‘रेकॉर्डब्रेक’! एका दिवसात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना ‘कोरोना’ लस

    22-Jun-2021
Total Views | 52

vaccine_1  H x
नवी दिल्ली : देशातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सोमवार, दि. २१ जूनपासून केंद्र सरकारने आपल्या हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, म्हणजे पहिल्याच दिवशी देशभरात ७५ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली.
 
 
राज्यांना लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविता न आल्याने केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरणही आपल्या अखत्यारित घेतले आहे. ‘जागतिक योग दिना’चे औचित्य साधून या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. केंद्र सरकारने लसीकरणासाठी सुव्यवस्थित योजना आखल्याने एका दिवसात तब्बल ८२ लाख, ७० हजार, १९१ जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
 
 
भारतात गेल्या २४ तासांत ५३ हजार, २५६ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या ८८ दिवसांतली ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या आहे. भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. सलग १४ दिवस एक लाखांपेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात सध्या ७ लाख, ०२ हजार, ८८७ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णसंख्येत एकूण २६ हजार, ३५६ इतकी घट झाली असून सध्या देशात केवळ २.३५ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. ‘कोविड-१९’ संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत असल्याने सलग 39 व्या दिवशी भारतात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासांत ७८ हजार, १९० रुग्ण बरे झाले आहेत. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तासांत जवळपास २५ हजार रुग्ण बरे झाले.
 
 
भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण २ कोटी, ८८ लाख, ४४ हजार, १९९, तर गेल्या २४ तासांत ७८ हजार, १९० रुग्ण ‘कोविड-१९’ संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर ९६.३६ टक्के झाला आहे. चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ लाख, ८८ हजार, ६९९ चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण ३९.२४ कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहिक ‘पॉझिटिव्हिटी’ ३.३२ टक्के, तर दैनंदिन ‘पॉझिटिव्हिटी’ ३.८३ टक्के आहे. सलग १४ व्या दिवशी हा पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे.
 
 

लसीकरण मोहिमेने गाठला ३० कोटींचा टप्पा
 
 
 
भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने ३० कोटींचा मैलाचा टप्पा पार केला आहे. मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत २९.३५ कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून २६ कोटी, ३६ लाख, २६ हजार, ८८४ मात्रा वापरल्या गेल्या आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही २.९८ कोटींपेक्षा जास्त मात्रांचा साठा उपलब्ध आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121