मृत्यूच्या थैमानात आशेचे दीप!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2021   
Total Views |

Chembur_1  H x
 
 
 
मुंबईत दि. १८ जुलैच्या रात्री भयंकर मृत्यूचे तांडव झाले. चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप येथील डोंगरकडांना लावलेल्या संरक्षक भिंती कोसळून घरावर पडल्या. झाडे पडली आणि त्यात ३१ निष्पापांचा बळी गेला. त्यांची काय चूक? हे असे का व्हावे? या वस्त्यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधून वास्तव जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
 
सुखदु:खाच्या रेशीमगाठी
बांधल्या भिंती घराच्या
क्षण एक काळ
उद्ध्वस्त झाल्या
वाटा जगण्याच्या...
 
 
मुसळधार पावसाने मुंबईत हाहाकार माजवला आणि किती तरी जीव हकनाक बळी गेले. विक्रोळी सूर्यानगरमध्येही संरक्षक भिंत कोसळून ११ जण मृत्युमुखी पडले. त्या वस्तीत सत्यम नावाचा किशोरवयीन मुलगा मला सांगत होता की, “मी त्यांना सांगत होतो, चला आपण इथून निघूया. ही भिंत पडणार आहे. आपण मरू. चला पटकन, पण माझे कुणीही ऐकले नाही.” विक्रोळी सूर्यानगरमध्ये डोंगराची संरक्षक भिंत पडून जी घरं उद्ध्वस्त झाली, त्यात वाचलेला सत्यम मौर्य. नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली. त्याला विचारले, इतर मोठ्या माणसांना नाही वाटले की, भिंत कोसळेल. तुला कसे काय कळले? यावर तो तितक्याच थंड नजरेने, पण कातर आवाजात म्हणाला की, “कारण, २०१७ साली ही भिंत अशीच कोसळली होती आणि त्यात माझे बाबा वारले होते. २०१७ सालीही ही संरक्षक भिंत आठ घरांवर कोसळली होती. आता मृत पावलेले किंवा जखमी झालेले किंवा वाचलेले लोक त्यावेळी तिथे अडकले होते. लोक कसेबसे बाहेर निघाले तर कुणीतरी ओरडले की “मेरी बच्ची मलबे की नीचे रेह गयी. “ते ऐकून सत्यमचे बाबा सुरेश पुन्हा मागे फिरले होते, त्यांच्या पाठीपाठी सत्यम आणि त्याची आईही मागे फिरली. सुरेश यांनी मुलीला बाहेर काढले. इतक्यात भिंतीचा कडा सुरेश यांच्यावर पुन्हा पडला. तेथून अगदी जवळच सत्यम उभा होता. तो कडा कोसळल्याने सत्यमचे बाबा सुरेश जागीच मृत पावले. हे सगळे त्यावेळी १३ वर्षांचा असलेल्या सत्यमच्या डोळ्यासमोर अगदी जवळून घडले होते. ज्या मुलीला वाचवताना सत्यमचे वडील देवाघरी गेले, ती मुलगीही इस्पितळात उपचार घेताना मृत पावली. सत्यम म्हणतो,“२०१७ साली भिंत कोसळताना जो आवाज झाला होता, तो माझ्या कानात अजूनही घुमतो. तोच आवाज मला रात्रीही येत होता. त्यामुळे मला आतून वाटत होते की, आता भिंत नक्की कोसळणार. मी सगळ्यांना आग्रह करत होतो, विनंती करत होतो, पण कुणीही ऐकले नाही. अगदी माझ्या आईनेही नाही. माझे ऐकले असते, तर ते ११ जण वाचले असते.” सत्यमकडे पाहून खूप वाईट वाटत होते.
 
