लखनऊ - उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमधील काकोरी येथून अटक करण्यात आलेल्या अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांकडून राम मंदिर आणि त्याभोवतीच्या परिसराचा नकाशा देखील सापडला आहे. या अतिरेक्यांकडून इतर अनेक शहरांचे नकाशेही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे राम मंदिर अतिरेक्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काकोरीमधून अटक केलेल्या दहशतवाद्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधकामाच्या जागेची पाहणी केल्याची माहिती समोर आली आहे. यासह त्यांच्याकडून काशी, मथुरासारख्या धार्मिक स्थळांचे नकाशेही जप्त करण्यात आले आहेत. या नकाशांवर काही खुना करुन त्या जागा चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे हे नेटवर्क एकमेकांशी संपर्कात होते. यावर झालेले संभाषण पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणी गेल्या चोवीस तासांमध्ये डझनहून अधिक संशयितांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली. बॉम्ब बनवण्यासाठी या दहशतवाद्यांनी माचिसच्या काड्यांवर लागलेली दारू वापरली. या दहशतवाद्यांनी कानपूर येथून मोबाइल फोन विकत घेतले होते आणि नई सडक परिसरात राहणाऱ्या त्यांच्या एका साथीदाराबरोबर बैठक केली होती. नेटवर्कमध्ये अधिकाधिक लोकांना जोडण्यासाठी मिन्हज आणि मुशीर या दहशतवाद्यांची बैठक झाली. संभल येथून दोन जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. पोलिसांनी या दोघांविरूद्ध पुरेसे पुरावे एकत्र केले आहेत.
अल कायदाच्या गझवतुल हिंदशी संबंधित असलेल्या या दोन्ही दहशतवाद्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या (15 ऑगस्ट) दिवशी देशातील अनेक भागात दहशत निर्माण करण्याचा कट रचला होता. माळिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांना बाॅम्ब तयार करण्यासाठी पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत: वेबसाइट बघून बॉम्ब बनवले आणि दोन हजार रुपये गुंतवून कुकर बॉम्ब बनवला. मिन्हजची पत्नी आणि तिच्या कारबद्दलही अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत. त्याच्या घरातूनच प्रेशर कुकर आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. मिन्हाजची पत्नी इंटिग्रल युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहे. या विद्यापीठाचा वाहन पासही त्यांच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. इंटिग्रल युनिव्हर्सिटी ही लखनौमध्ये चालू असलेली अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे.