‘चिनी ड्रॅगन’चा हॉलिवूडवरील प्रभाव

    11-Jul-2021
Total Views |

China _1  H x W
हॉलिवूडमधील प्रख्यात कंपन्या कोणत्या तर ’एमजीएम’, ’वॉर्नर ब्रदर्स’, ‘डिस्नी’, ’पॅरामाऊंट’ वगैरे. जगामधील प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारे चित्रपट बनविणार्‍या या कंपन्यांमध्ये चीनने तेव्हापासून मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. हॉलिवूडमधील कुठल्याही इंग्रजी चित्रपटांमधून चीनबद्दल अथवा चीनच्या साम्यवादी पक्षाबद्दल चीनला पसंत नसणारे कथानक अथवा उपकथानक दाखविण्यास चीनने या कंपन्यांमधील गुंतवणुकीचा फायदा घेऊन नकार देण्यास सुरुवात केली होती.
 
 
९० च्या दशकातील ही घटना आहे. ज्या व्यक्ती आता पन्नाशी पार झालेल्या आहेत आणि इंग्रजी सिनेमांचे ज्यांना वेड आहे, त्या व्यक्तींना याचा संदर्भ लागेल. ‘प्रेटी वुमन’ नावाचा एक सिनेमा या काळामध्ये जगभर प्रदर्शित झाला होता. ज्युलिया रॉबर्टस् आणि रिचर्ड गेर या चित्रपटातील मुख्य कलाकार होते. या चित्रपटाने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. या चित्रपटामुळे या चित्रपटातील मुख्य पुरुष कलाकार रिचर्ड गेर याला किमान दहा नवीन चित्रपट मिळाले. हे सर्व चित्रपट हॉलिवूडमधील प्रख्यात संस्थांकडून मिळाले होते.
 
 
रिचर्ड गेर यांना त्या वर्षीचा ‘अ‍ॅकेडमी पुरस्कार’ मिळाला होता. या पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलताना ‘रिचर्ड गेर’ यांनी तिबेटी लोकांबद्दल सहानुभूती प्रदर्शित केली होती. तिबेटच्या स्वातंत्र्याचा रिचर्ड गेर याने जोरदार पुरस्कार केला होता. त्या सोहळ्यानंतरही रिचर्ड गेर याने तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांना जाहीरपणे समर्थनही दिलेले होते. त्या ‘अ‍ॅकेडमी पुरस्कार’ सोहळ्यामध्ये रिचर्ड गेर याने २००८ साली चीनमध्ये भरविल्या जाणार्‍या ‘ऑलिम्पिक्स’वर बहिष्कार टाकावा, असे वक्तव्यही केलेले होते. अप्रत्यक्षपणे हे चीनला डिवचण्यासारखे किंवा खाजवून खरूज काढण्यासारखे होते. हा पुरस्कार समारंभ झाल्यावर पुढील काळात एकेक करीत सर्व नवीन चित्रपटांचे त्याच्यासोबत झालेले करार रद्द करण्यात आले. जे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार नव्हते, अशा चित्रपटांमधूनही रिचर्ड गेरला संधी देण्यात आली नाही, हे विशेष.
 
 
रनवे ब्राईड, अ‍ॅन ऑफिसर अ‍ॅण्ड जेंटलमन, इंटर्नल अफेअर्स हे रिचर्ड गेर याचे याच काळातील गाजलेले काही चित्रपट. रिचर्ड गेर या अभिनेत्याचा १९९७ साली ’रेड कॉर्नर’ या नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये एका उद्योगपतीला खुनामध्ये कसे ’कम्युनिस्ट’ पक्षाकडून अडकवले जाते, हे दाखविले होते. या प्रकारचा चित्रपट सध्याच्या काळात चीनमध्ये प्रदर्शित करणे हे अशक्य आहे असे म्हणता येईल. ’उघूर’ मुस्लिमांबद्दल चित्रपटाच्या कथेच्या ओघात कुठे उल्लेख आला तर त्याला ’काट’ मारावी लागणार हे निश्चित.
 
