समाज सोबत आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2021   
Total Views |

manse_1  H x W:


भटक्या-विमुक्त समाजाचे मुंबईत एक हक्काचे समाजकल्याण केंद्र असावे, यासाठी झटणार्‍या आणि समाजसंघटन करणार्‍या सहदेव रसाळ यांच्या जीवनाची कथा...

“समाजाची बांधिलकी जपली तर समाजही आपली बांधिलकी जपतो. समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे. आयुष्याच्या विविध वळणावर मी मोहरीइतके समाजकर्तव्य केले असेल, तर समाजाने जातीपातीच्या पलीकडे जाऊन मला त्याबदल्यात भरभरून दिले आहे,” सहदेव रसाळ सांगत होते. सहदेव हे ‘विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद (अ{खल भारतीय)मुंबई’चे सहकार्यवाह आहेत. तसेच ते ‘सरोदे समाज उन्नती मंडळ मुंबई’चे अध्यक्ष आहेत. बोरिवली येथील ‘राजर्षी शाहूमहाराज संस्कार केंद्रा’साठीचे त्यांचे योगदान मोठे आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात भटके- विमुक्त समाजाच्या एकीकरणासाठी आणि उन्नतीसाठी सहदेव प्रयत्नशील असतात. त्यांच्या समाजकार्यासाठी त्यांना अनेक मानसन्मानही प्राप्त झाले आहेत. सहदेव यांना आयुष्यात प्रचंड कष्ट करावे लागले.

रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यातील असोंड गावचे मूळचे रसाळ कुटुंब. रसाळ हे सरोदे समाजाचे. गोंधळ घालणे, कथा सांगणे आणि गाई-म्हशींचा व्यापार करणे, याप्रकारे समाजाची उपजीविका होत असे. सरोदे समाजाच्या शिवराम रसाळ आणि सावित्रीबाई यांना चार अपत्ये. त्यापैकी एक सहदेव. शिवराम शेतीभाती करत आणि गाई-म्हशींचाही व्यापार करत. पण, यातून म्हणावे तितके उत्पन्न मिळत नसे. दोन वेळची भाकरी मिळे इतकेच. सहदेव यांचे लहानपणही तसे कष्टातच गेले. सहदेव सकाळी उठून गाई-म्हशींना चरायला नेत, पुन्हा घरी आणत. तोपर्यंत आई शेतात काम करायला गेलेली असे. सहदेव शाळेत निघत. घरापासून दोन किलोमीटर अंतरावर शाळा. तिथपर्यंत चालत जायचे. चप्पल वगैरे घालण्याची चैन त्यांना शक्य नव्हती. त्यांची आई शेतावरून घरी परतून पुन्हा दोन किलोमीटर अनवाणी चालत सहदेव यांच्या शाळेत भाजीभाकरी नेई. शाळेपासून दूर; पण समोरच असलेल्या झाडाखाली आई घामेजल्या चेहर्‍याने थकलेली उभी असे. सहदेवला भाजीभाकरी देऊन ती पुन्हा पटापट घरच्या दिशेने जाई.
 
पुढे दहावीला अनुत्तीर्ण झाल्यावर सहदेव यांनी ठरवले, आपणही मुंबईला जाऊन कामधंदा करायचा. मुंबईला ते नातेवाइकाकडे राहून खासगी कंपनीत काम करू लागले. याच काळात मुंबईत त्यांना दादा इदाते भेटले. सहदेव यांच्यावर दादांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा प्रभाव पडला. सहदेव यांनी सरोदे समाजाचे संघटन करण्याचे काम हाती घेतले. मुंबईत समाजाचे एक केंद्र असावे, असे त्यांना वाटू लागले. दादा इदाते यांनी त्यांना समर्थन दिले. आ. भाई गिरकर यांनी समाजकल्याण केंद्रासाठी निधी दिला. केंद्रासाठी ‘म्हाडा’ची जागेची ‘एनओसी’ मिळाली. पण, स्थानिक लोकांनी समाजकल्याण केंद्र बांधायला विरोध केला. दुसरी जागा दाखवली गेली, तिथेही असाच अनुभव आला. अर्थात, लोकांच्या आड राजकारणीच होते. पुढे फुलपाखरू मैदानात जागा मिळाली. पण, तिथेही लोकांनी आंदोलन सुरू केले. लोकांच्या आड शिवसेनेची स्थानिक नेतेमंडळी होती. त्यावेळी भाजपचे गोपाळ शेट्टी आंदोलनकर्त्यांना भेटले.

खूपच वादविवाद, हमरीतुमरी झाली. गोपाळ शेट्टी यांनी मात्र जागा मिळवूनच दिली. पुढे इथे व्यायामशाळा, महिलांसाठी बचतगट, बालकांसाठी संस्कार केंद्र, विविध जनजागरण कार्यक्रम वगैरे सुरू झाले. याच काळात सहदेव यांना पोस्टमनची नोकरी लागली. ते काम सांभाळून सामाजिक कार्य करू लागले. आता केंद्राची जागा अपुरी पडू लागली. मग भाई गिरकर, गोपाळ शेट्टी आणि दादा यांच्या सांगण्यावरून सहदेव राम नाईक यांच्याकडे गेले. रामभाऊंनी केंद्राचे भटके-{वमुक्त समाजाचे संपूर्ण काम ऐकून घेतले. रामभाऊ ‘म्हाडा’ कार्यालयात स्वतः सहदेव यांच्यासोबत गेले. सोबत भाजप कार्यकर्ता गणेश खणकरही होते. केंद्र बांधायला पैसे नव्हते, तर रामभाऊ यांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडून निधी मागितला. शेवटी केंद्र बांधले गेलेच. तिथे आता उपनगरातीलच नव्हे, तर मुंबईतील भटके-{वमुक्त समाजाचे एकत्रीकरण होते. दरम्यान, सहदेव यांना हृदयविकाराची शस्त्रक्रिया करावी लागली. त्या काळात डॉ. सुवर्णा रावळ, आ. भाई गिरकर ते दादा इदाते या सगळ्यांनीच सहदेव यांना सर्वार्थाने साथ दिली. पुढे सहदेव यांच्या पत्नीला कर्करोग झाला.
 
‘टाटा हॉस्पिटल’ने शस्त्रक्रियेसाठी चार लाख खर्च सांगितला. अशा काळात रा. स्व. संघाचे सुरेश भगेरिया देवासारखे धावून आले. त्यांनी शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च उचलला. वर सहदेव यांना सांगितले, “आपण एका घरातले आहोत. त्यामुळे हे माझे कर्तव्य आहे.” या सगळ्या प्रसंगातून सहदेव यांना वाटत गेले की, मी एकटा नाही. सरोदे या जातीतला माझा जन्म असला, तरी हिंदू समाज तर माझ्यासोबत आहे. त्यामुळे समाजासाठी काम करण्याचा त्यांचा हुरूप वाढला. त्यांनी पोस्टातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ समाजसंघटन करू लागले. सध्या सहदेव यांनाही फुप्फुसाच्या कर्करोगाने गाठले होते. पण, ‘मी एकटा नाही, समाज माझ्यासोबत आहे’ ही जाणीव सहदेव यांना कधीही कशाची भीती वाटू देत नाही. या आजारातून उठल्यानंतर समाजसंघटनासाठी काय काय करायचे, याची योजना त्यांच्याकडे तयार आहे. सहदेव यांच्यासारखी माणसे समाजाची खरी ताकद असतात. ही माणसं कधीच थकत नाहीत, कधीच थांबत नाहीत...!



 



 
@@AUTHORINFO_V1@@