जादुई अरबी नगरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jun-2021   
Total Views |

PROJECT NEOM_1  

अरेबियन नाईट्सच्या सुरस अरबी कथा प्रत्येकाने ऐकल्या आहेत. त्या कथांमध्ये असलेल्या जादुई नगरीची भुरळ कधीनाकधी प्रत्येकाला पडतेच. अरबी राष्ट्रांनी वाळवंटामध्ये जागतिक दर्जाची शहरे उभारून काही प्रमाणात सुरस अरबी कथा प्रत्यक्षात उतरविण्याचा यशस्वी प्रयत्नही केला आहे.
दुबईसारखे शहर हा अरबांच्या क्षमतेचा एक नमुना आहेच. त्याचप्रमाणे वाळवंट असूनही तेलाच्या साथीने वाळवंटाचा कायापालट घडविण्याचे विविध प्रयोग नेहमीच होत असतात. सौदी अरेबिया त्यात विशेष आघाडीवर असतो. मुस्लिम राष्ट्र असले तरीही जागतिकतेचे भान असणारे नेतृत्व सुदैवाने लाभल्याने तेलातून येणाऱ्या पैशाचा असा विनियोग करण्यात सौदी अरेबियाचा नेहमीच विशेष कटाक्ष असतो. त्यामुळे वाळवंटातही नंदनवन फुलविणे सौदी अरेबियाने साध्य करून दाखविले आहे.

सौदी अरेबियाने द लाईन या नावाने जादुई शहर उभारण्याचा प्रकल्प आता हाती घेतला आहे. जगात सध्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक तंत्रज्ञानाचा वापर या शहरामध्ये केला आहे. काही महिन्यांपूर्वीच युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी १७० किमी लांबीच्या परिसरामध्ये या अत्याधुनिक शहराची निर्मिती करण्याची घोषणा केली असून असून दहा लाख लोकसंख्या तेथे वसविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जगभरातील लोकांना या शहरामध्ये राहण्यासाठी आकर्षित करण्यात येणार आहे.

या शहराची उभारणी तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर करण्यात येणार आहे. प्रोजेक्ट निओम अंतर्गत त्याची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सौदी अरेबिया तब्बल ३६.३२ लाख कोटी रूपये खर्च करणार आहे. सध्याच्या शहरांपुढे असलेल्या समस्या म्हणजे पायाभूत सुविधा विकास, सार्वजनिक वाहतुक, खासगी वाहनांची बेसुमार संख्या, प्रदुषण आदींवर तोडगा काढणे हे शहराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या शहारांमुळे जवळपास ३ लाख ८० हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत. या शहराची वैशिष्ट्ये पाहिल्यावर त्याचा नेमका आवाका लक्षात येतो. पर्यावरणाची काळजी घेणे यास प्राधान्य देण्यात येणार असून शहरामध्ये १०० टक्के नवीकरणक्षम उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. दररोजसाठीच्या अत्यावश्यक गरजा केवळ पाच मिनीटांच्या अंतरावर असतील, त्याचप्रमाणे आवश्यक सर्व सोयींची उपलब्धता रहिवाशी भागाच्या चौफेर केली जाणार असल्याने त्यासाठी वाहनांचा वापर करण्याची गरज उरणार नाही.
त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीमध्येही नवा प्रयोग करण्यात येणार असून अल्ट्रा हायस्पीड मास ट्रान्झिट एक्सेस देण्यात येणार आहे. या शहरामध्ये त्रिस्तरीय रचना असेल, सर्वांत वरच्या भागात पादचारी स्तर असणार असून त्यासाठी भुयारी मार्गांचा वापर केला जाईल. जमीनीच्या लगोलग खालच्या स्तरावर आवश्यक त्या पायाभूत सुविधा असतील आणि सर्वांत खालच्या स्तरामध्ये सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असणार आहे. आर्टिफिशीअल इंटेलिजन्सचा वापर प्रामुख्याने उद्योगांसाठी करण्यात येईल, त्यासाठी वेगवान डिजीटल व्यवस्था विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे रोबोटिक्सदेखील या शहरामध्ये अतिशय कळीची भूमिका बजाविणार आहे.

त्याचप्रमाणे सौदी अरेबिया हे मुस्लिम राष्ट्र असल्याने तेथील कायदे आणि नियम हे जगातील अन्य देशांच्या नागरिकांना त्रासदायक ठरत असतात. मात्र, या नव्या शहरामध्ये सौदी अरेबियाचे कायदे आणि नियम लागू असणार नाहीत, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जगभरातून या शहराकडे ओघ वाढण्याची शक्यता बळावली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यास सुरूवात झाली आहे. निओम किनारा भाग, हॉटेल कॉम्प्लेक्स आणि आलिशान इमारती इत्यादींची उभारणीही पूर्ण झाली आहे. २०१९ मध्ये निओम बे विमानतळाचे उद्घाटनही झाले. सौदी अरेबियाचे राजे, युवराज आणि शाही कुटुंबातील सदस्यांसाठी भव्य राजवाड्यांच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे.
अर्थात, या शहराच्या उभारणीमागील सर्वांत महत्वाचे कारण म्हणजे सौदी अरेबियाला आपल्या अस्तित्वाविषयी वाटत असलेली भिती, हे आहे. सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलावर अवलंबून आहे आणि संपूर्ण जग सध्या तेलावरील आपले अवलंबित्व कमी करण्यास प्रयत्नशील आहे. त्यामुळे भविष्यात अर्थव्यवस्था व देश कालबाह्य ठरू नये, यासाठी संपत्तीनिर्माणाचा हा पर्याय आपलासा करण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@