 
 
काय म्हणावे? २०१७ सालीही हीच विक्रोळीतील डोंगरानजीकची संरक्षक भिंत याच आठ घरांवर कोसळली होती. त्यात दोन जण मृत पावले होते. नेमकी तीच भिंत पुन्हा चार वर्षांनी २०२१ साली कोसळली आणि कोसळताना ११ निष्पापांचा बळी घेऊन गेली. ही भिंत आणि घरे कुणी बांधली? कोणत्या निकषांवर बांधली? याबद्दल बोलण्यास लोक धजावत नव्हते. मात्र, काहीजण दबक्या आवाजात बोलले की, ”आम्हाला कुणाचीही तक्रार करायची नाही. शिवसेना आमदारांनी त्यावेळी लोकांसाठी भिंत आणि घरे बांधली. त्यांचा हेतू चांगलाच होता. त्यांना काय माहिती, असे होणार म्हणून.” हे सांगताना पण त्यांची कावरीबावरी नजर पाहून अजून त्यांना कशाला त्रास द्या, म्हणून तो विषय सोडला. पण मात्र, येथील काही लोकांचे म्हणणे की, या सूर्यानगरच्या वस्तीच्या डोक्यावर आणखी एक वस्ती आहे. तेथील लोक कचरा प्लास्टिक कायम खाली फेकत असतात. हा कचर्‍याचा ढिग डोंगराच्या उतारावर साचून राहिला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की, पाणी डोंगर उतारावरून झेपावते. पण, डोंगरजमिनीत न मुरता ते पुढे पुढे वाहत जाते. त्यामुळेच कालच्या जास्त पावसात हे पाणी झाडांना तोडत भिंतीला कापत या घरावर राक्षसासारखे कोसळले. बरं, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आठ घरांपैकी दोन-तीन घरचे झोपेत होती. या तीनही घरांत भाडेकरू राहत होते. २०१७ची भीषणता यांनी अनुभवली नव्हती. मात्र, बाकीच्या घरची माणसे जागीच होती. काही विपरित घडले तर पटकन घराबाहेर पळून जाऊ, अशा तयारीत. ज्याची कल्पना होती ते घडलेच.
 
 
 
आठपैकी सहा घरात मृत्यूने थैमान घातले. जे वाचले ते कसेबसे जीव वाचवत जवळच्या राधाकृष्ण मंदिरात आश्रयाला गेले. रात्रीचे १.३०-१.४५ वाजले असावेत. त्यावेळी सत्यमने पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, तीनही वेळा पोलिसांशी संपर्क झाला नाही. तोपर्यंत वस्ती जागी झाली होती. ‘आझाद मित्रमंडळ’ आणि ‘कैलास मित्रमंडळ’, ‘सूर्यानगर एकात्मता मित्रमंडळ’ या वस्तीतील मित्रमंडळे. या मंडळांचे युवक गोळा झाले. पण अंधार, सगळीकडे साचलेले पाणी आणि कचरा, दलदल यामुळे काय करावे कळतच नव्हते. पण, नुसते हातावर हात धरून कुठेपर्यंत बसायचे, हा विचार करून मंडळातील मुले जमेल तशी माती काढण्याचे काम करू लागले. त्यातही पाण्यात करंट येत होता. ‘फायर ब्रिगेड’ही आले. सकाळी ७ नंतर ‘एनडीआरएफ’वाले आले. त्यानंतर खर्‍या अर्थाने कामाला वेग आला. त्यांच्या मदतीला मग या मंडळातील मुले आली.
 
 
 
