मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती आणि सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक राज कौशल यांचे बुधवारी निधन झाले. बुधवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली. ते ४९ वर्षांचे होते. राज कौशल यांच्या निधनावर बॉलिवूडमधील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. मंदिरा आणि राज यांना दोन मुले आहेत. राज कौशल यांनी ४००हून अधिक जाहिरातींचे दिगदर्शन केले आहे. तसेच, गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या 'माय ब्रदर निखील' चित्रपटाची निर्मितीही केली आहे.
चित्रपट दिग्दर्शक ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनाची माहिती दिली होती. त्यांनी ट्विट केले आहे की "आपण दिग्दर्शक आणि निर्माते राज कौशल यांना आज सकाळी गमावले. अतिशय दु:खद. ते 'माय ब्रदर निखिल' या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होते. आमच्या व्हिजनवर विश्वास ठेवून पाठिंबा देणाऱ्यांपैकी ते एक होते. देश त्यांच्या आत्म्याला शांती देवो." मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतदर्शनाला अभिनेते रोनित रॉय, आशिष चौधरीसह इतर कलाकार उपस्थित होते.