मुंबई : १०० कोटी वसुलीच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सचिवांना अटक केल्यानंतर ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावला. यापूर्वी १ पानी समन्ससोबत अन्य कागदपत्रेही माहितीसाठी द्यावीत, अशी मागणी करत देशमुख यांनी टाळले. त्यानंतर ईडीने मंगळवारी पुन्हा हजर राहण्यासाठी समन्स पाठवले. त्यावेळीही देशमुखांनी ईडीच्या कार्यालयात येण्यास विरोध केला. वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचे कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.
ईडीने २५ जून रोजी समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. ईसीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रे मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे. आजही (२९जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन. मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे हा क्राईम इंटिलिजन्स यूनिटचे प्रमुख होते. गेल्या काही महिन्यात (तत्कालीन) गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेला त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले, अशी माहिती या पत्रातून देण्यात आली. यानंतर उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाची चौकशी ईडीकडून केली जात आहे.