‘कोरोना’ला जबाबदार कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2021   
Total Views |

Corona_1  H x W
 
 

‘कोरोना’ विषाणू मानवनिर्मितच? भाग २

 
 
कोरोनाच्या जागतिक फैलावाला नेमके जबाबदार कोण, याचे ठोस पुरावे अद्याप कुणालाही आढळलेले नाहीत आणि ज्यांच्याकडे तसे पुरावे असतील, तरीही ते दाबून टाकले गेले. पण, याबाबतीत तर्कांचा आधार ज्या निष्कर्षांकडे नेतो, तो मात्र धक्कादायक आहे. त्यामुळे कोरोनाला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो.
 
 
कोरोना उत्पत्तीच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं की, ब्रिटिश बायोलॉजिस्ट डॉ. पीटर डेस्झॅक आणि अमेरिकेच्या ’नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’चे प्रमुख डॉ. अ‍ॅन्थोनी फाऊची यांनी विषाणू संशोधनासाठी निधी डॉ. डेस्झॅक यांच्यामार्फत दिला होता. त्यांनी दिलेल्या ४० लाख डॉलर्सच्या घसघशीत निधीद्वारे काय संशोधन झाले, हे सांगणारी माहिती एका लेखात दि. ९ डिसेंबर, २०१९ रोजी डॉ. पीटर डेस्झॅक यांनी दिली. ही तारीख वाचून कोरोना उत्पत्तीचा काळ किती जवळचा आहे, हे लक्षात येईल.
 
 
आता या मुलाखतीत ते काय म्हणतात पाहा. डॉ. डेस्झॅक म्हणतात, “आम्हाला गेल्या सहा ते सात वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ’सार्स’ या विषाणूची शक्ती वाढवून उंदरांच्या फुप्फुसावर या विषाणूंचे प्रतिरोपण करण्यात यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे असे शंभरहून जास्त प्रकारचे विषाणू तयार आहेत. ज्या उंदरात विषाणू सोडले जातात, त्याला वाचवता येत नाही. कारण, त्याला वाचवणारी लस आमच्याकडे उपलब्ध नाही. उंदराला वाचवण्यासाठी कुठलीही औषधे ’अ‍ॅण्टिबायोटिक्स’ काम करत नाहीत.” बर्‍याचदा आपल्याला प्रश्न पडतो संपतासंपत आलेली कोरोनाची महामारी पुन्हा पुन्हा कसे डोके वर काढते? कोरोनाचा दुसरा म्युटंट, तिसरा म्युटंट, असे अनेक विषाणू कसे जन्म घेतात? या सगळ्या घडामोडींची एकमेकांशी सांगड घातली, तर डॉ. डेस्झॅकचे वाक्य आठवेल की, ‘असे १०० विषाणू आमच्याकडे आहेत.’
 
 
याच मुलाखतीत डॉ. डेस्झॅकला तिथल्या निर्भीड पत्रकाराने प्रश्नही कठीण आणि योग्य विचारला होता. “तुमच्याकडे लस नाही आणि विषाणू तयार करताय, मग हे जगावर संकट नाही का ओढवणार?” यावर डेस्झॅक, “नाही” असे म्हणतो. “कारण, अशा सर्व विषाणूंवर लसनिर्मिती करण्याची तयारीदेखील आम्ही करत आहोत.” त्यावेळी जागतिक महामारी किंवा असा कुठला रोग याचा विचारसुद्धा कुणी केला नसल्याने या मुलाखतीत डेस्झॅकने वेळ मारून नेली होती. त्यामुळे लाखो कोरोनाच्या मृत्यूंच्या पापाचे वाटेकरी कोण, असा प्रश्न भविष्यात उपस्थित झालाच तर डॉ. डेस्झॅक यांच्याकडे शंकेची सुई पहिल्यांदाच येईल.
 
