कॅप्टन विरुद्ध सिद्धू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2021   
Total Views |

vicharvimarsh_1 &nbs


कॅप्टन अमरिंदर सिंग हे सहजासहजी हार मानणार नाहीत. त्याच वेळी काँग्रेसकडेही त्यांच्याशिवाय सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात सुरू झालेली ही मोहीम पेल्यातले वादळ ठरण्याचीच सर्वाधिक शक्यता आहे.


पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष पेटला आहे. राज्याची विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात असंतुष्टांनी आघाडी उघडली आहे. त्याचे नेतृत्व करीत आहेत भाजप- आम आदमी पक्ष-काँग्रेस असा प्रवास केलेले माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू. विशेष म्हणजे, एरवी प्रादेशिक नेतृत्वातील वादांकडे दुर्लक्ष करणार्‍या काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीदेखील या वादाची तत्परतेने दखल घेतली आहे. वादाचा तोडगा काढण्यासाठी पक्षाने तीन सदस्यीय समिती स्थापन केल्याचे समजते. त्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, हरीश रावत आणि जयप्रकाश अग्रवाल यांचा समावेश आहे. ही समिती पंजाबमधील मंत्री, आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा करून वाद शमविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी गेले तीन दिवस पंजाबमधील आमदारांशी ही समिती संवाद साधत आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपली बाजू मांडली आहे. आता कॅप्टन अमरिंदर सिंग गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी आपली बाजू मांडण्यासाठी येणार असल्याचे समजते.


नवज्योतसिंग सिद्धू यांना काहीही करून पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. भाजपमध्ये राहून ते शक्य नाही हे लक्षात येताच, त्यांनी पंजाबमध्ये जनाधार प्राप्त करीत असल्याचा दावा करणार्‍या आपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तेथे त्यांचा भ्रमाचा भोपळा लगेचच फुटला. कारण, सिद्धू आणि आप यांनी एकमेकांना सहन करणे हे तसे अवघडच होते. त्यानंतर मग गेल्या विधानसभा निवडणुकीची संधी साधून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी काँग्रेसमधून कॅप्टन यांच्या नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त होण्यास प्रारंभ झाला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढू नये, यासाठी एक गट सक्रिय होता. मात्र, कॅप्टन यांनी आपल्याशिवाय पंजाबमध्ये काँग्रेसला विजय मिळणे शक्य नाही, हे ठासून सांगितले. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर निवडणूक प्रचारात राहुल गांधी नको, हेही त्यांनी मान्य करवून घेतले. त्याचा परिणामही दिसला आणि अकाली दल-भाजप युतीचा पराभव करून त्यांनी काँग्रेसची सत्ता स्थापन करून दाखविली. त्याचप्रमाणे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील काँग्रेस पक्षसंघटनेवरही आपले वर्चस्व निर्माण केले. त्यामुळेच काँग्रेसी असूनही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणे त्यांना शक्य झाले आहे. गतवेळच्या विधानसभा निवडणुकीवेळी आपली ही शेवटची टर्म असेल अशी घोषणा त्यांनी केली. मात्र, सत्ता प्राप्त करताच आपण आणखी एक इनिंग खेळण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग हे सहजासहजी हार मानणार नाहीत. त्याच वेळी काँग्रेसकडेही त्यांच्याशिवाय सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात सुरू झालेली ही मोहीम पेल्यातले वादळ ठरण्याचीच सर्वाधिक शक्यता आहे.


वादाचे कारण गुरू ग्रंथसाहेब यांचा अवमान हे पुढे केले जात आहे. पंजाबमध्ये २०१५ साली ‘गुरू ग्रंथसाहेब अवमान प्रकरण’ झाले आहे. त्याविरोधात कोटकपुरा येथे धरणे आंदोलनास बसलेल्या लोकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्याची चौकशी करण्यासाठी पंजाब सरकारने ‘एसआयटी’ स्थापन केली होती. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने ‘एसआयटी’ आणि त्याचा अहवाल फेटाळून लावला होता. त्यानंतर काँग्रेसमधील एका गटाने राज्याच्या महाधिवक्त्यांनी बाजू योग्य प्रकारे मांडली नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी सातत्याने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना त्यावरून लक्ष्य करण्यास प्रारंभ केला. सिद्धू यांना आता पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद हवे आहे. मात्र, सध्या त्या पदावर कॅप्टन यांचे अत्यंत विश्वासू साथीदार सुनीलकुमार जाखड आहेत. त्यामुळे जाखड यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद असेपर्यंत सिद्धू यांना काहीही करता येणे शक्य नाही.
कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील वादास २०१७ पासूनच प्रारंभ झाला होता.

