ध्यासकर्ता स्वयंसिद्धीचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jul-2021   
Total Views |

Arun Donde_1  H
 
 
गावाच्या स्वयंसिद्धतेसाठी कार्यारंभ करणार्‍या नाशिक येथील विधिज्ञ अरुण दोंदे यांच्या कार्याविषयी...
 
 
स्वयंसिद्ध असणे, हा मानवी जीवनातील एक महत्त्वाचा गुण आहे. स्वयंसिद्ध होणे कोणाला नाही आवडणार? व्यक्ती असो किंवा गाव, स्वयंसिद्ध असणे हे विकासाचे प्रतीक असते. नाशिक जिल्ह्यातील दरी गाव. हे गाव संपूर्णत: वनवासी समाजाचे. या गावाचा विकास व्हावा, यासाठी येथील उपसरपंच विधिज्ञ अरुण गुलाबराव दोंदे यांनी या गावाच्या विकासाचा चंग बांधला असून, त्या दिशेने त्यांचे अविरत कार्य सुरू आहे. दोंदे यांचे शिक्षण ‘बीए’, ‘एलएलबी’, ‘एफएमसी’, ‘एलएलएम’पर्यंत झाले असून, ते दरी या गावातील पहिले पदवीधर आहेत. ‘गंगापूर धरणग्रस्त’ म्हणून ‘भूमिहीन’ या ओळखीने त्यांचा आयुष्यप्रवास सुरू झाला. शेतकरी असलेले वडील हे लाकडे विकण्याचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. पुढे ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस’मध्ये त्यांच्या वडिलांना चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे जरा बरी परिस्थिती दोंदे कुटुंबाच्या नशिबात आली.
 
 
 
दरी गाव हे वनवासी गाव तेथे शिक्षण, रस्ते यांची मोठी वानवा. त्यातच समाजात अंधश्रद्धेचे मोठे स्थान. यामुळे दोंदे यांनी जगाच्या तुलनेत दरी गाव कसे मागे आहे, हे बालपणापासूनच अनुभवले होते. मूलभूत गरज असलेली वीजदेखील गावात नाही. अशा स्थितीत समाज हा वाचक व्हावा, यासाठी त्यांनी २००२ मध्ये गावात ‘समता सार्वजनिक वाचनालय’ स्थापन केले. ज्यांच्या घरात वीज नाही, अशा विद्यार्थ्यांनी येथे अभ्यास करावा, पुस्तकांच्या सान्निध्यात राहावे, यासाठी त्यांनी एकही पुस्तकाच्या कपाटाला कुलूप लावले नाही.
 
 
 
१९९७ मध्ये दोंदे हे समाजवादी चळवळीशी जोडले गेले. राष्ट्र सेवा यशवंत जोशी, रा. ग. गोरे, यशवंत जोशी यांच्या विचारांचा वारसा त्यांना मिळाला. या चळवळीसमवेत कार्य करताना त्यांनी विद्यार्थी व समाजातील अनेक प्रश्न सोडविण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रसंगी कारावासदेखील भोगला.
 
 
 
मात्र, उत्तम शिक्षण उपलब्ध होण्याचेच विचार मनात असल्याने त्याच दिशेने त्यांचे अविरत काम सुरू होते. २०१९ मध्ये दरीचे उपसरपंच म्हणून ते निवडून आले. समाजकारणात राहून हक्क मिळत नाही. राजकारणाच्या माध्यमातून गावाचा विकास करता येणे शक्य आहे. राजकारण ही केवळ विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही, याच विचारातून दोंदे यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. उपसरपंच झाल्यावर त्यांनी गावातील रस्ते व्यवस्थित करण्यास प्राधान्य दिले. प्रथमच ‘पेव्हर ब्लॉक’ असणारे रस्ते येथे साकारण्यात आले. भूमिगत गटार, मुबलक स्वच्छ पाणी, हायमास्ट, वीज, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुविधा गावात निर्माण करण्यावर दोंदे यांनी भर दिला. तसेच, गावातील अंधश्रद्धा दूर करण्याकामी जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, प्रथितयश वकील यांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन गावकरी यांना उपलब्ध करून दिले. स्त्रियांच्या पोटगी, होणारे गृहअत्याचार याबबत मार्गदर्शन उपलब्ध करून देत दोंदे यांनी गावात नवविचार जागृत करण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
तसेच, वनवासी समाजाच्या जमिनींचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्यदेखील दोंदे करत आहेत. सौरऊर्जेच्या माध्यमातून गावकर्‍यांना मोफत वीज कशी उपलब्ध होऊ शकेल, यासाठी दोंदे सध्या प्रयत्नरत आहेत. गावातील प्रमुख चौकांत सौरऊर्जेद्वारे गरम पाणी उपलब्ध करून देण्याचा दोंदे यांचा प्रयत्न आहे. यामुळे गावाला असणारे २६८ हेक्टरचे गायरान चराईपासून सुरक्षित होऊन गावात कुर्‍हाडबंदी होण्यास चालना मिळेल. सध्या गावातील २०० एकर वनीकरण उभे करण्यात आले. त्यात आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. तसेच, दरी देवस्थान परिसरात २०० एकर जागेत जंगली वृक्ष, बांबू वृक्ष यांची लागवड करण्यात आली आहे. याचबरोबर गिधाडांचे रक्षण व्हावे, यासाठी त्यांनी दरी येथील आडी डोंगर येथे गिधाड रेस्टॉरंट साकारले आहे. मृत्युमुखी पडणार्‍या गुरांच्या विषाणूपासून ‘टीबी’ व ‘हायझा’सारखे रोग होण्याची शक्यता असते. त्या रोगाला अटकाव व्हावा, यासाठी १७ गावांना या प्रकल्पात दोंदे यांच्या प्रयत्नातून समाविष्ट करण्यात आले आहे.
 
 
 
गावातील लोकांना गावातील घडामोडी कळाव्यात, शेतकरी वर्गाला कृषिज्ञानाचे आदानप्रदान करता यावे, यासाठी गावाचे रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे. ‘पेसा’ निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमार्फत सौरऊर्जेवर चालणारी पिठाची गिरणी उभी केली जाणार आहे. नियमितपणे घरपट्टी, पाणीपट्टी आदी कर अदा करणार्‍यास पुढील तीन महिने दरमहा ४० किलो दळण मोफत देण्यात येणार आहे. असा ठराव झाला आहे. यासाठी महिला सक्षमीकरण होण्याकामी बचतगटाला याचे काम देण्यात येणार आहे.
 
 
 
राष्ट्रविकासात गावे स्वयंपूर्ण होणे, हे अतिआवश्यक आहे. गावात शिक्षण, पाणी, वीज या मूलभूत गरजा गावाने स्वतः निर्माण केल्यास गावे स्वयंभू होऊ शकतात. हीच दोंदे यांची धारणा आहे. ‘गावाचा कारभार हा विकासाच्या दृष्टीने पुढे जावा, यासाठी सुशिक्षित युवकांनी पुढे येणे आवश्यक आहे.’ हे प्रचलित वाक्य केवळ बोलण्यापुरते नसल्याचे दोंदे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@