काव्यप्रतिभेचा विलास - ’कालिदास’!

    14-Jul-2021
Total Views |

kalidas 1_1  H
 

साधारणपणे ज्येष्ठ महिना संपला की, आषाढाच्या अगदी सुरुवातीलाच आठवण होते ती कविकुलगुरू कालिदासाची! ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हणजेच आषाढाची प्रतिपदा ही कालिदासाच्या जीवन व कार्याला उजाळा देणारी मानली जाते. महाराष्ट्राच्या रम्य अशा रामगिरी पर्वतीय प्रदेशात निवास करताना पहिल्यांदाच जेव्हा त्याला मनोरम असे मेघमंडळ दृष्टीस पडले, तेव्हा तो आपल्या प्रियतमेच्या गोड आठवणींना उजाळा देऊ लागतो. त्याचवेळी त्याचा वाग्विलास बहरू लागतो. हेच काव्य पुढे मेघदूतासारख्या खंडकाव्याच्या रूपाने जगासमोर येते. कदाचित याच कारणामुळे नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढ प्रतिपदेला कालिदासाची जयंती साजरी करण्याचा प्रघात आहे.
 
 
आपल्या अप्रतिम व अगाध काव्यप्रतिभेने समग्र अर्वाचीन संस्कृत साहित्यावर मानाचा ठसा उमटवणार्‍या या कविश्रेष्ठाने काव्य व नाट्यक्षेत्रात जे मौलिक व अलौकिक असे योगदान दिले आहे, त्याला खरोखरच तोड नाही. प्रसिद्ध साहित्यशास्त्री आचार्य मम्मट यांनी काव्यनिर्मितीची उद्दिष्टे कथन करताना कवीच्या अंगी आवश्यक असणारी जी प्रतिभाशक्ती, नैपुण्य, अभ्यास, अभिरुची इत्यादी कौशल्ये मांडली आहेत, ती कालिदासाच्या अंगी पूर्णपणे रुजल्याचे निदर्शनास येते. त्याचबरोबर काव्याची सर्व लक्षणे त्याच्या साहित्यात अंतर्भूत झाल्याचेही दृष्टीस पडतात. आपल्या भारदस्त अशा सृजन शैलीमुळे कालिदासाने स्वतःकरिता ‘कविताकामिनीचा विलास’ या विशेषणाने विलक्षण असा गौरव हस्तगत केला आहे. तसेच ‘उपमा कालिदासस्य’ या उक्तीमुळे उपमा-उपमेयाच्या अलंकारिक काव्यशैलीतील सर्वोत्कृष्टता गाठणारा तो महामेरू ठरला. काव्यातील विविध रस, सुंदर अलंकारिक भाषा, रम्य प्रकृती वर्णन व उत्कृष्ट अशी चरित्रचित्रणे यांमुळे आजही कालिदास एक प्रतिभासंपन्न कवी म्हणून अजरामर ठरला आहे. त्याच्या सृजनशील साहित्याचे अमरत्व आजही शेकडो वर्षांनंतर चिरंतनपणे टिकून आहे. अपूर्व विद्वत्ता आणि उत्कृष्ट कलानैपुण्यामुळे कालिदासाची ‘ऋतुसंहार’, ’कुमारसंभव’, ’रघुवंशम्’ व ’मेघदूतम्’ ही चार काव्ये तर ‘मालविकाग्निमित्रम्’, ‘विक्रमोर्वशीयम्’ व ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ ही नाटके रसिकजनांच्या हृदयावर कितीतरी वर्षांपासून अधिराज्य करीत आहेत.
 
 
संस्कृत साहित्यातील पंच महाकाव्यांमध्ये ‘रघुवंश’ व ‘कुमारसंभव’ यांचा मोठ्या गौरवाने समावेश होतो. विशेष म्हणजे, कालिदासाच्या समग्र काव्यामध्ये भाषिक माधुर्य, भावनिक गांभीर्य, नैसर्गिक सौंदर्य तर मानवी गुणांचे सर्वोत्तम व सुलभ असे विश्लेषण झालेले दिसून येते. त्याच्या काव्य व नाटकांमध्ये नद्या, पर्वत, झाडे, पशू, पक्षी आणि विविध रूपांतील स्त्री-पुरुषांच्या वैविध्यपूर्ण छटा सजीव झाल्याच्या दृष्टीस पडतात. कालिदासाच्या सर्वच वाङ्मयामध्ये निसर्गाला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. प्राकृतिक सौंदर्यामुळे आणि मानवाच्या अंत:करणात असलेल्या भावनांमुळे कालिदास यशोशिखरावर पोहोचतो. त्याची प्रसादगुणाने नटलेली मधुर वाणी आणि गंभीर अर्थाची कल्पनाशक्ती ही फारच हृदयस्पर्शी असून त्याचा कला आविष्कार हा संस्कृत भाषेचा शृंगार मानला जातो. तसेच कालिदासाच्या साहित्यात प्रतिबिंबित झालेल्या सर्वच पात्रांमधून भारतीय संस्कृतीच्या आदर्शांचे दर्शन घडते.कालिदासाची काव्यप्रतिभा इतकी सर्वोत्तम की, प्रसिद्ध भाष्यकार मल्लिनाथ यांनी त्याच्याविषयी गौरवोद्गार काढताना म्हटले होते-
 
कालिदासगिरां सारं कालिदास: सरस्वती।
चतुर्मुखोऽथवा ब्रह्मा विदुर्नान्ये तु मादृशा:॥
 
