अफगाणी हवाईदल आणि भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2021   
Total Views |

afghan_1  H x W
 
 
लोकशाहीचे रक्षण वगैरे करण्यासाठी दीर्घकाळपासून अफगाणिस्तानमध्ये असलेले अमेरिकेचे सैन्य आता मायदेशी परत जाणार आहे. मात्र, या घटनेचा परिणाम संपूर्ण जगावर होणार असून भारत, चीन, पाकिस्तान, इराण, रशिया आदी देशांवर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येईल. मात्र, अमेरिकी सैन्य माघारी गेल्यानंतर अफगाणिस्तानचे लष्कर आणि हवाईदल पुढील परिस्थिती सांभाळण्यास सक्षम असेल का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये भारत मात्र अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो.
 
 
अफगाणिस्तानच्या भूमीवर होत असलेल्या दहशतवादी कारवायांविरोधात लढा देण्याच्या दृष्टीने ‘एएएफ’ अर्थात अफगाणिस्तानचे हवाईदल नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे. मात्र, आता तिथून अमेरिकाच माघार घेत असल्याने अफगाणी हवाईदलाची कार्यक्षमताही कमी होण्याची दाट शक्यता आहे. कारण, अमेरिकेच्या माघारीसोबतच अफगाणच्या हवाईदलाला कार्यरत ठेवण्यासाठी तिथे प्रयत्नपूर्वक काम करत असलेले १८ हजारांहून अधिक कंत्राटदारही आपोआपच माघारी जाणार आहेत. यामुळे ‘एएएफ’ची क्षमता लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. अफगाणच्या हवाईदलात कार्यरत असलेली ‘यूएच-६० ब्लॅक हॉक’ सारखी विमाने आणि ‘एमडी ५०० डिफेंडर हेलिकॉप्टर्स’, तसेच बंडखोरांविरोधातल्या कारवाईसाठीची ‘ए २९ सुपर टुकानो’सारखी विशेष विमाने, ही अमेरिकी बनावटीची आहेत. या सगळ्यांच्या देखभालीसाठी अफगाणी हवाईदल पाश्चिमात्य कंत्राटदारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि पर्यायी उपाययोजना करण्यासाठी अमेरिकेचे स्वारस्य असल्याचे दिसत नाही आणि अफगाणिस्तानकडे तशी उपाययोजना करण्याची क्षमता नाही.
 
 
त्याच वेळी तालिबानने क्षेपणास्त्रांचा जमिनीवरून हवेत मारा करू शकतील, अशा यंत्रणेत गुंतवणूक केली असल्याचे काही अहवालांमधून समोर आले आहे. अर्थात, याआधी अशा यंत्रणेच्याबाबतीत सक्षम नसतानाही, यावर्षीच्या एप्रिल महिन्यात, अफगाणी हवाईदलाचे ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर आपण पाडले असल्याचा दावा तालिबानने केला होता.
 
 
अफगाणी हवाईदलात रशियन हेलिकॉप्टरचे वाढलेले महत्त्व आणि ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टरचे असलेले निर्णायक स्थान भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात शेकडो ‘एमआय-१७’ कार्यरत आहेत. त्यामुळे भारत-अफगाणी हवाईदलाला त्यांच्या ताफ्यातल्या रशियन बनावटीच्या हेलिकॉप्टर्सचा वापर कायम ठेवून, त्यांचे हवाईदल कार्यरत ठेवण्यात मदत करू शकते. तसे झाल्यास अमेरिकी सैन्याने माघार घेतली तरीदेखील अफगाणिस्तानला त्यांच्या दहशतवादविरोधी आणि ‘कॉईन’ मोहिमेतील बहुतांश विभाग कार्यरत ठेवणे, तसेच प्रत्यक्षात लढा देत असलेल्या अफगाणी सैन्याला सहकार्य करणे शक्य होऊ शकेल.
 
 
‘एमआय-१७’ची निर्मिती करण्यार्‍या रशियानंतर, भारतीय हवाईदलाकडेच ‘एमआय-१७’ आणि याच वर्गातल्या त्याच्या नव्या स्वरूपातली हेलिकॉप्टर्स उडवण्याचा सर्वाधिक अनुभवदेखील आहे. भारताच्या हवाईदलातले वैमानिक अफगाणिस्तानातल्या परिस्थिप्रमाणेच दुर्गम असलेल्या इथल्या डोंगर आणि पर्वतरांगांमध्ये या हेलिकॉप्टर्सचा वापर करत आले आहेत. त्यामुळे या हेलिकॉप्टर्सच्या वैशिष्ट्यांबाबत विशेषतः अफगाणिस्तानातल्या कठीण परिस्थितीत ती कशी हाताळली गेली पाहिजे, याबाबत भारतीय हवाईदलातल्या वैमानिकांना चांगलीच माहिती आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या हवाईदलास नवी दिशा देण्यासाठी भारतीय हवाईदल अतिशय निर्णायक भूमिका पार पाडू शकते. वेगवान हेलिकॉप्टर्ससंदर्भात भारताकडे उपलब्ध असलेले पर्याय मर्यादित आहेत. मात्र, असे असले तरीही भारत, अफगाणी हवाईदलाला ‘एमआय-१७’ हेलिकॉप्टर्सचा वापर चालू ठेवता येण्यासाठीचे तांत्रिक सहकार्य देऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे, या माध्यमातून, अफगाणिस्तानात लोकशाही वृद्धिंगत व्हावी, यासाठी आजवर केलेल्या आपल्या गुंतवणूक आणि प्रयत्नांना भारत पाठबळ देऊ शकतो.
 
 
अर्थात, अफगाणिस्तानात अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर भारताला नेमकी कोणत्या प्रकारची भूमिका पार पाडायची आहे, त्यावर भारताचे याविषयीचे धोरण ठरणार आहे. त्यावरच भारतीय हवाईदल आणि अफगाणी हवाईदलातल्या परस्पर सहकार्याचा आराखडा अवलंबून असणार आहे. त्यासाठी आजवर अफगाणिस्तानविषयी पूर्ण क्षमतेने वापरली न गेलेली भारताची लष्करी राजनैतिकता कामी येऊ शकेल. महत्त्वाची बाब म्हणजे, दीर्घकालीन विचार करता, ‘एचएएल ध्रुव’सारखी अधिक उंचावर उड्डाण करण्याच्या दृष्टीने निर्माण केलेली भारतीय बनावटीची हेलिकॉप्टर्स, अफगाणी हवाईदलाला मिळावीत, अशी मागणीही भारताकडे नोंदवली जाण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@