‘एनडीआरएफ’चे जवान मातीचे ढिगारे खणत होते. त्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढत होते. पण, त्या मृतदेहांना खाली नेणे आव्हानात्मक होते. कारण, निसरड्या अरूंद वाटा, त्या वाटांवर वर कचरा माती दलदल. त्या वाटा इतक्या अरूंद की, एका वेळी एकच व्यक्ती तेथून निघेल. अशा वाटांवरून मृतदेह बाहेर कसा काढायचा, अशावेळी वस्तीतील हे तरूण पुढे आले. चादरीमध्ये मृतदेह टाकून एका बाजूने तिरपे करत ते मृतदेह खाली आणण्यात आले. कोसळलेल्या घरांचा, भिंतींचा ढिगारा खाली काढण्यासाठी मग वरून खाली मानवी साखळी बनवण्यात आली. १०० ते १२५ युवक मानवी साखळी करून उभे राहिले. मातीचे ढिगारे, त्यात पसलेले सामान काढले जाऊ लागले. पावसाची रिपरीप सुरूच होती. अन्न किंवा पाण्याचा घोट न घेता हे युवक काम करत होते. यामध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी रमेश सिंग आणि त्यांची टीम होती. विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे युवक होते. या सेवाकार्यात इतर राजकीय पक्षाचे किंवा मंडळाचे पदाधिकारी म्हणून राजेश सरकार, विष्णू खराटे, दिनेश राजभर, सत्यपाल सिंग,संजय जाधव हे तर त्या दिवशी पहाटेपासून घटनास्थळी हजर राहून मदतीची शर्थ करत होते. या संकटात या सगळ्यांनी जनतेसाठी स्वत:ला झोकून दिले.
 
 
 
तसेच, कन्हैया राजभर, विनोद राजभर, मुन्ना दीक्षित यांनीही यावेळी तहानभूक विसरून निर्भयपणे काम केले. त्यांच्यासोबत जेम्स डिसोझा, रूपेश निषाद, सलीम, हुसैन, अ‍ॅथोनी डिसोजा, सुरेश गुंगेल हे युवकही खांद्याला खांदा लाऊन काम करत होते. यातील मुन्ना दीक्षित युवकाबद्दल सांगायलाच हवे. दोन वर्षांपूर्वी याला पोलिसांनी तडिपारची नोटीस दिली होती. माराहाण, गुंडागर्दी हे कारण सांगितले गेले. कारण काय तर राधाकृष्ण मंदिराच्या समोर बसून काही मुस्लीम युवक दररोज रात्री नशा करायचे. देवळासमोर बसून हे करू नका, असे मुन्ना त्या नशेबाजांना म्हणाला.वादावादीचे पर्यवसन मारामारीत झाले. मुस्लीम युवकांच्या बाजूने खूप लोक आले. शेवटी मुन्नाला गुंड ठरवून तडिपार करण्याची योजना यशस्वी झाली. पण सुरेश गंगादयाल यादव यांनी शेवटी सर्वतोपरी प्रयत्न करून मुन्नावरील खोटे आरोप दूर केले. मुन्ना पुन्हा वस्तीत आला. आता वस्तीत ही दुर्घटना घडली, त्यावेळी त्या अंधार्‍या खडड्यात दलदलीत घुसून मृतदेह काढण्यात मुन्ना पुढे होता. युवाशक्तीने इथे सेवायज्ञ आरंभ केला होता. त्याचवेळी बाजूच्या वस्तीत प्रभात शाखेत रा. स्व. संघाचे विपीन कुमार आणि रवींद्र नलोडे यांचा प्रवास होता. ६.३० सकाळी तिथे ते आले होते. बाजूच्या वस्तीतली ही घटना कळल्याबरोबर संघ स्वयंसेवक मदतीसाठी धाऊन आले. मानवी साखळी बनवण्यामध्ये ७५ जण संघ स्वयंसेवक होते. संघ स्वयंसेवकांनी परिस्थितीचा विचार करून समस्या शोधल्या. त्यातली पहिली समस्या अशी की, ही घटना घडल्याबरोबर महानगरपालिकेने या दुर्घटनाग्रस्त घरांच्या आजूबाजूच्या ३४-३५ जणांना त्याच दिवशी घर सोडण्यासाठी नोटीस दिली.
 
