मुंबई : महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील शासकीय कर्मचारी तसेच जिल्हापरिषद अंतर्गत सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. ‘आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार याचिकेवर उत्तर देताना ही माहिती दिल्याचे गलगली यांनी सांगितले आहे. “राज्य प्रशासनात एकूण २९ विभाग असून, या रिक्त पदात १६ असे विभाग आहेत, ज्याची माहिती अद्ययावत नाही,” असे गलगली यांनी म्हटले आहे.
‘आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे १८ जून, २०२१ रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती देताना मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. “मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असून त्याचा थेट नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने सदरील रिक्त पदे लवकरात लवकर भरावी,” अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.