 
ज्यावेळी कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हा चीनने हे प्रकरण दडपण्याचे पुरेपूर प्रयत्न केले होते. आपल्याला आठवत असेल साधारणतः दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेचे पथक वुहानमध्ये वार्तांकनासाठी पोहोचले होते. तेव्हा ‘लॉकडाऊन’ आणि निर्बंधांचे कारण देत त्यांना रोखण्यात आले होते. यापूर्वी आलेल्या ‘सार्स’ने बीजिंग शहरात कसा हलकल्लोळ माजवला होता, हे आपल्या लक्षात असेल. बीजिंग हे चीनचे राजधानीचे शहर असल्याने यंदा आलेला निधी आणि त्यावर होणारे संशोधन याचे मुख्यालय वुहान येथे ठेवायचे, असा निर्णय तेथील सरकारने घेतला असावा. वुहान शहरात होणार्‍या मृत्यूंची आकडेवारीही याच वेळी लपवण्यात आली. चिनी नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याचीही परवानगी नव्हती, सर्व काही सरकार करत होते आणि केवळ अस्थिकलश कुटुंबीयांकडे दिले जात होते. माध्यमांमध्ये यासंदर्भात कुठलीही वाच्यता करू दिली जात नव्हती. साधारणतः मार्च महिन्यात भारतात ‘लॉकडाऊन’ लागल्यानंतर या बातम्याही त्याच सुमारास पटलावर आल्या.
 
 
डॉ. डेस्झॅकने यानंतर एव्हाना कोरोना विषाणू नैसर्गिकच आहे, असे सांगायला सुरुवात केली. डेस्झॅकच्या दाव्याला दुजोरा देणारे अनेक शास्त्रज्ञ मग पुढे आले. कालांतराने जागतिक आरोग्य संघटनेवर जगभरातून चीनधार्जिणेपणाची टीका झाल्यानंतर, जेव्हा वुहानमध्ये त्यांचे पथक पोहोचले, तेव्हा चिनी सरकारने या पथकाला एक दिवस विलगीकरणात ठेवले. त्या काळात ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलोजी’ धुवून काढली आणि पुरावे नष्ट करून मगच जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला तिथे प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे, कुठल्याही संशोधनापूर्वी नोंदी ठेवल्या जातात. पण, यासंबंधी कोणतीही नोंद या पथकाला मिळाली नाही. चीनने जर काही लपवायचे नसते, तर इतका आटापीटा का केला असता? त्यामुळे कोरोनाला चीनही तितकाच जबाबदार आहे का, असाही एक संशय यानिमित्ताने बळावत जातो.
 
 
चीनमधील मो झँग नावाच्या खाणीतून वटवाघळांचे १३०० नमुने गोळा करण्यात आले होते. हे नमुने घेणार्‍या कामगारांनाही हा रोग झाला होता. या नमुन्यांवर त्यांनी काम केले. ज्या प्रयोगशाळेत या नमुन्यांवर काम केले, तिथेही ‘बायोसेफ्टी’ची योग्य पातळी बाळगण्यात आलेली नव्हती. त्यामुळे इथल्या सहा जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला, तर तिघे कसेबसे बचावले. अमेरिकेला याबद्दलची कल्पना असूनही त्यांनी यासंदर्भात काहीच पावले उचलली नाहीत. जर आग शेजारच्या घरात लागली असेल, तर ती कधी ना कधी आपल्याही अंगणात येणार, याची कल्पना असूनही अमेरिकेकडून असे दुर्लक्ष का व्हावे? ‘कोरोना’ नावाचा भस्मासूर एक दिवस आपल्यालाही गिळंकृत करेल, याचा अंदाज अमेरिकेला आला नव्हता का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
 