 
वर उल्लेख केलेल्या पुरस्कार सोहळ्यानंतर आणि त्यामध्ये केलेल्या भाषणानंतर परिणामी रिचर्ड गेर हा त्या काळातील लोकप्रिय अभिनेता पुढील दहा वर्षांच्या काळात चक्क बेकार झाला. हाती एकही चित्रपट नाही. चित्रपटसृष्टीमध्ये एकदा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून तुम्ही दिसेनासे झालात की, त्या अभिनेत्याची कारकिर्द संपावयास वेळ लागत नाही आणि हेच नेमके रिचर्ड गेर याच्या बाबतीत घडले. हे सर्व सांगावयाचे कारण की, ही घटना आहे १९९२ मधील आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या संस्थांमधील चीनने केलेली मोठी गुंतवणूक या घटनेमुळे जगासमोर आली. हॉलिवूडमधील प्रख्यात कंपन्या कोणत्या तर ’एमजीएम’, ’वॉर्नर ब्रदर्स’, ‘डिस्नी’, ’पॅरामाऊंट’ वगैरे.
 
 
जगामधील प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारे चित्रपट बनविणार्‍या या कंपन्यांमध्ये चीनने तेव्हापासून मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. हॉलिवूडमधील कुठल्याही इंग्रजी चित्रपटांमधून चीनबद्दल अथवा चीनच्या साम्यवादी पक्षाबद्दल चीनला पसंत नसणारे कथानक अथवा उपकथानक दाखविण्यास चीनने या कंपन्यांमधील गुंतवणुकीचा फायदा घेऊन नकार देण्यास सुरुवात केली होती. एवढ्या वर्षात या संस्थांनी हा नियम काटेकोरपणे पाळला. चीनने अशा चित्रपटांच्या कथानकावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे काही लोकही नियुक्त केले होते. चीनबद्दल कोणताही उल्लेख या लोकांकडून तपासून घेतला जाई. काही वेळा तर चित्रपटाच्या पटकथेमध्ये बदलही केले गेले.
 
 
अर्थात यामधील दुसरा भागही तेवढाच महत्त्वाचा. चीनमधील प्रेक्षकांना चीनबद्दल काही विपरित दाखवले, तर तो चित्रपट चीनमधील प्रेक्षकांना आवडणार नाही हाही त्यामागे विचार होताच. कारण, चीनमधील हॉलिवूड चित्रपटांचा बाजार हाही मोठा आहे. त्यामुळे धंद्याचे गणितही विचारात घेतले गेले होते. चीनमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त चित्रपटगृहे आहेत. मध्यमवर्गाची संख्या गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
 
 
हॉलिवूडमधील ‘अ‍ॅव्हेंजर्स अ‍ॅण्ड गेम, ‘आयर्न मॅन’, ‘टॉप गन २’ हे तिन्हीही चित्रपट जगभर गाजले होते आणि त्यांनी चीनमधील प्रेक्षकांसह जगातून बक्कळ कमाईही केली होती. एक सावधानता बाळगली गेली होती ती म्हणजे तिबेट, तैवान, हाँगकाँग, तियान्मेनबद्दल काहीही उल्लेख येता कामा नये, जो चीनला आणि चिनी प्रेक्षकांना पसंत पडणार नाही. या आणि अशाच अनेक चित्रपटांमधून चीनच्या श्रेष्ठत्वाबद्दल उद्घोष केला गेलेला दिसतो. ‘अ‍ॅव्हेंजर्स अ‍ॅण्ड गेम, ‘आयर्न मॅन’, ‘टॉप गन २’ या चित्रपटांमधून चीनच्या श्रेष्ठत्वाबद्दल उल्लेख येतो. हॉलिवूडमध्ये बनलेल्या चित्रपटातून यापूर्वी अमेरिकन आणि युरोपियन हिरोंचे श्रेष्ठत्व दाखविले जात असे, जसे की ‘रेम्बो’ चित्रपटाचे बनविले गेलेले अनेक भाग. पण हे चित्रपटातून दाखविले जाणारे श्रेष्ठव चीनमधील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नसे.
 
