अष्टपैलू झुंजार ‘स्नेह’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jul-2021   
Total Views |

Sneh Rana_1  H
 
 
 
भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये धडाकेबाज पुनरागमन करत देहरादूनच्या स्नेह राणाने केलेल्या कष्टाची आणि पराक्रमाची ही कहाणी...
 
 
क्रिकेट या खेळाला प्रचंड मोठे ‘ग्लॅमर’ आणि व्यावसायिक वलय भारतामध्ये प्राप्त झालेले पाहायला मिळते. यामध्ये ‘आयपीएल’ असो किंवा आंतरराष्ट्रीय सामने, क्रीडाप्रेमींमध्ये नवीन दमाच्या क्रिकेटपटूंच्या कामगिरीची चर्चा नेहमीच सुरू असते. आतातर भारतीय क्रिकेट संघाला जागतिक क्रिकेटमध्ये एक मोठा दर्जा मिळाला आहे. १९८३चा ‘आयसीसी विश्वचषक’ भारतीय संघाने जिंकल्यानंतर हळूहळू भारतीय क्रिकेटमध्ये प्रगती होऊ लागली. मात्र, काही कारणास्तव महिला क्रिकेटकडे दुर्लक्षच झाले. मात्र, आता हळूहळू हे चित्र बदलू लागले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महिला क्रिकेटचेही वेड भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये प्रकर्षाने वाढलेले दिसते. अंजुम चोप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यासह अनेक महिलांनी भारतीय महिला क्रिकेट संघाची पायाभरणी करण्यासाठी अनेक वर्षे उत्तम कामगिरी केली. नव्या पिढीनेही महिला क्रिकेट संगोपनाचा वारसा पुढे चालूच ठेवला आहे. अशाच या नव्या पिढीतील एक खेळाडू म्हणजे स्नेह राणा. थोडक्यात जाणून घेऊया तिच्या संघर्षाबद्दल...
 
 
 
स्नेह राणा हिचा जन्म दि. १८ फेब्रुवारी, १९९४ साली उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये झाला. तिचे आई-वडील हे देहरादूनपासून थोड्याच अंतरावर असलेल्या सिनोला या गावात शेतकरी होते. शेतीच्या कामातून मिळणार्‍या उत्पन्नातून तिचे वडील भगवान सिंह हे संसाराचा गाडा हाकत होते. अशामध्ये स्नेहला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ती शेजारीपाजारी असलेल्या मुलांसोबत क्रिकेट खेळत असायची. मात्र, तिचा पुढचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. जेव्हा ती नऊ वर्षांची होती, तेव्हा देहरादूनमधील ‘लिटल मास्टर्स क्रिकेट अकादमी’ने स्नेहच्या गावात एक क्रिकेट सामना आयोजित केला. या सामन्यामध्ये तिची कामगिरी पाहून प्रशिक्षक नरेंद्र शाह आणि किरण शाह यांनी त्यांच्या क्लबमध्ये तिचा समावेश करून घेण्याचे ठरवले. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिच्या वडिलांना सुरुवातीला हे मान्य नव्हते. मात्र, प्रशिक्षक नरेंद्र आणि किरण शाह यांनी स्नेहमध्ये असलेल्या कलागुणांची, कर्तृत्वाची जाणीव त्यांना करून दिली आणि तिला क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला. स्नेह तिच्या वडिलांची जुनी सायकल घेऊन रोज १२ किलोमीटरचा प्रवास करत क्लबमध्ये क्रिकेट प्रशिक्षण घेत होती. अशामध्ये तिने मन लावून प्रशिक्षण घेतले आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तिने फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीवरदेखील लक्ष केंद्रीत केले. यावेळी तिचे वडील भगवानसिंह राणा यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपली सर्व जमीन विकून हरियाणामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे स्नेहच्या इच्छाशक्तीला मोठे बळ मिळाले. यावेळी अनेकांनी तिच्या वडिलांना प्रश्न विचारले की, जर स्नेहची कारकिर्द यामुळे संपुष्टात आली तर काय? यावेळी त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “मला तिच्या क्षमतेवर आणि जिद्दीवर पूर्ण विश्वास आहे,” असे म्हणत मुलीच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी त्यांनी हातभार लावला.
 
 
 
दोन वर्षे हरियाणामध्ये राहून स्नेहला अपेक्षित संधी उपलब्ध होत नव्हत्या. म्हणून ते अमृतसरमध्ये वास्तव्यास आले. इथून पुढे स्नेहच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला. अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट सिलेक्टर्सचं लक्ष तिच्या अष्टपैलू कामगिरीकडे गेले आणि तिला भारतीय महिला संघाकडून खेळण्यास संधी देण्यात आली. 2014 साली तिला भारतीय महिला संघात एक दिवसीय सामन्यासाठी आणि ‘टी-ट्वेंटी’साठी स्थान मिळाले. परंतु, काही सामन्यांमध्ये तिची कामगिरी चांगली झाली नाही. त्यात तंदुरुस्तीचा अभाव, गडगडलेला फॉर्म आणि त्यात गुडघ्याची दुखापत यांमुळे २०१६ मध्येच तिला संघातून वगळण्यात आले. परंतु, तिने अजिबात हार न मानता स्वतःच्या कामगिरीकडे लक्ष दिले. जिद्द न सोडता तिने स्वतःचा फिटनेस आणि सातत्यपूर्ण कामगिरीकडे लक्ष दिले. तिच्या वडिलांनाही आपल्या मुलीने पुन्हा एकदा देशासाठी खेळावे, असे वाटत होते. अखेर देशांतर्गत झालेल्या क्रिकेट स्पर्धांमधील तिची कामगिरी पाहून तिला भारतीय महिला कसोटी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. मात्र, हे पाहण्याआधीच तिच्या वडिलांचे निधन झाले. पाच वर्षांच्या मोठ्या विश्रातीनंतर तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली आणि इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करून धडाकेबाज कामगिरी केली. पहिल्या इनिंगमध्ये तिने चार विकेट्स घेतल्या आणि शेवटच्या इनिंगमध्ये फलंदाजीसाठी आलेली असताना ८० धावांनी नाबाद राहिली. यामुळे पराभवाकडे जाणार्‍या भारतीय संघाने हा सामना अनिर्णीत काढला. एकीकडे महिला क्रिकेटचे हुकमी एक्के सुरुवातीलाच धारातीर्थी पडल्यानंतर नवव्या विकेटसाठी तिने तानिया भाटीयासोबत नाबाद १२४ धावांची अभेद्य भागीदारी केली. तसेच पदार्पणाच्या कसोटी सामन्यात चार विकेट्स आणि ८० नाबाद धावा करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिची ही कामगिरी वडिलांना समर्पित केली. येत्या भविष्यातही तिने भारतीय महिला क्रिकेटसाठी अशीच उत्तमोत्तम कामगिरी करत राहावी, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून स्नेहला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@