हिंसेचे बळी ठरणारी बालकं!

    03-Jun-2021   
Total Views | 71

jp_1  H x W: 0


दि. १९ऑगस्ट, १९८२रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने पॅलेस्टाईनच्या आग्रहाखातर ४ जून हा दिवस हिंसेमध्ये बळी पडलेल्या बालकांना समर्पित करायचे ठरवले. त्यावेळी पॅलेस्टाईनने भूमिका मांडली होती की, इस्रायलच्या हल्ल्यात लहान मुलं मारली जात आहेत, तर त्यावेळी संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक स्तरावरील हिंसेत बळी जाणार्‍या बालकांचे स्मरण करून ४ जून हा दिवस त्या बालकांना समर्पित केला.


आज ४ जून. हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंसेमध्ये बळी गेलेल्या बालकांना समर्पित आहे. ‘इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रेन विक्टिम्स ऑफ अग्रेशन’ असे इंग्रजीचे या दिवसाचे नामकरण. दि. १९ऑगस्ट, १९८२रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने पॅलेस्टाईनच्या आग्रहाखातर ४ जून हा दिवस हिंसेमध्ये बळी पडलेल्या बालकांना समर्पित करायचे ठरवले. त्यावेळी पॅलेस्टाईनने भूमिका मांडली होती की, इस्रायलच्या हल्ल्यात लहान मुलं मारली जात आहेत, तर त्यावेळी संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक स्तरावरील हिंसेत बळी जाणार्‍या बालकांचे स्मरण करून ४ जून हा दिवस त्या बालकांना समर्पित केला. अर्थात, संयुक्त राष्ट्र महासभेने वर्षाचे कितीतरी दिवस कशाला ना कशाला समर्पित केले आहेत, तर यात ४ जूनचे वैशिष्ट्य ते काय? पण, सध्याच्या जागतिक घडामोडी पाहता, या दिवसाला विशेष महत्त्व आहे. १९८२ साली ज्या पॅलेस्टाईनने संयुक्त राष्ट्र महासभेकडे हिंसेमुळे लहान मुलांच्या होणार्‍या मृत्यूबाबत मदत मागितली होती, यावर्षी तेच चित्र जरा पालटलेले दिसले. पॅलेस्टाईनने इस्रायलवर नेहमीच अत्याचारीत राष्ट्र सत्ता म्हणून आरोप केले. जगभरातून त्यावेळी इस्रायलच्या हल्ल्याची निंदा केली गेली.


पण, २०२१ साली चित्र आणि वास्तव काय आहे? तर इस्रायल हल्ला करतो, असे आकांडतांडव करणार्‍या, रडणार्‍या पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या पवित्र धार्मिक स्थळावर हल्ला केला. तेव्हा त्या धार्मिक स्थळी मोठ्यांसोबत लहान मुलंही होतीच. देवाची करुणा भाकताना या लहान बालकांवर हल्ला झाला होता. त्यानंतर ‘हमास’ने पॅलेस्टाईनमधून असे अनेक हल्ले केले. परिणाम असा झाला की, पॅलेस्टाईन जे नेहमी म्हणायचा की, आमच्यावर हल्ला होतो ते चित्र उघडे पडले. असो.जगभरात हिंसेत मृत्यू पावलेल्या बालकांचे प्रमाण लक्षणीय आहे. एका जागतिक सर्वेक्षणानुसार दर पाच मिनटाला जगात कुठे ना कुठे हिंसेमुळे बालकांचा मृत्यू होत असतो. ही हिंसा एका व्यक्तीची ते अगदी एका राष्ट्राचीही असू शकते. लहान बालकांवर अत्याचार करणे सोपे असते, कारण ते प्रतिकार करू शकत नाहीत. तसेच आपल्यावर अत्याचार होत आहे किंवा अत्याचार होऊ शकतो, याची जाणीवही बरेचदा त्यांना नसते. यामुळे त्यांच्यावर लादली गेलेली हिंसा ही मोठ्या प्रमाणात आहे.

आफ्रिका खंडातील मुस्लीम राष्ट्रांमध्ये इस्लामी दहशतवादाने अगदी कहर माजवला आहे. इथे मरणारे निष्पाप आणि त्यांना मारणारे कू्रर दहशतवादी एकाच धर्मात जन्मलेले आणि एकाच धर्माच्या शिकवणीनुसार जगतो असे मानणारे. पण, इथेही सगळ्यात जास्त अत्याचार होत असतील आणि हिंसेत मृत्युमुखी पडत असतील तर ती लहान मुलेच. हे क्रूर दहशतवादी लहान मुलांची शाळा, हॉस्पिटल यांच्यावर हल्ला करतात. कारण, लहान मुलांवर कोणी हल्ला करू शकेल हे सहसा कुणाच्याही लक्षात येत नसते. त्यामुळे शाळा आणि हॉस्पिटल इथे या दहशतवाद्यांचा शिरकाव तसा थोडा सहज होतो. बरं, लहान मुलांवर हल्ला करत असताना ते प्रतिकार करण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे प्रतिहल्ला होणार नाही. त्यातच शाळा, हॉस्पिटलमधील लहान मुलांवर हल्ला केला की, त्या हल्ल्याला मीडियामध्ये चांगले ‘कव्हरेज’ मिळते. क्रूरकर्मा दहशतवादी संघटना म्हणून जगभरात ओळख मिळते.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे, पाकिस्तानच्या पेशावरमधील शाळेतील हल्ला किंवा नुकताच अफगाणिस्तानमधील हॉस्पिटलमध्ये झालेला हल्ला. या दोन्ही घटनेने जग हादरून गेले होते. या घटनांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. दुसरीकडे दहशतवादी संघटना ‘मानवी बॉम्ब’ म्हणून लहान मुलांचा वापर करत आहेत. पण, अभ्यासकांच्या मते युद्धसदृश स्थितीत किंवा दहशतवादामुळे मुलांचा मृत्युदर वाढत असला तरी मानवी तस्करी, इतर गुन्हेगारीमुळेही बालकांचा मृत्युदर जास्त आहे. नशेखोरीमुळेही बालकांचा मृत्यू जास्त प्रमाणात होत आहे. जागतिकीकरणाचा आणि सध्या कोरोनाचा प्रभाव बालकांवर होत आहे. वेळेच्या आधी बालक तरुण होत आहेत. त्यात सध्याची जीवित, सामाजिक अस्थिरता बालकांनाही चिंतित करत आहे. 4 जूनच्या ‘इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रेन विक्टिम्स ऑफ अग्रेशन’ दिवसानिमित्त तरी आपण सदिच्छा व्यक्त करू की, कुणीही बालक कधीही हिंसेमुळे मृत पावणार नाही.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121