पुणे : सध्या राजगडावर रोपवे बांधण्याच्या सरकारच्या निर्णयावरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. इतिहासप्रेमी संघटनांनी यावर तीव्र विरोध दर्शवला आहे. यावरून आता पुण्यातील एका ८ वर्षीय इतिहासप्रेमी चिमुकलीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने 'राजगडावर रोपवे बांधू नका.' अशी मागणी केली आहे. हे पत्र सोशल मिडीयावर तुफान वायरल होत आहे.
राज्य सरकारने राजगडावर रोपवे तयार करण्याचा निर्णय घेतला. यावरून पुण्यातील साईषा धुमाळ या ८ वर्षांच्या ट्रेकिंगप्रेमी चिमुकलीने रोपवे आल्यास काय गमावू याचे जणू एक विश्लेषणच केले आहे. तिने पत्रात म्हंटले आहे की, "माननीय आदित्यदादा यांना पत्रास कारण की, राजगडावर रोपवे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरे असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका प्लीज. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो." असे तिने पत्रात म्हंटले आहे.