 
आता आपण वळू जागतिक आरोग्य संघटनेकडे, ज्यांनी दिलेल्या मार्गदर्शक प्रणालींनुसार, आपण काम करत आहोत. त्याचे संचालक डॉ. टेड्रोस अधोनोम (Tedros Adhanom) हे मुळात डॉक्टर नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेला गैरसमज सर्वांनी दूर करायला हवा. त्यांचा जन्म इथिओपियातला, शिक्षणही तिथलेच. बी.एस्सी, एम.एस्सी आणि नंतर पीएच.डी, असे त्यांचे शिक्षण आहे. पण, हे गृहस्थ मेडिकल डॉक्टर नाहीत. ते इथिओपियातील ’टीगारे’ टोळीतील आहेत. ‘टीगारे पीपल्स लिबरेशन फ्रंट’ (टीपीएलएफ) ही दहशतवादी संघटना मानली जाते. तिच्याशी या अधोनोमचे संबंध होते. त्या काळात ही संघटना सरकारमध्ये आली. त्यामुळे २००५ ते २०१७ या काळात डॉ. टेड्रोस अधोनोम इथिओपियाचे वैद्यकीय प्रमुख झाले. त्यांच्या काळात कॉलराचे तीनही उद्रेक या देशात झाले. या तिन्ही वेळेला ही रोगराई नष्ट न करता दडपण्याचा प्रकार याच माणसाने केला होता. संबंधित रोग ‘कॉलरा’ नसून ‘अ‍ॅक्यूट वॉटरी डिस्चार्ज’ (एडब्ल्यूडी), असे नामकरणही त्यांनीच केले होते. कारण, कॉलरा म्हटले की जागतिक साथरोग, म्हणून जग पाहू लागते. हे उद्रेक ‘टीगारे’ टोळीच्या भागातील नसल्याने त्यांनी त्याकडे फारसे लक्षही दिले नाही. असे या महाशयांचे कर्तृत्व.
 
 
इथिओपियात चीनची प्रचंड गुंतवणूक आहे. त्यामुळे चीनने डॉ. टेड्रोस अधोनोम यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या शीर्षस्थानी बसवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. जागतिक आरोग्य संघटनेची सूत्रे स्वीकारल्यावर डॉ. टेड्रोस अधोनोमने काय केलं, तर झाम्बिया या देशाचा हुकूमशहा डॉ. रॉबर्ट मुगाबे या क्रूरकर्म्याला ‘डब्ल्यूएचओ’चे ’गुडविल अ‍ॅम्बॅसिडर’ म्हणून नेमले. म्हणजे पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला कुठल्यातरी ‘शांती मिशन’चा ‘गुडविल अ‍ॅम्बॅसिडर’ करावे, तसलाच हा प्रकार. अशी व्यक्ती ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या प्रमुखपदी बसली असताना चीनच्या प्रयोगशाळेत कोरोनाबद्दल काही निश्चित धागेदोरे सापडले नाहीत, याचे मुळात आश्चर्यच वाटायला नको.
 
 
हा प्रकार जेव्हा तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समजला, तेव्हा त्यांनी ‘जागतिक आरोग्य संघटने’ला अमेरिकेकडून पुरवली जाणारी आर्थिक रसद बंद करून टाकली. ‘आमच्याच पैशांवर आमच्याच विरोधात केली जाणारी कटकारस्थाने खपवून घेतली जाणार नाहीत,’ असा कडक इशारा देत ट्रम्प यांनी ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या आर्थिक नाड्या आवळल्या होत्या. त्या काळातील ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदा आठवत असतील, तर ट्रम्प वारंवार या विषाणूचा उल्लेख ’चिनी विषाणू’ असाच करत होते, हेदेखील लक्षात येईल. अर्थात, यातून अमेरिकन सरकारला ‘क्लिनचीट’ मिळते का, तर तसेही मुळीच नाही. कारण, अमेरिकेच्या डोळ्यादेखत या गोष्टी घडत होत्या, तरीही परिस्थिती हाताळणे आणि हा भयानक प्रकार रोखण्यात अमेरिकन सरकार अपयशी ठरले.
 
