पूजनीय बाळासाहेब ठाकरे,
आपणास सादर वंदन !
आज थेट आपल्यालाच पत्र लिहितोय , माहिती नाही माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतील का पण तरीही आज लिहितोच.
साहेब तसा मी बाल शिवसैनिक , म्हणजे ज्याप्रकारे रा.स्व. संघामध्ये अनेक जण बाल काळापासून स्वयंसेवक असतात तसा मी वयाच्या ७ व्या वर्षापासून आपल्या विचारांचा सैनिक . पण साहेब आज मला त्याच आपल्या सेनेवर कीव येते . आज आपल्याला पत्र लिहिण्याचं कारण ही तेच आहे . साहेब आज आपण हवे होता ! ज्या बाळासाहेबांनी तळागाळात जाऊन हिंदुत्वाचा अभिमान जागवला , छत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड सन्मान दिलात त्याच बाळासाहेबांचा आज आपल्या उद्धव , आदित्य आणि पक्षातील लाचार कार्यकर्त्यांना विसर पडलाय.
साहेब , आज आपले वारस सत्तेच्या चतकोर तुकड्यासाठी लाचार होऊन औरंगजेब आणि टिपू सुलतानची जयजयकार करतायत ? वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेची आज औरंगजेब सेना होतीय की काय?असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडतोय. आपल्या सेनेचा एक खासदार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी करतो की मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द येथे होत असलेल्या उड्डाणपुलाला मोईनुद्दीन चिष्ती यांचं नाव द्यावं , का ? महाराष्ट्रात कोणी महापुरुष झालेच नाहीत का ? दुसरीकडे ज्या मुंबईवर कायम आपण अधिराज्य गाजवलं त्याच मुंबईमध्ये शिवसेना शासित मुंबई महानगरपालिका ने गोवंडीतील एका उद्यानाला टिपू सुलतान चे नाव देण्यावर शिक्कामोर्तब केला आहे.
टिपू सुलतान सारखा धर्मांध, क्रूरकर्मा, अत्याचारी व हिंदू द्वेष्टा राजा ज्याने म्हैसूर राज्याला मुस्लिम राष्ट्र घोषित केले होते, ज्याने राज्यामध्ये सर्व हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्याची घोषणा केली, लाखो हिंदूंची कत्तल केले अश्या टिपू सुलतान चे नाव मुंबईतील एक उद्यानाला देण्याचे ठराव आपली सेना करते हे दुर्देवी आहे. शेकडो हिंदूंना फाशी देणारा, हजारो मंदिरांचा विध्वंस करणारा, लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा, स्त्रियांवर अत्याचार करणारा शासक योग्य व महान असू शकतो काय ? हिंदूंच्या मानबिंदूवर प्रहार व हिंदूंच्या धार्मिक आस्थेला ठेच पोहोचवणारा आज सत्तेसाठी यांना प्रिय वाटू लागला आहे.
सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं , आपले तत्व सोडले पण आज यांनी साहेब तुमचा विचारही सोडला याचं वाईट वाटत आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते पाऊल आपले चिरंजीव उचलत आहेत . शिवसेना ही कायम आपल्या हिंदुत्वाच्या विचारामुळे आणि आपल्या स्वाभिमानामुळे ओळखली जायची पण आज दुर्दैव असं की आज देशात सर्वात बहादूर चमचा हाही शिवसेनेचाच असावा ? ज्या व्यक्तीचे पश्चिम महाराष्ट्र सोडले तर काही वर्चस्व नाही ज्यांना आपण शेवट पर्यंत विरोध केला त्या साखर / बँक सम्राटांना या देशाचे पंतप्रधान म्हणून शिवसेना पाहतेय असे म्हणणाऱ्या चमच्यांची देखील कीव येते. साहेब शेवटी इतकंच म्हणेल '' आज आपण हवे होता ''
- योगेश्वर पुरोहित , मुंबई