गणपतीसाठी जादा रेल्वेगाड्या सोडा!

    11-Jul-2021
Total Views |

Sawant Wadi _1  


मुंबई : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या ७२ विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यात रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केली.
 
 
कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या कोकणातील गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वेने ७२ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरु होताच त्यांचे बुकिंग पुर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून २०१९ ला कोकण रेल्वेवर २१० फेऱ्या व रेल्वे गाड्यांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडले होते.
 
 
तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी ११ टपाल खात्यात, १७ रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा २०१९ मध्ये खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या. अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत ही विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी रेल्वे राज्य मंत्र्यांना केली. यावेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.