एकाच दगडात दोन पक्षी

    19-Jul-2021
Total Views |

Team India_1  H
 
 
भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये सध्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने एकतर्फी वर्चस्व गाजवत श्रीलंकेला पराभवाचे पाणी पाजले. पहिल्याच सामन्यात भारताने उत्तम प्रदर्शन करत निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला आहे. पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाने केलेल्या प्रदर्शनाबाबत काही क्रिकेट समीक्षकांनी महत्त्वाचे मत मांडले असून, ते विचार करण्यासारखे आहे. भारताने या दौर्‍यादरम्यान नवा कर्णधार आणि नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली होती. सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या हाती संघाच्या नेतृत्वपदाची धुरा सोपवली होती, तर भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांची संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. कर्णधार आणि प्रशिक्षकपदी दोन नव्या चेहर्‍यांना संधी देत निवड समितीने खरे तर एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम केल्याचे म्हणणे समीक्षकांचे आहे. कारण, २०१९ साली एकदिवसीय विश्वचषक आणि २०२१ सालची कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांचे जेतेपद पटकाविण्यात भारताला अपयश आले. या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांदरम्यान रवि शास्त्री हेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अपयश आल्यानंतर भारताने आपले मुख्य प्रशिक्षक बदलले पाहिजेत, असा मतप्रवाह त्यावेळी होता. कारण, भारतीय संघ रणनीती आखण्यात कमी पडल्याची टीका सर्वत्र झाली आणि त्यानंतर सर्वत्र ही मागणी होऊ लागली. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षक बदलण्याबाबत भूमिका घेतली नाही आणि रवि शास्त्रीच अद्याप भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम आहेत. द्रविड यांच्या रूपात नव्या चेहर्‍याला संधी देत ‘बीसीसीआय’ने नवा प्रयोग केला आहे. पहिल्याच सामन्यात हा प्रयोग यशस्वी होतानाच दिसत आहे. द्रविड यांच्याप्रमाणेच शिखर धवननेही कर्णधारपदाला साजेशी खेळी करत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. विराट कोहलीप्रमाणेच रोहित शर्मा, तसेच शिखर धवनही नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे या मालिकेदरम्यान दिसून येत आहे. भारताचे दोन्ही प्रयोग सध्या यशस्वी होताना दिसत असल्याचे समीक्षकांचे म्हणणे आहे.
 
 

वेळ आत्मचिंतनाची!

 
 
कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ हा दुय्यम दर्जाचा संघ असल्याची टीका श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी केली होती. मात्र, मालिकेच्या पहिल्याच सामन्यात नवख्या खेळाडूंनी जे प्रदर्शन केले, त्यानंतर अर्जुन रणतुंगा यांच्यासह भल्याभल्यांची बोलती बंद केली आहे. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या भारतीय संघाबाबत श्रीलंकेतील काही माजी खेळाडूंनी टीका करत द्रविड यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. राहुल द्रविड हे क्रिकेटविश्वात ‘द वॉल’ म्हणून ओळखले जातात. कसोटी क्रिकेटचे ‘स्पेशलिस्ट’ म्हणून क्रिकेटविश्वात त्यांची ख्याती आहे. मात्र, सध्याच्या टी-२० आणि एकदिवसीय संघासाठी त्यांचे मार्गदर्शन किती उपयुक्त ठरेल, असा सवाल श्रीलंकेतील काही माजी क्रिकेट खेळाडूंनी उपस्थित केला होता. मात्र, राहुल द्रविड यांनी भारतीय संघाकडून खेळताना जवळपास ३४४ एकदिवसीय सामने खेळले असून दहा हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. १२ शतकं आणि ८३ अर्धशतकं राहुल द्रविड यांच्या नावावर आहेत. २००८ सालापासून सुरू झालेल्या ‘इंडियन प्रीमिअर लीग’च्या (आयपीएल) आधीच्या सत्रांत राहुल द्रविडच ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’ (आरसीबी) संघाचे कर्णधार होते. एकदिवसीय आणि ‘टी-२०’ या दोन्ही प्रकारच्या खेळांचा राहुल द्रविड यांचा अनुभव उत्तम असून, यासाठीच ‘बीसीसीआय’ने त्यांची प्रशिक्षकपदी निुयक्ती केली आहे. याचा अभ्यास श्रीलंकेच्या माजी खेळाडूंनी कदाचित केला नसावा. ‘टेस्टी प्लेअर’ असणार्‍या द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा भारतीय संघ हा धीम्या पद्धतीने आणि सांभाळून खेळेल, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. मात्र, घडले नेमके उलटेच. भारतीय संघाने ताबडतोब फलंदाजी करत अनेकांचा अंदाज फोल ठरवला. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, विशेष रणनीती आदी कोणत्याही बाबतीत श्रीलंकेचा प्रभाव दिसून आला नाही. श्रीलंकेचे माजी खेळाडू केवळ टीका-टिपण्णी करण्यात व्यस्त राहिले. आपल्या संघाची कामगिरी कशी सुधारता येईल, याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. परिणामी, भारताने एकतर्फी वर्चस्व मिळवत पहिल्याच सामन्यात पराभवाची धूळ चारली. टीका करणार्‍यांवर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, हे विसरू नये म्हणजे झाले!
 
- रामचंद्र नाईक