मुस्लीम राष्ट्रांचे अस्तित्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2021   
Total Views |

afghan_1  H x W
 
 
 
पाकिस्तानमध्ये सध्या अभूतपूर्व राजकीय आणि आर्थिक अस्थिरता आहे. अशा वेळी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना सक्रिय होऊन त्यांना अफगाण तालिबान्यांचे समर्थन मिळाले, तर पाकिस्तानचे राष्ट्र म्हणून अस्तित्व धोक्यात येईल, असे पाकिस्तानले वाटते. पण, पाकिस्तान म्हटले की, ‘गिरेंगे तो भी टांग उपर.’ धर्माच्या नावावर राष्ट्र टिकत नसते, तर मानवी मूल्य जपणार्‍या धार्मिकतेच्या संस्काराने राष्ट्र जगते, हे या मुस्लीम राष्ट्रांना कधी कळणार?
 
 
अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यामुळे अफगाणिस्तानचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. विदेशी सैन्य परतल्यामुळे ही रिक्तता निर्माण झाली आहे, असे अफगाणिस्तान सरकार प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अब्दुल्ला यांनी प्रशासकीय आणि अफगाण सर्वपक्षीय बैठकीत सांगितले. जसे अमेरिकन सैन्य माघारी परतले, तसे पुन्हा तालिबान्यांनी त्यांचे पाश पुन्हा अफगाणभोवती आवळले आहेत. दररोज हल्ले, अपहरण, दहशतवादी कृत्ये यांनी अफगाण हादरले आहे. तालिबान्यांच्या क्रूर नियमांनी महिलांचे जीवन तर नरक बनले आहे. अशा परिस्थितीमध्ये अफगाणी सरकार आणि प्रशासनालाही जाणीव होत आहे की, तालिबान्यांचे शासन हे केवळ महिला आणि मुस्लिमेतर नागरिकांसाठीच भयंकर नाही, तर राष्ट्र म्हणून अफगाणिस्तानचे अस्तित्वही धोक्यात आणणारे दहशतवादी कृत्य आहे.
 
 
 
अर्थात, जगभरातील अत्यंत क्रूर दहशतवाद्यांची भूमिका पाहिली तर वरवर ते सांगत असतात की, “आम्हाला अल्लाच्या मंजुरीची सत्ता आणायची आहे,” असे म्हणून ते जगभरातील मुस्लिमांचे समर्थन मिळवू पाहतात. कारण, सर्वशक्तिमान अल्लापुढे सर्व शून्य आहे, ही श्रद्धा जगभरातील मुस्लिमांची आहे. त्यामुळे अल्लाचे नाव घेऊन ‘तालिबान’सारख्या संघटना त्या-त्या देशात दहशतवाद माजवून राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक सत्ता आणायची आहे, असा आव आणत शुद्ध राजकीय स्वार्थाची सत्ता आणण्याचा अट्टाहास करतात. पण, त्यांच्या या कृत्याला जनता नाकारूही शकत नाही. कारण, या दहशतवादी संघटनांचे म्हणणे की, आम्ही अल्लाच्या संमतीचे राज्य आणण्यासाठी सगळे काही करतो. तुम्ही अल्लाची संमती नाकारता म्हणजे तुम्ही शैतानचे दूत असून तुम्हाला कयामतच्या रात्री दोजखच मिळणार. त्यामुळे कितीही काहीही झाले तरी मग या दहशतवाद्यांना समर्थन मिळतेच मिळते. आपल्याकडे सिनेमामध्ये अफगाणी पठाणांचे चित्रण फार वेगळ्या पद्धतीने केलेले दिसते. ‘तू न जा मेरे बादशहा’ म्हणणारी श्रीदेवी आणि ‘मैं वापस आऊंगा’ असे म्हणणारा अमिताभ बच्चन या दोघांच्या भूमिकेत अफगाणी पठाणांबद्दलचे सर्वसामान्य ज्ञान सामावलेले दिसते. पण, या सर्वांपलीकडे अफगाणचे तालिबानी दुःख खूप मोठे आहे. राष्ट्र म्हणून अफगाणला संपवण्याचे कटकारस्थान तालिबानी दहशतवादी करत आहेत. आता कुणी म्हणेल की, सच्चा मुसलमान हा कधीही जमिनीने म्हणजे देशाने बांधला जात नाही, तर तो मुस्लीम धर्माने बांधला जातो. पण, धर्माच्या सत्तेचे नाव घेत दहशतवादी आता त्यांच्या धर्मीयांचेच हत्याकांड करत आहेत. त्यामुळे मुस्लीम राष्ट्रात आता ‘मुस्लीम बद्ररहूड’ ही संघटना कालबाह्य झाल्याचे दिसते. अफगाणिस्तान याचे उत्तम उदाहरण!
 
 
 
असो. पाकिस्तानने तालिबान, शांतीवार्ता आणि अमेरिका या असल्या वर्तुळातून गेली काही दशकं आपली रोजीरोटी शाबूत ठेवली होती. पण, आता अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्याने या रोजीरोटीला सुरुंग लागला आहे. चीनचे मांडलिकत्व पत्करलेल्या पाकिस्तानने आता चीनला आपला बाप मानला आहे. चीनच्या कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला आता चीनला समर्थन करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पाकिस्तानचे म्हणणे आहे की, “अफगाणविरोधात म्हणजे तेथील तालिबान्यांविरोधातील युद्धात आपण अमेरिकेला आपली जमीन वापरू देणार नाही.” या सगळ्या घडामोडीसंदर्भात ‘इंटरनॅशनल क्राईसिस ग्रुप’ने याबाबत एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात प्रमुख निष्कर्ष आहे की, पाकिस्तान अफगाणिस्तान प्रशासनाच्या हतबलतेला आणि तालिबान्यांच्या उत्पाताला एक संधी म्हणून पाहत आहे. पाकिस्तान तालिबान्यांना अफगाणिस्तानच्या सत्तेवर बसवण्यासाठी इच्छुक आहे. कारण, तालिबान्यांचा अफगाणमधील दहशतवाद हा पाकिस्तानसाठीही धोकाच आहे. त्यामुळे पाकिस्तान तालिबान्यांना दुखवू इच्छित नाही. पाकिस्तानमध्ये सध्या अभूतपूर्व राजकीय आणि आर्थिक अस्थिरता आहे. अशा वेळी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना सक्रिय होऊन त्यांना अफगाण तालिबान्यांचे समर्थन मिळाले, तर पाकिस्तानचे राष्ट्र म्हणून अस्तित्व धोक्यात येईल, असे पाकिस्तानले वाटते. पण, पाकिस्तान म्हटले की, ‘गिरेंगे तो भी टांग उपर.’ धर्माच्या नावावर राष्ट्र टिकत नसते, तर मानवी मूल्य जपणार्‍या धार्मिकतेच्या संस्काराने राष्ट्र जगते, हे या मुस्लीम राष्ट्रांना कधी कळणार?
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@