बहुआयामी शिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2021   
Total Views |

 


manas_1  H x W:

 
नाशिक येथील डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा कार्यमागोवा घेणारा हा लेख...


भारताला अगदी पुरातनकाळापासूनच गुरूंची थोर परंपरा लाभली आहे. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा आणि मार्गदर्शक ठरणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. “शिक्षकाने शिकविण्यापेक्षा मार्गदर्शक म्हणून आपली कार्यभूमिका बजावावी,” असे मत महर्षी अरविंदो यांनी व्यक्त केले आहेच. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता, समाजात सद्कार्याची शृंखला निर्माण व्हावी, आपण सातत्याने कार्यरत राहावे, याच धारणेतून विविध क्षेत्रांत नाशिक येथील डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज कार्य करत आहेतपंजाब येथील पटियाळा हे डॉ. भारद्वाज यांचे मूळ गाव. १९९१ मध्ये डॉ. भारद्वाज यांचे वडील रामस्वरूप भारद्वाज हे सैन्यातून निवृत्त झाले. त्याच काळात पंजाबमध्ये अशांत वातावरण होते.



त्यातच डॉ. भारद्वाज यांचे वडील नाशिक येथील देवळाली येथून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे भारद्वाज कुटुंबीय नाशिक येथे स्थायिक झाले. ‘एमए’, ‘एमपीएम’, ‘एमबीए’, पीएचडीपर्यंत शिक्षण झालेल्या डॉ. भारद्वाज यांनी प्राध्यापक म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. भोंसला सैनिकी महाविद्यालयात सलग २४ वर्षे मानसशास्त्र विभागप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली. तसेच त्यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालय’ येथे पाच वर्षे प्राचार्य म्हणून महाविद्यालय प्रशासनाची धुरादेखील सांभाळली.



महिला महाविद्यालयात जेव्हा पुरुषांच्या हाती नेतृत्व असते, तेव्हा अनुशासनाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. या महाविद्यालयात विवाहित आणि अविवाहित अशा दोन्ही विद्यार्थिनी या शिक्षण घेत आहेत. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना गणवेश निर्धारित करणारे उत्तर महाराष्ट्रातील हे पहिले महाविद्यालय ठरले आहे. वरिष्ठ महाविद्यालय आणि त्याला गणवेश हे काहीसे न रुचणारे समीकरण आपल्या महविद्यालयात साकारण्याकामी डॉ. भारद्वाज यांनी पालकांशी संवाद साधत त्यांना याचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यामुळे पालकांनीच हा गणवेशाचा आग्रह धरला. प्राध्यापकांशी व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाशी सलोख्याचे संबंध ठेवताना त्यांच्या भूमिकेत जात, त्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाचे प्रश्न समजून घेतले. त्यामुळे या महाविद्यालयातील पाच वर्षांच्या काळात त्यांनी कर्मचारी वर्गाप्रति ‘मेमो’ या शब्दाचा कधीही उपयोग केला नाही. त्यामुळेच कला आणि वाणिज्य या दोनच शाखा असताना या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट महाविद्यालया’चा पुरस्कारही प्राप्त झाला. महाविद्यालयात काही लाख रुपयांच्या योजनांची सुरुवात करताना कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यात डॉ. भारद्वाज यांचे मोलाचे योगदान होते. त्यामुळे नाशिक शहरात या महाविद्यालयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीमानसशास्त्र’ या विषयाचे विद्यार्थी असलेल्या डॉ. भारद्वाज यांनी आपल्या कार्यात या विषयाची उपयोजिता सिद्ध केली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘क्रीडा मानसशास्त्र’ या विषयात काम करत असताना त्यांनी अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. प्रबोधन आणि समुपदेशन यांच्या माध्यमातून त्यांनी खेळाडूंचा यशस्वीतेचा आणि यशप्राप्तीपश्चात समृद्ध वर्तनाचा मार्ग प्रशस्त केला आहे.



अतिचंचलता असलेल्या एका विद्यार्थ्याला टेबल टेनिस या खेळाची जोड देत त्याची एकाग्रता साधण्यास त्यांनी मदत केली. त्यामुळे हा विद्यार्थी एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावारूपाला आला आणि अभ्यासक्रमातदेखील अव्वल स्थान त्याने प्राप्त केले.सध्या डॉ. भारद्वाज हे नाशिक येथे ‘बेजॉन देसाई फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, तर ‘जयम फाऊंडेशन’चे संचालक म्हणून कार्य करत आहेत.योगी अरविंदो आणि माताजी यांनी जी शैक्षणिक विचारप्रणाली मांडली, त्यानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण, पालकांचे प्रबोधन, अध्ययन पद्धती यावर ‘बेजॉन देसाई फाऊंडेशन’च्या माध्यमातून डॉ. भारद्वाज कार्य करत आहेत.


आरोग्यदृष्ट्या शिक्षक हा सुदृढ असावा. त्याने भावनांचा समतोल कसा राखावा, यासाठी शिक्षकांच्या मानसिकतेवर डॉ. भारद्वाज कार्य करत आहेत. शिक्षकांच्या आंतरमनावर काम करत असताना आनंददायी शाळा निर्माण करण्यासाठी मागील पाच वर्षांपासून ते कार्यरत असून नाशिक येथील ‘मानवधन शिक्षण संस्था’, ‘डांग सेवामंडळ शिक्षण संस्था’, शहापूर येथील ‘आत्मा मलिक संस्था’, वनवासी भागातील शाळेतील मुख्याध्यापक आदींसाठी कार्य करत त्यांनी आपल्या कार्याला मूर्त रूप दिले आहेतसेच, सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना कौशल्याधारित मोफत शिक्षण उपलब्ध करून देत, विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘स्किल डेव्हलपमेंट’च्या माध्यमातून कार्य केले जात आहे.




विविध वनवासी पाड्यांवर प्रत्यक्ष जात तेथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. आजवर साडेतीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, ‘जयम फाऊंडेशन’च्या माध्यमातून आरोग्य आणि पर्यावरणक्षेत्रात कार्य केले जात आहे. १८ गावांना ‘आर.ओ. प्रकल्प’ देण्यात आले आहेत, तर त्र्यंबकेश्वर येथील रोहिले गावात १७५ एकर जागेवर वनीकरण करण्यात आले आहे. तसेच जाखोरी येथे १९ एकर जागेत फळ लागवड करण्यात येत आहे. आपल्या या कार्यात डॉ. सारंग इंगळे आणि मनोज टिबरेवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन डॉ. भारद्वाज यांना लाभत आहेसामाजिक दायित्व याच भावनेतून मूलत: प्राध्यापक असलेले डॉ. भारद्वाज यांच्या विविध क्षेत्रातील या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!


 
@@AUTHORINFO_V1@@