म्हणजेच कालिदासाच्या विद्वत्तापूर्ण अशा वाणीच्या सारतत्वाला आजपर्यंत फक्त तिघांनीच समजले आहे. पहिला म्हणजे ब्रह्मदेव, दुसरी वाणीची देवता सरस्वती आणि तिसरा म्हणजे तो स्वतः कालिदासच! पण, माझ्यासारखे अल्पज्ञ मात्र त्यांच्या काव्याला समजण्याकरिता असमर्थ आहेत. खरोखरच तत्कालीन विद्वानांची ही असमर्थता कालिदासाला आणखीन उच्च शिखरावर घेऊन जाते.कालिदास इतका उच्च कोटीचा की त्याची बरोबरी त्याकाळी इतर कोणीही कवी करू शकत नव्हता. म्हणूनच त्याच्याविषयीचा एक प्रसंग सुभाषिताच्या माध्यमाने वर्णिला जातो, त्याचा भावार्थ असा - पूर्वी एकदा श्रेष्ठ कवींची मोजदाद सुरू झाली असता, त्यावेळी कालिदासाच्या नावाने सहजच पहिली करंगळी पडली. नंतर त्याच्या तोडीचा दुसरा कवी सापडलाच नाही. म्हणून करंगळीच्या बाजूचे बोट ’अनामिका’ या नावाने आजही सार्थक ठरते. तेव्हापासून ‘अनामिका सार्थवती बभूव।’ हे कालिदासाच्या सर्वोत्तमतेला प्रकट करणारे वचन प्रसिद्ध झाले आहे.
 
कालिदासाची काव्यदृष्टी ही सूक्ष्म स्वरूपाची आहे. निसर्गातील प्रत्येक घटकांकडे तो निरीक्षक दृष्टीने पाहतो. त्याचबरोबर मानव समूहाच्या विविध भाव-भावनांनाही तो स्पर्श करतो. त्याच्या साहित्यातील निसर्गवर्णने अभ्यासताना त्याने निसर्गातील लहान लहान छटांचा अभ्यास किती सखोलपणे केला असेल, याची जाणीव होते. त्याचबरोबर विविध नाटके अभ्यासताना स्त्री-पुरुषांच्या अंतरंगात घडलेल्या विविध स्वभावगुणांचेही दर्शन घडते. मानवी जीवनात रसांचे फार महत्त्व आहे. निरस माणूस जीवनाला ओळखू शकत नाही. म्हणून कालिदासाने केवळ मानवाचेच नव्हे, निसर्गातील विविध तत्त्वे आणि पशुपक्ष्यांच्याही जीवन वैशिष्ट्यांचा अभ्यास अतिशय जवळून केल्याचे पाहावयास मिळते. त्याच्या साहित्यात भारतातील अनेक भूप्रदेशांचे भौगोलिक व ऐतिहासिक उल्लेख आढळून येतात. ‘मेघदूता’चे अध्ययन करताना महाराष्ट्रातील रामटेकपासून ते उत्तर भारतातील कैलाश पर्वतापर्यंतचा प्रवास कालिदासाने किती सूक्ष्मपणे केला आहे, हे जाणवते.
 
 
‘रघुवंशम्’ या महाकाव्यात भारताच्या रघुवंशीय राजांची केलेली वर्णने खरोखरच मनाला गवसणी घालतात. रघु, दिलीप, अज, श्रीराम यांसारखे पुण्यवान राजे त्यांच्या शौर्य, धैर्य, चारित्र्य, दया, दाक्षिण्य, करुणा, प्रजावात्सल्य इत्यादी सद्गुणांमुळे कसे महान ठरले, याचे अप्रतिम वर्णन कालिदासाने केले आहे. लंका विजयानंतर श्रीराम जेव्हा पुष्पक विमानात बसून अयोध्येकडे परतू लागतात, तेव्हा रामांनी सीतेला भारताच्या सुजला, सुफला, सस्य श्यामला भूमीचे दर्शन घडविले. हे प्रसंग वाचून कालिदासाने केलेला अभ्यासपूर्ण प्रवास लक्षात येतो. ’ऋतुसंहार’ या काव्यात तटस्थ निरीक्षकाच्या भूमिकेत तर यक्षाच्या आणि पुरुरव्याच्या भूमिकेत आपुलकीच्या नात्याने कालिदासाने निसर्गाचा परिचय घडविला आहे. ’अभिज्ञान शाकुन्तलम्’ या नाटकात कालिदास शकुंतलेला खरोखरच निसर्गकन्या बनवितो. शकुंतलेचे निसर्गाशी किती जवळचे नाते आहे, त्याबरोबरच लता, वेली, कुसुमांवर ती भगिनीप्रमाणे प्रेम करते. यावरून सद्ययुगात निसर्गापासून दूर जाणार्‍या मानव समूहाला निसर्गसंवर्धन व पर्यावरणरक्षणाकरिता जागृत राहण्याचा संदेश मिळतो. त्याचबरोबर कालिदासाच्या समग्र वाङ्मयातून आदर्शवादी विचार, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी मूल्ये जपण्याचाही संदेश मिळतो.आपल्या सर्वोत्तम काव्य गुणाधिक्यांमुळे कविजनांच्या कुळाचे गुरुपद प्राप्त करणार्‍या या महान कवीची धवल कीर्तीगाथा नवकवींसाठी प्रेरणा प्रद ठरो, ही अभिलाषा! जयंती दिनानिमित्त अशा या थोर कविकुलगुरू, काव्यशिरोमणीला शतशः अभिवादन!

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य