 
चिनी जनतेला चीनच्या श्रेष्ठत्वामध्ये जास्त रस आहे. ब्रुस ली आणि त्यानंतर आलेल्या ‘कुंग फू’, ‘ज्युडो’ कुशल चिनी कलाकारांनी जगामधील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेले होते. यातूनच चीनमधील चित्रपट निर्मात्यांना हॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांनी भागीदार बनवून चीनमधील सिनेमा बाजारात जम बसविण्याचा प्रयत्न सुरु केला. पण त्यामध्येही चीनमधील साम्यवादी सरकारने अशा काही अटी घातलेल्या आहेत जसे की, अशा चित्रपटांचे काही चित्रीकरण चीनमध्येच झाले पाहिजे. चित्रपटातील कलाकारांपैकी १/३ कलाकार चिनी वंशाचे असावेत. चीन स्वतःचे हॉलिवूडसम चिनी फिल्म उद्योग बनवत आहे. ‘वांडा स्टुडिओज’सारखे ‘हॉलिवूड स्टुडिओज’सारखे अनेक स्टुडिओ आता चीनमध्येच तयार झालेले आहेत.
 
 
’टॉप गन‘ हा टॉम क्रूझ या अभिनेत्याचा जगभर गाजलेला सिनेमा सर्वांना आठवत असेलच. त्या चित्रपटामध्ये टॉम क्रूझने घातलेले ’जॅकेट’ आठवते का? या जॅकेटच्या पुढील भागात अमेरिकेचा ध्वज दाखविला गेला होता. जॅकेटच्या मागे तैवान आणि जपानचा ध्वज दाखविण्यात आला होता. चीनला हे रुचले नाही. ‘पॅरा माऊंट’ या चित्रपट संस्थेने हे दोन्ही ध्वज ’ब्लर’ करून स्पष्ट दिसणार नाहीत, असे सांगितले होते. पण चीनने उर्वरित जगातील प्रेक्षकांनाही हे दाखविता येणार नाही, असे स्पष्ट करून चित्रपट निर्मात्यांवर दबाव आणला होता. चित्रपट उद्योग हाही धंदा असल्याने कमाईला प्राधान्य देऊन कथानकाला लवचिक बनविण्यास चित्रपट निर्मात्यांना राजी केले गेले.
 
 
’एमजीएम’ या हॉलिवूडमधील प्रसिद्ध संस्थेने २०१२ साली ’रेड डॉन’ या चित्रपटामध्ये खलनायक हा सुरुवातीला चीनमधून आलेला दाखविला होता. नंतर कथानकात बदल करून तो खलनायक हा उत्तर कोरियामधून आलेला दाखविण्यात आला होता. बीजिंगमधून केल्या जाणार्‍या या ’सेन्सॉरशिप’च्या विरोधात ख्रिस फेंटन या हॉलिवूडमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकाने जोरदार आवाज उठवला आहे. त्याने ’फीडिंग द ड्रॅगन’ या नावाचे पुस्तकही लिहिले आहे. कलाकाराचे, कथेचे सादरीकरणाचे स्वातंत्र्य, बीजिंगची मान्यता आणि चिनी प्रेक्षकांकडून स्वीकारली जाईल, अशी लवचिक कथा आणि पटकथा बनविणे हे तसे त्रासदायक काम आहे, असे ख्रिस फेंटन याचे मत आहे.
 
 
रायन जॉन्सन दिग्दर्शित ’लूपार’ या ऑक्टोबर २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या दोन आवृत्या काढण्यात आल्या होत्या. चीनमधील प्रेक्षकांसाठी वेगळी पटकथा आणि उर्वरित जगातील प्रेक्षकांसाठी वेगळी पटकथा आणि चित्रीकरण करण्यात आले. चीनमधील प्रेक्षकांसाठी बनविल्या गेलेल्या चित्रपटात चित्रपटाचा नायक शेवटी चीनच्या आश्रयाला जातो असे दाखविले होते, तर वेगळे चित्रीकरण केलेल्या चित्रपटात नायक फ्रान्सच्या आश्रयाला जातो, असे दाखविले होते.
 
