संघसमर्पित स्वयंसेवक

    06-Jun-2021   
Total Views |


pradip paradkar_1 &n



शारीरिक खेळांच्या आवडीतून संघकामात लहानपणीच सक्रिय झालेले आणि आजही अविरतपणे कार्यरत असलेल्या प्रदीप पराडकर यांच्याविषयी...


प्रदीप यांचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे झाला. त्यांचे वडील हे सरकारी नोकरदार होते. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने प्रदीप यांचे मुंबईत सातत्याने येणेे होते. त्यांचे संपूर्ण बालपण आणि शिक्षण हे डोंबिवलीतच झाले. त्यांना शारीरिक खेळांची आवड होती. शालेय शिक्षण घेत असताना शाळेतील खेळांबरोबर संघ शाखेचे आकर्षण वाढले. त्यांचे वडील नोकरी सांभाळूनही संघाच्या कामांमध्ये सक्रिय असायचे. त्यामुळे संघ संस्कार प्रदीप यांच्यात आपोआपच रुजले. प्रदीप यांचे शिक्षक दिवंगत रमेश बापट हे त्यांना सायंकाळी शाखेत घेऊन जाण्यासाठी घरी येत असत. त्यानंतर घरी सोडण्याचे कामही करीत असत. संघस्थान हे टिळकनगर शाळेत होते. 1967-68मध्ये त्यांच्या घराच्या आसपासच संघाची शाखा सुरू झाली. प्रदीप आता खेळांच्या आकर्षणामुळे नित्यनियमाने शाखेत रमत गेले. पुढे संघकामात कधी सक्रिय झाले हे त्यांनासुद्धा समजले नाही. प्रदीप हळूहळू घरातही त्यांच्या वडिलांसोबत संघाचे काम करू लागले. त्यांनी संघ शिक्षा वर्गातही सहभाग घेतला. त्यामुळे संघ तत्त्वज्ञान, संघाचे विचार, संघाचे ज्येष्ठ अधिकारी, प्रचारक यांच्याशी त्यांचा नित्य संबंध येऊ लागला. त्यांची संघकामाविषयीची गोडी वाढत गेली. १९७४मध्ये प्रथमच राजजी पथ येथील विवेकानंद शाखेचा मुख्य शिक्षक म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली. ही जबाबदारी मिळाल्यावर शाखा कार्यक्रम ठरविणे, उपक्रमांची योजना करणेे, मुलांना शाखेत आणण्यासाठी घरोघरी संपर्क करणे, पालकांशी संवाद करणे, अशीही अनेक कामे त्यांनी केली. हे काम करताना माणसांना जोडण्याची प्रक्रिया एक कार्यकर्ता म्हणून सहजपणो घडत गेली.

१९७५मध्ये आणीबाणीविरोधी वातावरण तयार करणे, त्यासाठी लागणार्‍या सगळ्या हालचाली, उपक्रम गुप्तपणे राबविणे, लोकांमध्ये भीतिदायक वातावरण असतानासुद्धा त्यातून लोकशाहीच्या पुनःप्रस्थापनेसाठी संघ व अन्य संस्थांनी केलेल्या संघर्षाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अत्यंत तणावपूर्ण वातावरणात आपल्याला कारागृहात जायला लागेल, यांची कल्पना असतानाही प्रदीप यांनी प्रथमच सत्याग्रह केला होता व त्या त्याकाळात प्रदीप यांना अटकही झाली होती. प्रदीप यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने दिलेली शिक्षा म्हणून ठाणेे कारागृहात एक महिना कारावास सहन करावा लागला. डोंबिवलीतील तो पहिला सत्याग्रह होता. त्यापूर्वी डोंबिवलीतील काही ज्येष्ठ मंडळी आणीबाणीविरोधात ‘मीसाबंदी’ झाली होती. एकूणच या थरारक कालावधीचा परिणाम सुमारे दोन वर्षे होता. या कालावधीत प्रदीप यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. ते वाणिज्य शाखेतून पदवीधर झाले. आता पुढील जीवनाची दिशा ठरविण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर संघकाम करण्याचे ‘मिशन’ नक्की केले. सुरुवातीला त्या वेळेचा असलेला ठाणे जिल्हा त्याचा बालविभागप्रमुख, शारीरिक शिक्षण प्रमुख, नंतर जिल्हा सहकार्यवाह व कार्यवाह नंतर दीर्घकाळ विभाग कार्यवाह अशा जबाबदार्‍या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या. या जबाबदार्‍या पार पाडताना त्यांना अधिकाधिक न्याय देता यावा, याकरिता त्यांनी आपल्या व्यावसायिक व संसारी जीवनाची एक रचना केली. पुढील काळात त्या रचनेनुसारच ते काम करीत राहिले. १९८४-९२या काळात रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन सुरू झाले व त्यासाठी देशभर केलेले सर्व उपक्रम म्हणजे मग ते शिलापूजन, राम-जानकी रथयात्रा ते अयोध्येत प्रवेश करून प्रत्यक्ष संघर्ष युक्त प्रवासाचा एक जबरदस्त अनुभव प्रदीप यांना घेता आला. “आज रामजन्मभूमी श्रीराम मंदिर होणार याचा सार्थ अभिमान वाटत आहे. कारण, या संघर्षामध्ये आपलाही खारीचा वाटा आहे हे स्मरण आनंद देणारे वाटते,” असे ते सांगतात.

१९९७मध्ये सेवाकार्यासाठी काहीतरी करावे, असा विचार प्रदीप यांच्या मनात आला. त्यावर काही मंडळींना घेऊन त्यांनी महाराष्ट्रात दौरा केला. यावेळी जनकल्याण समितीचे माजी प्रांत कार्यवाह बापूसाहेब घाटपांडे व माजी अध्यक्ष डॉ. अशोकराव कुकडे यांनी त्यांना पनवेल येथील पटवर्धन रुग्णालयाची जबाबदारी घेण्यास सांगितले. त्यासाठी आवश्यक तेवढा पाठिंबा आणि अर्थसाहाय्य त्यांनी उभे केले. जनकल्याण समितीच्या ‘ओक रक्तपेढी’ या प्रकल्पाचे पालक म्हणून प्रदीप काम पाहतात. ‘विद्या भारती’तर्फे चिपळूणमध्ये ‘गुरुकूल’ हा प्रकल्प नव्याने आकार घेत आहे. काही वर्षांत हा प्रकल्प महाराष्ट्रातील एक मॉडेल म्हणून उभा राहावा, हे स्वप्न प्रदीप यांनी उराशी बाळगले आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या मंडळींनी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रांत कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. “काम करीत असताना निधी संकलन आणि हिशोब, वार्षिक अंकेक्षण हे जिकिरीचे काम आहे,” असे प्रदीप सांगतात. पण, “सहकार्‍यांच्या मदतीने या कामांमध्ये जास्तीत जास्त आर्थिक अनुशासन व पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न चालू असतो,” असेही प्रदीप सांगतात. अशा या निष्ठावान, सक्रिय स्वयंसेवकाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.