रविशंकर प्रसाद यांचा विरोधी पक्षांना टोला देशातील राजकीय पक्ष ‘सुपारी एजंट’

    20-Jul-2021
Total Views |

ravishankar prasad_1 
नवी दिल्ली : ज्या ज्या वेळी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरू होतात, त्या त्या वेळी आपले अपयश लपविण्यासाठी भलतेच मुद्दे काँग्रेसतर्फे पुढे आणले जातात. आतादेखील कथित हेरगिरीचे प्रकरणही अशाचप्रकारे पुढे आणले आहे. त्यामुळे देशातील काही राजकीय पक्ष आणि नेते ‘सुपारी एजंट’ आहेत की काय, शंका येत असल्याचा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवार, दि. १९ जुलै रोजी पत्रकार परिषदेत लगाविला.
‘पेगॅसस’तर्फे देशातील राजकीय नेते आणि अन्य लोकांची हेरगिरी झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. केंद्र सरकारतर्फे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत तसे स्पष्टीकरणही दिले आहे. त्यामुळे आपल्याच सरकारमधील अर्थमंत्र्यांची हेरगिरी गृहमंत्र्यांमार्फत करण्याचा इतिहास असणार्‍या काँग्रेसने भाजप आणि केंद्र सरकारवर आरोप करू नयेत. कारण, ज्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरू होतात, त्यावेळी आपले अपयश लपविण्यासाठी भलतेच मुद्दे काँग्रेसतर्फे पुढे आणले जातात. यापूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वीही ‘पेगॅसस’ प्रकरण आणले गेले होते. त्यानंतर २०२० साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले असता ‘सीएए’विरोधी दंगल घडविण्यात आली होती. त्यामुळे आपले अपयश लपविण्यासाठी काँग्रेस केविलवाणी धडपड करीत असल्याचा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगाविला.
भारताची कोरोना काळातही होत असलेली प्रगती काही आंतरराष्ट्रीय संस्थांना बघवत नसल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “भारताविरोधी आंतरराष्ट्रीय पातळीवर षड्यंत्र रचल्यानंतर देशातील काही राजकीय पक्ष आणि राजकीय नेते त्यांचे ‘सुपारी एजंट’ असल्यासारखे वागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या विशेष लाडक्या एका ’न्यूज पोर्टल’ला चीनकडून अर्थपुरवठा होत असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे काँग्रेसचा चेहरी पुन्हा एकदा उघडा पाडला जाईल,” असेही रविशंकर प्रसाद यांनी नमूद केले.