‘अटकेच्या भीतीपोटी अनिल देशमुख ‘ईडी’ चौकशीला सामोरे जात नाहीत’
मुंबई : कोट्यवधींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी राज्याच्या गृहमंत्री पदावरून पायउतार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे ‘सक्तवसुली संचलनालया’कडून (ईडी) होणार्या चौकशीला टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांकडून तर देशमुख हे ‘ईडी’च्या चौकशीपासून पळ काढत असल्याचे थेट आरोपही करण्यात आले आहेत. १00 कोटी वसुलीच्या आरोपांप्रकरणी अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सचिवांना अटक केल्यानंतर ‘ईडी’ने देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावला. मात्र, देशमुख यांनी यापूर्वी एक पानी समन्ससोबत अन्य कागदपत्रेही माहितीसाठी द्यावीत, अशी मागणी करत चौकशी टाळली होती.
त्यानंतर ‘ईडी’ने मंगळवार, दि. २९ जून रोजी पुन्हा हजर राहण्यासाठी समन्स पाठवले. परंतु, यावेळीही देशमुखांनी ‘ईडी’च्या कार्यालयात येण्यास नकार दिला. वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचे कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ‘ईडी’च्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली. देशमुख यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली.
“ ‘ईडी’ने शुक्रवार, दि. २५ जून रोजी समन्स बजावून मला दुसर्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ‘ईसीआयआर’मध्ये उल्लेख केलेली कागदपत्रे मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझे वय ७२ वर्षे आहे. आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ‘ऑनलाईन’ रेकॉर्ड करा. ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र, त्याआधी ‘ईडी’ने प्रश्नांची कॉपी पाठवावी,” अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे ‘क्राईम इन्टिलिजन्स युनिट’चे प्रमुख होते. गेल्या काही महिन्यात (तत्कालीन) गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेला त्यांच्या ‘ज्ञानेश्वर’ या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला १00 कोटी रुपये जमा करायला सांगितले, अशी माहिती या पत्रातून देण्यात आली. यानंतर उच्च न्यायालयाने याप्रकरणी ‘सीबीआय’ला प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे ‘सीबीआय’ने देशमुखांवर गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाची चौकशी ‘ईडी’कडून केली जात आहे.
“देशमुख यांनी चौकशीला सामोरे जावे व ‘ईडी’ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. ‘ईडी’ चौकशीनतंर पलांडे आणि शिंदे यांना अटक करण्यात आल्यामुळे आपल्याबाबतही तसेच होईल, अशी त्यांना भीती वाटत असावी. या भीतीपोटी देशमुख यांनी चौकशीला जाण्यासाठी नकार दिला असावा,” असा चिमटा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काढला. “कायद्यासामोर कोणालाही पळवाट काढता येत नाही. कायदा हा सर्वांना सारखा असतो. कायद्यासमोर काही कारण काढले, तरी आपण लपू शकत नाही व लांब जाऊ शकत नाही, जे सत्य आहे समोर येणारच आहे,” असे दरेकर यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये खलबते
वसुली प्रकरणात अनिल देशमुख हे अडचणीत आलेले आहेत. त्यांना केव्हाही ’ईडी’कडून अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या ’वर्षा’ या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री या बैठकीत उपस्थित होते.