पुणे : रसायन निर्मिती प्रक्रियेदरम्यान भीषण आग लागून एका कंपनीतील १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि ७ जून रोजी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे घडली.येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस’ या केमिकल कंपनीत दुपारी रसायनांची निर्मिती केली जात असताना अचानकपणे आग लागली.
आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्यासीठी प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पाच बंब दाखल झाले होते. याशिवाय रूग्णवाहिकादेखील दाखल झाली होती. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी कंपनीची संरक्षक भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली. यावेळी कंपनीमध्ये ३७ कामगार कार्यरत होते. आगीत 18 जणांचा मृत्यू झाला, तर १९ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा केली.