 
 
त्यांना भांडुप येथील शाळेत वास्तव करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण इथल्या घरांना सोडून गेल्यावर इथले सामान, त्यांची सुरक्षा? तसेच परत इथे कधी येणार मिळणार? परतल्यावर इथे घरे असतील का? की कुणी तोडलेली असतील की कब्जा केलेला असेल? या प्रश्नांनी लोक भयभीत झालेले होते. ते कुठेही गेले नाहीत. वस्तीच्या आजूबाजूलाच ते घुटमळू लागले. त्यातच प्रशासनाने आझाद मंडळाला सांगितले की, काही लोकांना तुमच्या सेवासहयोगद्वार चालणार्‍या अभ्यासिकेत ठेवा. पण ही अभ्यासिकेची जागा लहान. कसलीच सोय नाही? लोक कसे राहणार? याचाच अर्थ प्रशासनाकडेही तशी व्यवस्था नव्हती. अधिकार्‍यांचे म्हणणे होते की आम्हाला जमेल त्या जागेत तुम्हाला ठेवू तुम्हाला पटत नसेल, तर तुमची व्यवस्था तुम्ही करा. जर इथेच राहिलात आणि काही परत घडले, तर मग त्यालाही तुम्हीच जबाबदार. हे सगळे एकून लोक कुठेही गेले नाहीत. वस्तीच्या जवळपासच भाड्याने घर घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण डिपॉझिट,भाडे देण्याइतके पैसे येणार कुठून? काही संघ स्वयंसेवकांनी या कुटुंबांना कमी भाडे घेऊन आपल्या घरात राहायला जागा उपलब्ध करून दिली. एका कुटुंबात चारजण मृत्युमुखी पडले होते. दोन जण वाचले होते. त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वयंसेवकांनी जबाबदारी घेतली. एका कुटुंबातले लोक मृत्युमुखी पडले. उरलेल्या लोकांना उत्तरप्रदेश गावी जायचे होते. पण गावी जाण्याइतके पैसे नव्हते.
 
 
 
त्यांनाही गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. स्वयंसेवकांनी सर्वेक्षण करून या नोटीस मिळालेल्या ३४-३५ कुटुंबांना शोधले. त्यांची प्राथमिक गरज काय, याचेही सर्वेक्षण केले. जम बसेपर्यंत संघातर्फे इथे कुटुंबांना चहा आणि अन्नवितरण करण्यात येणार आहे. इथे आता महानगरपालिकेचे कर्मचारी मातीचे ढिगारे उपसत आहेत. पोलीस बांधवही तैनात आहे. त्यांची चहा आणि भोजन व्यवस्थाही केली जात आहे. इथले रा. स्व. संघ विक्रोळी भाग कार्यवाह सुधीर शर्मा यांनी सांगितले की, आम्ही इथल्या समस्यांचा अभ्यास करून यापुढे इथल्या बांधवासाठी काय करता येईल याबद्दल वस्तीतल्या लोकसहभागातून काम करणार आहोत. इथले मित्रमंडळ, राजकीय पक्ष सगळेच एकदिलाने इथे सेवाकार्य करत होते. आम्ही त्यांच्या सोबत होतो. समाजशक्ती म्हणजेच समाजशक्ती ना? या वस्तीला खा. मनोज कोटक यांनीही तत्काळ भेट दिली. वस्तीतील दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी तत्काळ योजना आखून त्यावर कार्यवाही करणार, असे म्हणत त्यांनी लोकांचे सांत्वन केले. धीर दिला. या दुर्घटनेच्या दुसर्‍या दिवशी या वस्तीत मी गेले असता तिथे भाजपचे ईशान्य मुंबई सचिव सुरेश गंगादयाल यादव, रमेश सिंग (वॉर्ड अध्यक्ष १२०) भेटले. ज्या युवकांनी जीवाची पर्वा न करता सेवाकार्यात सहभागी झाले होते, त्यांना भेटण्यासाठी ते आले होते. वस्तीतील लोकांसाठी ‘समस्त महाजन संस्थे’च्या मदतीने त्यांनी तयार अन्नाची पॅकेट्स आणली होती. कन्हैया राजभर, मुन्ना दीक्षित आणि इतर तरूण मुले ते अन्नवस्तीत वितरण करत होते. वितरण झाल्यावर त्यांनी या तरूणाशी संवाद साधला. मृत परिवाराला किंवा जखमींना जी मदत मिळणार आहे, ती त्यांना व्यवस्थित मिळावी, त्यांनी पुन्हा समर्थ व्हावे, यासाठी काय करता येईल, याची ते चर्चा करू लागले.
 
