मुंबई : १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांभोवती कारवाईचा फास आणखीच घट्ट होताना दिसतो आहे. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीने अटक केल्यानंतर, आता स्वत: अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ईडीने अनिल देशमुख यांना समन्स बजावले असून २६ जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांना ईडी कार्यालयात चौकशीला बोलावले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांची वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर कोर्टाच्या आदेशाने याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. एप्रिल २०२१ला आधी अनिल देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख यांची ईडीने चौकशी सुरु केली आहे. २५ जून रोजी ईडीने अनिल देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदेआणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान काल ईडीने तळोजा कारागृहातून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचाही जबाब नोंदवण्यात आला. तसंच ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याची माहिती मिळाली. यात सुमारे १० ते १२ बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. या बार मालकांनी मिळून काही महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.