली निराशा. अमेरिकेने वरकरणी जरी हा पराभव मान्य केला नसला तरी अमेरिकन सैन्यामध्ये मात्र याविषयी तीव्र नाराजी दिसून येते.
 
 
 
अफगाणिस्तान आणि इराकमधील अमेरिकी मोहिमांमध्ये सहभागी असलेले ४१ वर्षीय जेसन लाईली ‘मरिन रेडर’ नामक सैन्यदलाचा विशेष भाग होते. लाईली म्हणतात, “आम्ही हे युद्ध १०० टक्के हारलो आहोत. आमचा उद्देश हा तालिबानचा खात्मा हाच होता, पण ते उद्दिष्ट आम्ही साध्य करु शकलो नाही. तालिबान पुन्हा एकदा अफगाणिस्तानचा संपूर्ण ताबा घेईल.” आता खुद्द अमेरिकेच्याच एका अनुभवी सैनिकाने जी भीती बोलून दाखविली, ती अमेरिकन सरकारच्या गावीही नसेल, असे मानण्याचे मुळी कारणच नाही. पण, अखेरीस मायदेशातून सैनिकांना माघारी बोलवण्याचा वाढता दबाव आणि या युद्धमोहिमांचा अब्जावधींचा खर्च हा अमेरिकेसमोर गंभीर चिंतेचा विषय होता. परिणामी, आज नाही, उद्या नाही म्हणत अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेणेच पसंत केले.
 
 
 
एवढेच नाही, तर लाईली अफगाणिस्तानला ‘साम्राज्यांची स्मशानभूमी’ का म्हणतात, हे प्रत्यक्ष त्या भूमीवर काम केल्यानंतर लक्षात आल्याचे ते म्हणतात. लाईली असे का म्हणाले असतील, याचा विचार केला आणि इतिहासाची पाने चाळली की याचा अर्थ लक्षात यावा. १८४२ साली इंग्लंडनेही अफगाणिस्तानवर जोरदार हल्ला चढवला, पण त्याची मोठी किंमत इंग्लंडला चुकवावी लागली. त्याचबरोबर सोव्हिएत संघानेही दशकभर अफगाणिस्तान टाचेखाली ठेवून आपले अधिपत्त्य स्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामध्ये सोव्हिएत संघाच्या १५ हजारांहून अधिक सैनिकांना आपले प्राणही गमवावे लागले, तर हजारो सैनिक या युद्धात जायबंदी झाले. त्यामुळे अफगाणिस्तानवर इंग्लंड, रशिया आणि आता अमेरिकालाही अखेरीस नमतेच घ्यावे लागले. या आंतरराष्ट्रीय शक्तींची पैशापासून ते सैनिकीबळापर्यंतची ताकदही तालिबानींचा बिमोड करण्यात अपयशीच ठरली. दुसरीकडे तालिबानशी चर्चा करा, वाटाघाटी करा आणि अफगाणिस्तानमध्ये स्थैर्य नांदू दे, म्हणणार्‍याच या महाशक्तींनी प्रत्यक्षात या भूमीवर बलप्रयोगाचे हत्यार उपसले आणि नंतर ते सपशेल फसलेही. नाही म्हणायला अमेरिकन सैन्याच्या उपस्थितीत अफगाणिस्तानमध्ये तालिबानला अटकाव करण्यात काही प्रमाणात यश आलेही, पण तालिबानचा नायनाट करण्याचा जो विडा अमेरिकेने राणाभीमदेवी गर्जना करुन उचलला होता, तो मात्र शेवटी हाती काहीएक न लागल्याने तसाच ठेवावा लागला.
 
 
 
खरंतर जेसन लाईली यांना जे वाटते, ती भूमिका त्यांची एकट्याची मानण्याचेही कारण नसून ती समस्त अमेरिकन सैनिकांचे प्रतिनिधित्व करणारी भूमिका म्हणायला हवी. कारण, गेल्या दोन दशकात अमेरिकेचे अफगाणिस्तानमध्ये अडीच हजारांहून अधिक सैनिक मृत्युमुखी पडले, तर हजारो सैनिक जखमी झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली सैन्यहानी ही अमेरिकन जनतेला आणि सैन्यालाही तितकाच चटका लावून गेली. शिवाय अफगाणिस्तान मोहिमेचा एकीकडे अमेरिकन तिजोरीवर भार वाढतच गेला, पण त्या तुलनेत ठोस असे काहीच अफगाणिस्तानमध्ये हाती आले नाही. ओसाम बिन लादेनला ठार केल्यानंतर, ‘अल कायद्या’च्या कित्येक कमांडरांचे खून पाडल्यानंतरही या प्रदेशातील दहशतवादावर अमेरिकेला लगाम कसता आली नाहीच. उलट एका आकडेवारीनुसार, मागील दोन दशकांत अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये २.२६ ट्रिलियन डॉलर इतका पैसा पाण्यासारखा ओतला. पण, उपयोग शून्यच! तेव्हा, अफगाणिस्तानमध्ये जर कायमस्वरुपी शांतता नांदायची असेल, तर तेथील सरकारला लवकरात लवकर मार्ग हा काढावेच लागेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@