रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष अरुणराव दाते यांनी नुकतीच वयाची ७५ वर्षं पूर्ण केली. त्यानिमित्त हा विशेष लेख...
‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती.’ अरुण माधव दाते, थळ यांच्याविषयी विचार करताना मला सतत वरील काव्यपंक्तींची आठवण येते. त्यांच्या वयाला नुकतीच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हा लेख.वय सांगून कुणाला खरं वाटणार नाही, असा उत्साह, तरुणांना लाजवेल अशी क्रियाशीलता आजही त्यांच्याठिकाणी ओसंडून वाहत आहे. ज्येष्ठ संघ प्रचारक कै. दामूअण्णा दाते यांचे ते धाकटे बंधू. वडिलांची फिरतीची नोकरी. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अरुणरावांचं शालेय शिक्षण झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्यात पूर्ण केलं. त्यावेळी ज्येष्ठ संघ कार्यकर्ते श्रीपती शास्त्री यांच्याबरोबर एका खोलीत राहण्याचा योग, अनेक संघ कार्यकर्त्यांचा सहवास, यामुळे सामाजिक, राष्ट्रीय कार्याबद्दलचा विचारांचा त्यांचा पाया पक्का झाला.
नंतर मुंबईला ‘व्होल्टास’ कंपनीत उत्तम नोकरी, सुविद्य पत्नी अनितावहिनी, माहेरच्या दिवे आगार येथील आवळसकर. लौकिक अर्थानी सर्व काही ठीक असताना थळ येथे राहणारे दोन्ही बंधू अचानक मृत्यू पावले. घरी आई, वडील व मोठी वाडी. ती सांभाळण्यासाठी कोणी नाही. अशा वेळी मुंबईची चांगली नोकरी सोडून थळला राहण्याचा निर्णय घेतला. दाते वहिनींनीही या निर्णयात त्यांना आनंदाने साथ दिली. सामान्यपणे शहराचा ओढा असणार्या त्या काळात असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचा हा निर्णय निश्चितच आदर्श असा होता. दोन्ही वहिनींना त्यांच्या अधिकाराचा वडिलोपार्जित हिस्सा देऊन त्यांचे पुनर्विवाहही त्यांनी करून दिले. आजही त्यांच्या कुटुंबीयांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या बाबतीत कै. दामूअण्णांचे मार्गदर्शन होतेच, तरीही त्यांचा प्रगल्भ आणि न्याय्य विचार मला विशेष भावतो.
अलिबाग येथे महाराष्ट्र बँकेत त्यांना नोकरी मिळाली. त्या काळात भारतीय मजदूर संघप्रणित बँक कर्मचारी संघटनेचे त्यांनी संपूर्ण कोकण विभागात प्रवास करून काम केले. माझा त्यांचा प्रथम परिचय १९८३ साली मी ‘आरसीएफ’ला नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलो तेव्हा झाला. दामूअण्णांनीच आवर्जून त्यांच्याकडे जाण्यास सांगितले होते. त्यावेळीपासून ते घर माझेच झाले. १२ वर्षे मी थळमध्येच राहत होतो. त्या काळात संघाच्या कामात व वैयक्तिकही त्यांनी मला सर्व प्रकारे मदत केली. कै. दामूअण्णा विश्रांतीसाठी वर्षातून एकदा तरी येत असत. त्यांच्यामुळे अनेक मोठे कार्यकर्ते थळ येथे येत असत. या सर्वांशी विशेषतः वहिनींच्या वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळ्या चर्चा होत असत. कै. दामूअण्णा संघकामासाठी महाराष्ट्र प्रांतात सर्वत्र प्रवासात असल्याने थळमधील अनेकांना त्यांची ओळख करून देण्याचे (सूर्याची ओळख करून देण्यासारखेच) भाग्य मला लाभले.
पुढे अलिबाग येथे ‘रायगड प्रबोधिनी’ या नावाने संघ कार्यालय सुरू झाले. त्यात अरुणराव उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. १९९९ पासून रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे ‘ग्रामआरोग्य रक्षक’ योजनेचे मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले. तेव्हापासून त्यांनी ‘जिल्हा कोषाध्यक्ष’ ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. अलिबाग येथील अनेक मान्यवर ठरावीक देणगी दर वर्षी देतात. त्यांच्या संपर्कामुळेच हे शक्य होते. ते कोषाध्यक्ष असल्याने जिल्ह्याचे हिशोब सर्वात प्रथम प्रांतास जातात. वेळ लागला तर ते स्वतः खूप अस्वस्थ असतात.
अलिबाग येथे रुग्ण साहित्य केंद्राला सुरुवात करताना सौ. व श्री विजय रानडे, महाजन, भाटवडेकर, सौ. व श्री डॉ. दिवेकर, सौ. व श्री. दिलीप जोशी यांच्याबरोबर सौ. व श्री दाते यांचा सक्रिय सहभाग लाभला. आठवड्यातून एक दिवस आजही ते नियमित केंद्रावर जातात. सुरुवात करताना रोहा व मुरूड येथील दोन केंद्रं पाहून सुरुवात केली, हे विशेष. आज या केंद्रामुळे अलिबाग शहरात जनकल्याण समिती सर्वांना माहिती झाली आहे व अनेक सहानुभूतीदारही तयार झाले आहेत. राजा टिल्लू, लेले, दिवेकर, सुतार, शेट्ये असे अनेक नवीन कार्यकर्ते यामुळेच जनकल्याण समितीला मिळू शकले.
त्यांना प्रवास व ‘लॉन्ग ड्राईव्ह’ याची विशेष आवड. त्यांच्याबरोबर आम्ही दोन वेळा पूर्वांचल प्रवास केला आहे. आज अरुणराव रा. स्व. संघ जनकल्याण समिती, कुलाबा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात.त्यांच्या कडक स्वभावामुळे एक भीतियुक्त आदर माझ्या व अन्य कार्यकर्त्यांच्या मनात कायम राहिला आहे. बैठक वा प्रवासासाठी ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटे जरी उशीर झाला तरी लगेच त्यांचा फोन आलाच म्हणून समजा. कै. दामूअण्णांची कडक शिस्त त्यांच्यात आणि त्यांच्या मुलांमध्येही पूर्ण उतरली आहे. मी स्वतः त्यांना कै. दामूअण्णा दातेंच्या स्थानीच समजतो.अशा अरुणरावांना दीर्घायू लाभो व त्यांचे मार्गदर्शन आम्हाला असेच मिळत राहो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
- अविनाश धाट
(लेखक रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कोकण संभाग कार्यवाह आहेत)