मुंबई : भारतीय क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसाठी बीसीसीआयने महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या नावाची शिफारस केली आहे. तसेच त्यांनी धडाकेबाज फलंदाज शिखर धवन, के. एल. राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन पुरस्कारासाठी आतापर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूच्या नावाची शिफारस करण्यात आलेली नव्हती. पण यंदाच्या वेळी खेलरत्नसाठी मिताली राजच्या नावाची शिफारस करण्यात आली. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेली समिती पुरस्कारासाठी खेळाडूची अंतिम निवड करणार आहेत.
३८ वर्षीय मितालीने मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्ष पूर्ण केली आहे. तिने सात हजाराहून अधिक धावा केल्या असून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज आहे. तसेच, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी उत्तम कामगिरी केली आहे. त्याने ७९ कसोटी सामन्यात ४१३ गडी बाद केले आहेत.