लखनऊ - उत्तर प्रदेशमधील काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी राजस्थानमधील बेरोजगार तरुणांना मारहाण केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशामध्ये प्रियांका गांधी काॅंग्रेसच्या प्रभारी आहेत. राजस्थानमधील बेरोजगार तरुण त्यांना भेटण्यासाठी लखनऊला आले होते.परंतु, त्यांना कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रोखले आणि संगणक पदवीधर युवकांना मारहाण केली.
काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये अनेक बेरोजगार तरुण जखमी झाले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे स्पष्टपणे म्हणाले होते की, सरकार कोणाचेही असले तरी कोणीही सर्व लोकांना नोकरी देऊ शकत नाही. या वक्तव्यानंतर बेरोजगार तरूणांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यानंतर राजस्थानमधील १०० हून अधिक बेरोजगार तरुण दिल्ली ते जयपूर पर्यंत आंदोलन यात्रा करत आहेत. या दरम्यान प्रियांका गांधी यांनी लखनऊमध्ये 'बेरोजगार संमेलन' आयोजित केल्याची माहिती मिळाल्यानंतर ते त्याठिकाणी पोहोचले.
या घटनेविषयी माहिती देताना राजस्थानमधील बारान येथील आमदार प्रतापसिंह सिंघवी म्हणाले, “प्रथम राजस्थानमधील बेरोजगार तरुणांना लखनऊमधील प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर प्रियांका गांधींना भेटण्यासाठी दिवसभर बसून राहावे लागले. त्यानंतर रात्री कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांवर हल्ला केला. प्रियंका जी, कृपया उत्तर द्या राजस्थानमधील बेरोजगारांना असे का वागवले जाते? "जखमी युवकाची छायाचित्रे शेअर करताना भाजप नेते प्रतापसिंह सिंघवी यांनी विचारले की या बेरोजगार युवकाचा काय दोष?.