गाय वासराला जन्म दिल्यानंतरचे दृश्य आम्ही पाहिले आहे काय? ऋषींची दृष्टी तिथे पोहोचली आणि लगेच त्यांनी आपल्या वेदमंत्रात तिचे उदाहरण दृष्टान्त म्हणून वापरले. गाय वासरावर अपार प्रेम करते, पण इतरांपेक्षा अधिक!
सहृदयं सांमनस्यमविद्वेषं कृणोमि व:।
अन्यो अन्यमभिहर्यत वत्सं जातमिवाघ्न्या॥
(अथर्ववेद-३.३०.१)
अन्वयार्थ
परमेश्वर म्हणतो - मी (व:)तुम्हा सर्वांना (सहृदयम्) सहृदयी- हृदयाने युक्त, (सांमनस्यम्) सुमनाचा-चांगल्या मनाने परिपूर्ण आणि (अविद्वेषम्) द्वेषरहित (कृणोमि) बनवतो, करतो. (अन्य:) एका माणसाने (अन्यम्) दुसर्या माणसाशी (अभिहर्यत) असा प्रेमळ व्यवहार करावा की (इव) जशी (अघ्न्या) गाय (जातम्) आपल्या नवजात- नुकत्याच जन्मलेल्या (वत्सम्) वासरासोबत करीत असते.
विवेचन
प्रेम ही परमेश्वराकडून सबंध प्राणी समूहाला मिळालेली अद्भुत देणगी होय. म्हणूनच तर देवाघरचे लेणे असलेल्या या प्रेमाला कोणीही उपमा देऊ शकत नाही. स्नेह, ममता, वात्सल्य ही प्रेमाची पर्यायवाची नावे आहेत. प्रेमरुपी धाग्यानेच तर एक जीव दुसर्या जीवाशी बांधला जातो. प्रेमाधिक्याने शत्रुत्वाची भावना नाहीशी होऊन मित्रत्वाचे नाते जडते. निस्सिम शाश्वत प्रेम हे केवळ स्वार्थापोटी वा वरकरणी कदापि नसते. त्यासाठी आंतरिक संवेदना जागृत व्हाव्या लागतात. प्रत्येक मानवाच्या हृदयात प्रेमाचा झरा वाहत असतो. मग तो कितीही क्रूर का असेना; कधी ना कधीतरी त्याच्या अंतरंगात प्रेमभावनांचे सुमधुर पुष्प उमलणारच! मातृ-पितृप्रेम असो की, बंधू- भगिनींचे प्रेम असो, मित्र-मैत्रिणींचे असो की पती-पत्नीविषयक एकमेकांवरचे असो, मातृभूमीविषयीचे असो की प्राणिमात्रांवरील असो, ही प्रेमाची वेगळी उदाहरणे आहेत. प्रेमाचा विस्तार हा आपल्या गुणाधिक्यावर आधारलेला असतो. जसजसे आपले हृदय व मन मोठे होत जाते, तसतशी प्रेमवेलदेखील वाढतच जाते.
मागील सदरात याच मंत्राचा पूर्वार्ध पाहिला होता. तिथे पहिल्या चरणात हृदयातून प्रकट होणार्या प्रेमभावनांना मनातून होणार्या व्यक्त होणार्या सद्विचारांची म्हणजेच सद्बुद्धीची जोड हवी, तरच प्राणिसमूहाविषयी आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत मिळते. यामुळे कोणाविषयीही द्वेष-मत्सराची दुर्भावना राहणार नाही, असा प्रेमाचा व्यापक दृष्टिकोन दृष्टीस पडतो-
सहृदयं सांमजस्यमद्वेषं कृणोमि व:।
परमेश्वर मानवाला तीन गोष्टींनी परिपूर्ण करू इच्छितो. हृदयातील प्रेमाची सहज भावना व मनातील सद्विचारांचा म्हणजेच सद्बुद्धीचा वावर या दोन्ही बाबी एकत्र आल्या की जगातील मानवामध्ये आपोआपच इतरांविषयी आपुलकीची भावना येऊ लागते. सर्व भूतांशी कमालीचा द्वेषराहित्यभाव दिसू लागतो. म्हणजेच अहिंसेची पराकाष्ठा उदयास येऊ लागते महर्षी व्यास योगभाष्यात म्हणतात-
तत्राहिंसा सर्वथा सर्वदा सर्वभूतानामनभिद्रोह:।
याच प्रेमाचे स्वरूप पुढे इतके व्यापक बनते की, तो सबंध पृथ्वीवरील सर्व प्राणी समूहावर व जगातल्या प्रत्येक मानवावर प्रेम करू लागतो. ‘हे विश्वची माझे घर’ या संत वचनानुसार त्याची मती रुंदावते आणि ‘जगाला प्रेम अर्पावे’ हा त्याचा खरा धर्म होऊ लागतो. पण, हे प्रेम असावे तरी कसे? यासाठी चटकन समोर उभी राहते, ती माता! ती माता कोणती तर गोमाता! कारण, ती वात्सल्य व प्रेमाचे सर्वोत्तम प्रतीक आहे. यासाठी या वेदमंत्राचा उत्तरार्ध म्हणतो-
अन्यो अन्यमभिहर्यत वत्सं जातमिवाघ्न्या।
म्हणजेच आपण एक दुसर्यावर इतके जीवापाड प्रेम करावे की, जशी एखादी गाय आपल्या नवजात वासराला करते. गाईसाठी असंख्य नावे आहेत. पण, इथे आलेला ‘अघ्न्या’ हा शब्द बराच महान अर्थ सांगून जातो. ‘अघ्न्या’ म्हणजे मारण्यास योग्य नसलेली! जगात सर्वच प्राणी अघ्न्य आहेत. पण, तिच्यात असलेल्या असंख्य गुणवैशिष्ट्यांमुळे ती सर्वाधिक अघ्न्या ठरते. म्हणूनच केवळ गाईसाठी वेदांनी ‘अघ्न्या’ हा शब्द प्रयुक्त केला आहे. प्रेमाचे उत्कृष्ट उदाहरण दृष्टान्त म्हणून इथे वापरले आहे. हे पाहून प्रत्येक सहृदयी माणसाच्या मनात गाईविषयी आत्मिक भावना जागी झाल्याशिवाय राहणार नाही. गाय वासराला जन्म दिल्यानंतरचे दृश्य आम्ही पाहिले आहे काय? ऋषींची दृष्टी तिथे पोहोचली आणि लगेच त्यांनी आपल्या वेदमंत्रात तिचे उदाहरण दृष्टान्त म्हणून वापरले. गाय वासरावर अपार प्रेम करते, पण इतरांपेक्षा अधिक!