 
ख्रिस फेंटन याने डारील मोर या ‘होस्टन रॉकेट’ या कंपनीतील जनरल मॅनेजरचा उल्लेख करताना म्हटले आहे की, डारीलने हाँगकाँगच्या जनतेच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. त्याचा त्याला पुढे फटका बसला. पण आता चीनकडून उर्वरित जगालाही हॉलिवूड चित्रपटातून चीनशी संबंधित काय दाखवायचे आणि काय नाही, याचे निर्देश देण्यात येतात. अर्थात, काही चीनप्रेमी याला चिनी देशभक्तीची उपमा देऊन या गोष्टींचे समर्थन करतीलही. पण चीनची ही दादागिरी आहे हे निश्चित. हॉलिवूडमधील अनेक निर्माते आणि दिग्दर्शक तर उपहासाने म्हणतात की, चित्रपटाच्या सुरुवातीला या चित्रपटासाठी चीनकडून अथवा चीन पुरस्कृत कंपनीकडून अमुक अमुक एवढी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. म्हणजे अमेरिकन प्रेक्षकाला लक्षात येईल की, चित्रपटाची पटकथा चीनला मानवेल आणि रुचेल, अशी लवचिक बनविण्यात आलेली आहे.
 
 
चीनबाहेरील देशांमध्ये बनविण्यात आलेल्या चित्रपटांना जर तो चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करावयाचा असेल, तर चीनने जो परदेशी चित्रपटांसाठी ’कोटा’ ठरवून दिलेला आहे त्या कोट्यात तो चित्रपट बसवावा लागतो. हा ’कोटा’ म्हणजे ठराविक संख्येनेच परदेशी चित्रपट चीनच्या प्रेक्षकांसाठी स्वीकारले जातात. चीनमध्ये परदेशामध्ये बनविलेल्या फक्त ३४ चित्रपटांनाच प्रदर्शनाची परवानगी मिळते आणि तीही चीनमधील ‘सेन्सॉरशिप’मधून सुरळीतपणे स्वीकारार्हता मिळाल्यावरच. चीनमधील मार्केट आणि त्यामधून मिळणारे उत्पन्न हे अमेरिकेतून मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा आकर्षक आहे. या सर्व गोष्टींमध्ये अजून एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे चिनी कलाकारांची चित्रपटातील उपस्थिती आणि त्यांना मिळणारी भूमिका. म्हणजे त्या भूमिकाही अमेरिकन अभिनेत्यांच्या तोलामोलाच्याच असाव्यात, ही चीनच्या सरकारची अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण केल्यात तर तुम्हाला चीनमधील ‘लोकेशन्स’वर चित्रपटाचे चित्रीकरण करण्याची परवानगी मिळते.
 
 
‘आय वे’ हा चिनी वंशाचा चित्रपट दिग्दर्शक. त्याने मागील वर्षी हाँगकाँगमधील दडपशाहीवर आणि कोरोना विषाणूच्या उगम आणि प्रसारावर दोन छान फिल्म बनविल्या होत्या. एका चित्रपटाचे नाव होते ’कॉक्रोच’ आणि दुसर्‍या चित्रपटाचे नाव होते ’कोरो नेशन.’ ‘कॉक्रोच’ हा चित्रपट हाँगकाँगमधील नागरिकांचे, आंदोलनाचे चीनच्या सरकारकडून केले जाणारे दमन दर्शवितो, तर ‘कोरो नेशन‘ हा लघु चित्रपट कोरोनाच्या चीनमधील प्रसाराशी संबंधित होता. पण ना त्याला या फिल्म्स कोणत्या ‘फिल्म फेस्टिवल’मध्ये दाखविता आल्या ना त्या फिल्मला कोणी खरेदीदार मिळाले. ‘मोशन पिक्चर्स असोसिएशन’नेही या मुद्द्यांवर मौन बाळगणे, पसंत केलेले आहे, जे सर्व काही सांगून जाते.
 
 
- सनत्कुमार कोल्हटकर