मेधा कुलकर्णी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी

    22-Jun-2021
Total Views |

mEDHA _1  H x W




मुंबई : पुण्यातील कोथरूडच्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानथी श्रीनिवासन यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली.


सोमवारी सायंकाळी भाजपतर्फे महिला मोर्चाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये ७ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ३ राष्ट्रीय महामंत्री, ७ राष्ट्रीय मंत्री तसेच कोषाध्यक्ष, कार्यालय प्रभारी, मीडिया प्रभारी व सोशल मीडिया प्रभारी यांचा समावेश आहे.
 
 
या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी यांना राष्ट्रीय स्तरावर पक्षसंघटनेत स्थान देण्यात आले असून त्यांची महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मेधा कुलकर्णी यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यापूर्वी पुणे महानगरपालिकेतही नगरसेविका म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी राहिली आहे.
 
 
मेधा कुलकर्णी यांनी या नियुक्तीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले. तसेच, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मेधा कुलकर्णी यांचे या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.