नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत जवळपास ४१ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशातील अनेक राज्ये ही कोरोनामुक्तीच्या वाटेवर असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांचे प्रमाण हे अल्प प्रमाणात असल्याचे चित्र आहे.
महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण ३ कोटी, १ लाख, ४ हजार, ७२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर ९७.२८ टक्के असून याचा आलेख चढता आहे. गेल्या २४ तासांत ३८ हजार, ७९२ नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. सलग १७ दिवस ५० हजारांपेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. भारतात आज उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख, २९ हजार, ९४६ असून उपचाराधीन रुग्ण संख्या ही एकूण ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण संख्येच्या केवळ १.३९ टक्के आहे.
देशाच्या कोरोना चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ होत असून गेल्या २४ तासांत १९ लाख, १५ हजार, ५०१ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ४३.५९ कोटींहून अधिक (४३,५९,७३,६३९) चाचण्या करण्यात आल्या. देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असताना साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दर सातत्याने खाली येत आहे. सध्या साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दर २.२५ टक्के आहे. आज दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर २.१० टक्के आहे. दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ दर सलग २३ व्या दिवशी तीन टक्के इतका कमी तर सलग ३७ व्या दिवशी पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे.
महाराष्ट्र आणि केरळ ठरत आहेत ‘कोरोना हॉटस्पॉट’
देशातील दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या आता ४० हजारांच्या खाली आहे. मात्र, त्यामध्येही सर्वाधिक कोरोना रुग्णांची महाराष्ट्र आणि केरळ ही दोन राज्ये घालत आहेत. कोरोना संसर्गाचे व्यवस्थापन करण्यात केरळ राज्याने अतिशय चांगले काम केल्याची टिमकी वाजविण्यात येत होती. मात्र, केरळ सध्या दररोज १५ हजारांच्या घरात कोरोना रुग्णांची भर घालत असून गेल्या २४ तासांत केरळमध्ये १४ हजार, ५३९, तर महाराष्ट्रात ७ हजार, २४३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे स्वयंघोषित ‘बेस्ट’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोरोना व्यवस्थापनात अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट आहे.