बाळाला जन्म देणार्या बाळंत स्त्री माता आपल्या असह्य वेदनांमुळे बाळाकडे क्वचितच लक्ष देतात. नवजात शिशुची काळजी घेण्यासाठी इतर महिला असतात. त्यामुळे आई निश्चिंत राहते. पण, गाईसाठी कोण आहे? तिच्या वासराची काळजी कोण वाहील? या कार्यासाठी तीच पुढे सरसावते आणि पहिले कार्य करते, ते म्हणजे आपल्या वासराला न्हाऊ घालण्याचे! यासाठी तिच्याजवळ पाणीही नाही आणि वस्त्रदेखील नाही! म्हणून ती चक्क आपल्या प्रिय अशा जिभेचा वापर करते. तिच्याकरिता आपल्या मुखातील जीभ हेच तर वस्त्र आणि पाणी! आपल्या नवजात वासराला जिभेने चाटून-चाटून स्वच्छ करते. जोपर्यंत वासरू स्वच्छ होत नाही, तोपर्यंत तिला चैन पडत नाही. बाळाच्या अंगावर कुठेही घाण राहू नये, याकरिता ती आपले सर्व दुःख विसरून स्नान घालण्याच्या कामाला लागते. बाळ स्वच्छ झाला की तिला आनंद होतो. शरीरावरील कोणताही भाग व अस्वच्छ राहू नये, यासाठी ती धडपडते, प्रयत्न करते! आजूबाजूला कोणी आहे की नाही याचीही तिला जाणीव नसते. फक्त एकच उद्देश तो म्हणजे आपला वत्स स्वच्छ व सुंदर बनावा! स्वच्छतेनंतर गरज असते ती खाऊ घालण्याची! गाईच्या स्तनाला एवढा पान्हा फुटतो की दुधाच्या धारा वाहू लागतात. जोपर्यंत आपले वासरू येऊन ढुसण्या मारत नाही, तोपर्यंत तिला हायसे वाटत नाही. म्हणूनच स्वच्छतेबरोबरच भोजनाचीही व्यवस्था ही गोमाता करते. गाईचे नवजात वासराविषयीचे प्रेम खरोखरच किती सर्वश्रेष्ठ आहे? यापेक्षा प्रेमाचे दुसरे सर्वोत्तम आणि बोधप्रद असे उदाहरण होऊ शकत नाही. वेदांनी प्रत्येक माणसांवर असे गाईप्रमाणे प्रेम करण्यास सांगितले आहे.
आज जगात अज्ञान, अविद्या, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, जातिभेद, पंथभेद या विविध दोषांमुळे समाज व राष्ट्र अस्वच्छ झाला आहे. जोपर्यंत या अस्वच्छतेवर मात केली जाणार नाही, तोपर्यंत बाह्य स्वच्छता काही कामाची नाही. एकदा काय आंतरिकदृष्ट्या मानव स्वच्छ व पवित्र झाला की, त्याला सत्यज्ञानरुपी अन्नाचे खानपान करविले पाहिजे. केवळ बाह्य स्वच्छता आणि खाण्यापिण्याचे धान्य उपलब्ध करून चालणार नाही, तर त्याहीपेक्षा गरज असते ती आंतरिक स्वच्छतेची व सत्यज्ञानरुपी भोजनाची! सध्याची व्यवस्था याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतेय. म्हणूनच सर्व काही असतानादेखील सबंध विश्वात दुःख व दारिद्य्राचे वातावरण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.
याकरिता गाईच्या वासरावरील प्रेमाचा हा सर्वोत्तम दृष्टान्त हा व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र व शेवटी विश्वस्तरावरदेखील सर्वांच्या सर्वांगीण कल्याणासाठी फारच प्रासंगिक व तितकाच मोलाचा आहे. आम्ही एक दुसर्यावर असे वेदोक्त जीवापाड प्रेम केले, तर जगातून शत्रुत्व भावनेचा अंत होईल आणि ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद्दु:खभाग्भवेत्।’ हे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही.
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य