 
या सगळ्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचे नाव येते ते म्हणजे जगविख्यात उद्योजक बिल गेट्स यांचे! होय, ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचा संस्थापक, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अशी त्यांची ख्याती तेच बिल गेट्स. बिल गेट्स आणि त्यांची पूर्व पत्नी मिलिंडा यांनी मिळून एक ’बिल अ‍ॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली. अनेक देशांमध्ये एड्सग्रस्त रुग्णांसाठी त्यांनी काम केले. २०१५ साली ‘टेड टॉक’मध्ये जेव्हा बिल गेट्स काही वर्षांपूर्वी आले होते, तेव्हा जागतिक महामारी, साथ याबद्दल त्यांनीही भीती व्यक्त केली होती. अशी साथ आली तर आपल्याकडे लसही उपलब्ध नाही, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते आणि खरोखरीच पुढे २०१९ साली कोरोनाची जागतिक साथ आली. बिल गेट्स यांनी मोठी देणगी ही लसीकरण निर्मितीसाठीही दिली होती. त्यामुळे त्यांना या आजाराची कल्पना होती का, याबद्दलही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. पण, केवळ अशी शंका असल्याने थेट आरोप बिल गेट्स यांच्यावर केले जाऊ शकत नाही. मात्र, त्यांचे चुकले कुठे, तर जेव्हा लसीच्या पेटंटबद्दल त्यांना विचारण्यात आले, तेव्हा ‘कुणालाही लस मोफत मिळता कामा नये,’ असे त्यांनी म्हटले होते. कारण, गेट्स यांचे ‘मायक्रोसॉफ्ट’ बिझनेस मॉडेल काही वेगळे नाही, हेदेखील लक्षात येईल. याच काळात नेमके भारताने मोफत लस देण्यास सुरुवात केली होती. चीनने जगाला विषाणू दिला, अमेरिकेने लस विकत, तर भारताने मोफत दिली म्हणून जागतिक पातळीवर चीन-अमेरिकेलाही रोषाला सामोरे जावे लागले होते. लसीचे ‘पेटंट’ जर सार्वजनिक केले, तर असुरक्षित जागी लसनिर्मिती केली जाईल, त्यामुळे ती परिणामकारकरीत्या उत्पादन होणार नाही, असा युक्तिवाद गेट्स यांनी केला होता. मात्र, हा दावा ‘सपशेल’ खोटा ठरला. भारताने परिणामकारक लस तयार करून दाखवली. चीनच्या लसीला ब्राझीलने झिडकारले. मात्र, भारताच्या लसीची तुलना ‘संजीवनी’शी केली. हा प्रकार जागतिक पातळीवर चीन-अमेरिकेला सहन न होणाराच होता. ‘पेटंट’चे पैसे घेऊन नफा कमावण्यावर बिल गेट्स आजही ठाम आहेत. ज्या संस्थांना लसीकरणाच्या निर्मितीसाठी त्यांनी देणगी दिली, त्याच कंपन्या आज पेटंटद्वारे कमाई करत आहेत.
 
 
बिल गेट्स यांच्या वैयक्तिक आयुष्यातही याच काळात मोठे वादळ उठले. त्यांचा मिलिंड यांच्यासोबतचा २७ वर्षे सुरू असलेला संसार एकाएकी मोडून पडला. तसेच ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीच्या काही महिला कर्मचार्‍यांनीही त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्याच्या बातम्याही मध्यंतरी झळकल्या होत्या. अर्थात, हे सर्व आरोपच आहेत. त्यामुळे गेट्स यांच्या घटस्फोटाचे कारण इतके सोपे असेल का, असाही प्रश्न उपस्थित होतो.
 
 
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या काळात चीनमध्ये कोरोना रुग्ण आढळू लागले होते, त्यावेळी चीनमध्ये येणार्‍या विमानांवर बंदी होती. मात्र, वुहानहून बाहेर जाणारी सर्व आंतरराष्ट्रीय विमाने मात्र सुरूच होती. त्यामुळे मुद्दाम जगभरात कोरोना चीनने पसरवला की काय, असाही संशय कायम आहे. आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे, ज्या ज्या वेळेस ही महामारी बळावली, तेव्हा तेव्हा लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरू झाली होती. त्यामुळे एकूणच हे जगाला कमजोर करण्याचे शस्त्र चीननेच जन्माला घातले नाही ना, असा दाट संशय अद्याप कायम आहे.
 
 
(क्रमश:)
- चंद्रशेखर नेने
(शब्दांकन : तेजस परब)
@@AUTHORINFO_V1@@