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर सिद्धू यांना आपल्याला महत्त्वाची जबाबादारी मिळेल, अशी अपेक्षा केली होती. कॅप्टन यांनी त्यांना पर्यटन व ‘लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’ अशी खातीही दिली होती. मात्र, बोलण्यावर नियंत्रण नसलेल्या सिद्धू यांनी एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्ये करण्यास प्रारंभ केला. परिणामी, त्यांना २०१९ साली मंत्रिमंडळातून काढण्यात आले. सिद्धू यांनी २०१९ साली कर्तारपूर कॉरिडोर उद्घाटनप्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. त्याविषयी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आता गेल्या महिन्यात कथित शेतकरी आंदोलनास सहा महिने पूर्ण झाल्याविषयी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याने शेतकरी संघटनांनी पंजाबमध्ये असे काही करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मात्र, तरीदेखील सिद्धू यांनी आपल्या घरावर काळे झेंडे लावून मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखविली. अर्थात, केवळ नवज्योतसिंग सिद्धू हेच त्यांच्याविरोधात नाहीत. यापूर्वी राजिंदरकौर भट्टल आणि प्रतापसिंग बाजवा यांनीदेखील कॅप्टनविरोधात आघाडी उघडली होती. त्यापैकी बाजवा अद्यापही विरोधी गटातच आहेत. मात्र, आता विरोधी गटाचे नेतृत्व सिद्धूंकडे गेले आहे.
दुसरीकडे समितीसमोर आमदार परगट सिंग यांनी गतवर्षी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची प्रत सादर केली. या पत्रामध्ये राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, अमली पदार्थांची तस्करी, ट्रान्सपोर्ट माफिया, भूखंड माफिया असे अनेक मुद्दे मांडले आहेत. या सर्व प्रकारांमुळे राज्य सरकारची आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाची बदनामी होत असून, यावर कार्यवाही न केल्यास निवडणुकीत त्याचा फटका बसेल, असे त्यांनी म्हटले होते. कॅप्टन यांनी या पत्राची वेळीच दखल घेतली असती तर कदाचित आजचा प्रसंग उभा राहिला नसता, असेही त्यांनी बैठकीत सांगितले. त्याचप्रमाणे बैठकीमध्ये सिद्धू यांनीही कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात जवळपास दीड तास आपली बाजू मांडली आहे. यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांची कार्यशैली, बादल परिवाराला वाचविण्याचे प्रयत्न, सहकारी आमदारांचे न ऐकणे आणि मनमानी करणे, असे अनेक मुद्दे मांडले आहेत.


हे सर्व होत असताना काँग्रेसच्या सुदैवाने अकाली दल सध्या निष्प्रभ झाल्याचे चित्र आहे. कृषी सुधारणा कायद्यांवरून कॅप्टन यांनी अकाली दलाला व्यवस्थित कोंडीत पकडले होते. त्यामुळे सुरुवातील कायद्यांना पाठिंबा देणार्‍या अकाली दलाला काही दिवसातच ‘एनडीए’सह केंद्रीय मंत्रिपद सोडावे लागले आणि कायद्यांना विरोध असल्याचे पटवून द्यावे लागले. मात्र, व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. त्यामुळे अकाली दल सध्या अतिशय कमकुवत स्थितीत आहे. भाजपचे तर पंजाबमध्ये म्हणावे तसे अस्तित्वच नाही. शिरोमणी अकाली दल हा भाजपचा ‘एनडीए’मधील सर्वात जुना सहकारी. पंजाबमध्ये कायम अकाली दलाचे बोट धरूनच भाजपने आपले राजकारण केले. त्यामुळे सत्तेत अल्पस्वल्प वाटा मिळाला असला, तरी राज्यात पक्ष रुजविण्यासाठी त्याचा फारसा लाभ झाला नाही. त्यानंतर कृषी सुधारणा कायद्यांवरून भाजप पंजाबमध्ये तरी बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या तरी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसची सत्ता टिकवतील, असेच चित्र आहे.


मात्र, यामध्ये एक ट्विस्टही आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी पंजाबमध्ये प्रचार करू नये, असा आग्रह धरला होता. तो तेव्हा मान्य झाला असला तरीही काँग्रेसमधील टीम राहुल कॅप्टन यांच्यावर नाराज आहेच. पक्षातील अंतर्गत बैठकांमध्येही हा संघर्ष अनेकदा दिसून आला आहे. त्यात कॅप्टन अत्यंत मुत्सद्दीपणे केंद्र सरकारसोबत वेळोवेळी जुळवून घेत असतात. कथित शेतकरी आंदोलनादरम्यान अकाली दल एकाएकी प्रभावी ठरत असतानाच त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अकाली दल पुन्हा आंदोलनात दिसलेच नाही. आतादेखील राहुल गांधी पडद्यामागे असले तरीही अमरिंदर सिंग यांच्या विरोधात असलेल्या पंजाब काँग्रेसमधील नेतृत्वाच्या दुसरी फळीतील नेत्यांसोबत त्यांनी संवाद साधला आहे. सिद्धू आणि राहुल गांधी यांचे सख्यही जगजाहीर आहे. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधातील हे बंड खरोखर प्रादेशिक नेतृत्वाविषयी आहे की, पक्षश्रेष्ठींचीही त्यात महत्त्वाची भूमिका आहे, या प्रश्नाचे उत्तरच पंजाब काँग्रेसच्या वादाचा तोडगा आहे.
@@AUTHORINFO_V1@@