रायबरेलीसदेखील ‘दिशा’ देणार स्मृती इराणी !

    15-Jul-2021
Total Views |
si_1  H x W: 0


इराणींच्या अध्यक्षतेखाली सोनिया गांधींना काम करावे लागणार
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्रालयाच्या जिल्हा विकास समन्वय व देखरेख समितीच्या (दिशा) रायबरेली जिल्हाध्यक्ष पदावर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांना उपाध्यक्षपद दिले असून त्या आता इराणींच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज पाहतील. त्यामुळे आता स्मृती इराणी अमेठीसह रायबरेलीसही ‘दिशा’ देणार आहेत.
 
 
 
केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने संसद, राज्य विधीमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था (पंजायती राज संस्था आणि नगरपालिका, महानगरपालिका) यांच्यामध्ये सुयोग्य समन्वय, कार्यक्षमतेने विविध योजनांची अंमलबजावणी, चौफेर विकास यासाठी जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची (डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कोऑर्डीनेशन अँड मॉनिटरिंग कमिटी - दिशा) स्थापना केली आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती मंत्रालयातर्फे केली जाते. या पदांवर त्या त्या भागातील लोकसभा प्रतिनिधींची निवड करण्यात येते.
 
 
 
त्यानुसार केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयातर्फे रायबरेली जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता रायबरेलीस ‘दिशा’ देण्यासाठी सोनिया गांधी यांना स्मृती इराणींच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. यापूर्वी २०१८ साली रायबरेली दिशा समितीच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी तर उपाध्यक्षपदी अमेठीचे तत्कालीन खासदार राहुल गांधी यांची निवड करण्यात आली होती.
 
 
 
गांधी कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठी येथून तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव २०२९ सालच्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी केला होता. निवडणुकीपूर्वीच आपल्या पराभवाचा अंदाज आलेल्या राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथूनही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री इराणी आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली या पारंपरिक मतदारसंघातही सक्रीय होत आहेत. गांधी कुटुंबाच्या या दोन पारंपरिक मतदारसंघांमध्ये विकासाचा मोठा अनुशेष आहे. ते नेमकेपणाने हेरून इराणी यांनी काम केले होते आणि २०१९ साली अमेठीतून विजय मिळविला होता. आता रायबरेलीमध्येही त्या सक्रीय झाल्या आहेत, त्यामुळे सोनिया गांधी यांच्यापुढील अडचणी वाढणार, यात कोणतीही शंका नाही.
 
 
 
विधानसभा निवडणुकीमध्येच परिणाम दिसणार ?
 
 
येत्या काही महिन्यातच उ.प्र. विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आता अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. ‘दिशा’ समितीच्या अध्यक्षपदावरून काँग्रेसला पहिला शह देण्यात आला आहे. त्यातच रायबरेलीमधील काँग्रेस आमदार आदिती सिंह या आपल्या स्वतंत्र बाण्यासाठी ओळखल्या जातात. काँग्रेस नेतृत्वासोबतही त्यांचे फारसे सख्य असल्याचे चित्र नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.