मुंबई : मुंबईच्या गोवंडीतील ‘एम’/पूर्व विभागामधील उद्यानाला ‘टिपू सुलतान‘चे नाव देण्याच्या मागणीवरून गुरुवारी मुंबईत राजकारणाला जोरदार सुरुवात झाली. मुंबई महापालिकेतील एका नगरसेविकेने बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत दिलेल्या नामकरणाच्या प्रस्तावाला भाजपच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवून समिती अध्यक्षांना घेराव घातला. या सर्व घटनांमुळे गुरुवारी महापालिकेतील वातावरण प्रचंड तापले होते.
महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १३६च्या नगरसेविका रुक्साना नाझीम यांनी महापालिकेच्या उद्यानास ‘टिपू सुलतान उद्यान’ असे नाव देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. सदरील प्रस्ताव गुरुवार, १५ जुलै रोजी झालेल्या बैठकीत चर्चेसाठी आल्यानंतर या प्रस्तावाला विरोधी पक्ष भाजपने कडाडून विरोध केला. “आमच्या नगरसेवकांनी सदरील विषयावर उपसूचना मांडण्यासाठी वारंवार मागणी करूनही त्यांना बोलायला दिले गेले नाही व उपसूचनादेखील मांडू दिली नाही. भाजपच्या सर्व सदस्यांनी महापौरांना भेटून लोकशाहीची मुस्कटदाबी होत असून नगरसेवकांना समितीच्या सभेत बोलू दिले जात नाही, अशी तक्रारही दिली आहे. उद्यानाला ‘टिपू सुलतान’चे नाव देण्यास आमचा विरोध आहे. वेळ पडलीच तर त्यासाठी रस्त्यावर उतरू,” अशी आक्रमक भूमिका महापालिकेतील भाजपच्या सदस्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
भाजपचे समिती अध्यक्षांना पत्र
बाजार समितीच्या बैठकीपूर्वी भाजप नगरसेवकांतर्फे अध्यक्ष-बाजार व उद्यान समिती यांना प्रस्तावाच्या विरोधात पत्र दिले गेले. भाजपने आपल्या पत्रात म्हटले की, “टिपू सुलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा, जुलमी, अत्याचारी व हिंदूद्वेष्टा राजा होता. अनेक राज्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्याची घोषणा केली होती. लाखो हिंदूंची हत्या/कत्तल करत असताना त्याने 40 हजार ख्रिश्चनांनाही बंदी बनवले होते. असा टिपू सुलतान हा धर्मांध, क्रूरकर्मा, अत्याचारी आणि दक्षिणेतील औरंगजेब म्हणून नावाजलेला कुशासक होता. त्यामुळे शेकडो हिंदूंना फाशी देणारा, हजारो मंदिरांचा विध्वंस करणारा, लाखो हिंदूंचे धर्मांतर करणारा, स्त्रियांवर अत्याचार करणारा शासक योग्य व महान असू शकतो काय? सदर उद्यानास मौलाना आझाद, अब्दुल कलाम, अशा भारतमातेच्या थोर सुपुत्रांची नावे देण्यास आमचा संपूर्ण पाठिंबा आहे,” अशी भूमिका भाजपने पत्रात मांडली आहे.
शिवसेनेची लाचारी स्पष्टपणे दिसून आली : खासदार मनोज कोटक
याआधी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे ठेवले पाहिजे, असा प्रस्ताव मी दिला होता, तेव्हा शिवसेनेच्या खासदाराने या उड्डाणपुलास सुफी संत सुलतानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज असे नाव देण्यास सांगितले होते. आता गोवंडी परिसरातील उद्यानास ‘टिपू सुलतान’ असे नाव देण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. यातून शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली आहे. यातून शिवसेनेची लाचारी स्पष्टपणे दिसून येते.
छत्रपतींचा विरोधक आदरणीय कसा? : मंगलप्रभात लोढा
मुंबईतील एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा घाट शिवसेनाशासित व्यवस्थेने घातला आहे, ही अत्यंत दुःखद बाब आहे. हिंदूंचा संहार करणारा, छत्रपतींच्या पेशव्यांविरोधात लढलेला टिपू सुलतान महाराष्ट्रात कशा प्रकारे आदरणीय असू शकतो? जागे व्हा! नाहीतर हे विष महाराष्ट्र भर पसरेल!
शिवसेनेचा छुपा पाठिंबा : अतुल भातखळकर
टिपू जयंती साजरी करणार्या शिवसेनेने आता गोवंडीत उद्यानाला टिपूचे नाव देण्याच्या प्रस्तावाला छुपा पाठिंबा दिला आहे. हिंदुत्वाचा टिळा लावायचा हिंदूंच्या कत्तली करणार्यांना खांद्यावर घेऊन नाचायचे, असे उफराटे राजकारण शिवसेनेने सुरू केले आहे.