 
 
दुसरीकडे चेंबूर इथेही अशाच दोन घटना घडल्या. इथे १९ जणांचा हकनाक बळी गेला. वयवर्ष चार तर वयवर्ष ५० पर्यंतचे हे जीव! यांची चूक काय? इथेही स्थानिक मित्रमंडळांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवाकार्य केले. रा. स्व. संघ, अभाविप, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी इथे अखंडपणे सेवेचा ओघ तेवत ठेवला. या वस्तीतही गेले. वस्तीत प्रवेशद्वारावरही पोलिसांचा बंदोबस्त. वाहन तिथेच अडवली जात होती. वस्तीत गेले असताच वस्तीची झलक मिळाली. खड्डे, दलदल आणि घोट्यापर्यंत चिखलपाणी. पावसाची रिपरीप सुरू. समोरून कोकण प्रांत संघाची टीमच येताना दिसली. त्यात विठ्ठल कांबळे, संजय नगरकर, विजय जगदाळे वगैरे दिसले. या वस्तीमध्ये दु:खाची छाया गडद होती. हे सगळे या वस्तीत दु:खितांचे सांत्वन आणि पुढचे सेवाकार्य नियोजनासाठीच आले असणार, यात शंका नाही. या वस्तीत अभाविपचे कृष्णा दुबे, विश्व हिंदू परिषदेचे अनुप पाल, अमन अग्रहरी या युवकांनी ‘एनडीआरएफ’ आणि ‘फायरब्रिगेड’ला मदत केलेली. या तिघांचेही म्हणणे की, या वस्तीतले तरूण आणि सर्वच मित्रमंडळे घटना घडल्या घडल्या कुणाचीही वाट न बघता दुर्घटनेत अडकलेल्या लोकांच्या मदतीला गेले होते. तिसरी घटना भांडुपची.वनविभागाची भिंत कोसळून एका युवकाचा मृत्यू. त्याचा एकदिवसाआधीच दहावीचा रिझल्ट लागला होता. पास झाला म्हणून तो आणि घरचे खूप खुश होते. पण, त्या निष्पाप जीवाचा करूण अंत झाला.
 
 
 
या तीनही घटनांचा विचार केला तर जाणवते की चूक कोणाची? प्रशासनाची? जे केवळ आणि केवळ नियमांवर बोट ठेऊन यांत्रिकपणे काम करते? की लोकांची? ज्यांना धोक्याची जाणीव असूनही कोणत्या उमेदीने ते मरण येण्याची वाट पाहत त्याच ठिकाणी थांबतात. याचे उत्तर कसे कळेल? हे दुष्टचक्र कसे थांबेल? यासाठी राजकारण, प्रशासन आणि जनता यांचा मानवी मूल्यांवर आधारित समन्वय झाल्याशिवाय हे थांबणार नाही. माणसाच्या जीवाची किंमत असते आणि लाचारी मजबुरीने कुणीही मरणाची वाट पाहत जगू नये, अशी परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थात, हे केले पाहिजे ते केले पाहिजे, असे सांगून काय होणार? पण तरीही निष्पाप माणसाचा असा भयंकररित्या का बळी जावा? हे थांबले पाहिजे. या सगळ्या अंधार्‍या वाटेत एक मात्र आशेचा किरण आहे. तो म्हणजे दुर्घटना घडल्यावर जीवाची पर्वा न करता सेवाकार्यात पुढे सरसावलेले युवक. मृत्यूच्या अंधार्‍या थैमानात हे आशेचे दीपच आहेत.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@