केल्याने होत आहे रे!

    21-Jun-2021
Total Views |

uncertaimity_1  



अनिश्चित परिस्थिती जेव्हा मानवाला जगण्यासाठीच आव्हान करते तेव्हा खर्‍या अर्थाने या पृथ्वीतलावर जगण्याला एक नवीन दिशा मिळते. कधी ती श्रीकृष्णाने रचलेली भगवद्गीता असते, तर कधी ती मानवनिर्मित जीवन संंरक्षित करणारी लस असते. याचाच स्पष्ट अर्थ असा की, अनिश्चितता जितकी वाटते तितकी नकारात्मक नाही.


‘अनिश्चितता’ या संकल्पनेभोवती संशय आणि असुरक्षितता यांचे एक अप्रिय वलय आहे. अनिश्चिततेची प्रचिती काही लोकांच्या आयुष्यात असहाय्य करणारी व चिंताजनक ठरली आहे. या कारणाने मानवी मन या अनिश्चित वातावरणाला कसे संपवायचे, याची योजना बनवत असते. अनिश्चिततेवर मात मिळविण्यासाठी लोक काय काय प्रयत्न करत असतात. नवनवीन सिद्धांत शोधत राहतात. सत्य परिस्थितीचा आढावा घेतात. एकंदरीत अज्ञाताकडून ज्ञाताकडे कसे जाता येईल किंवा जग गूढ किंवा अनाकलनीय न राहता त्यातून निश्चित सत्य आणि वास्तविक गोष्टींची उकल कशी करता येईल, याचा शोध घेत असतात.अनिश्चित वातावरणामुळे ‘कोविड’च्या महामारीसारख्या परिस्थितीत जग संभ्रमित झाले आहे. अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. पण, तरीही अनिश्चित वातावरणाचा आपण विध्वंसक वा संहारकपणाचा शिक्का लावू शकत नाही. या अस्थिर परिस्थितीला कसे नियंत्रित करता येईल, या प्रयत्नांत काही उत्तम गोष्टी या पृथ्वीतलावर घडल्या आहेत. शास्त्रीय ज्ञानात भरघोस वाढ होत आहे. तांत्रिक विकासामुळे अनेक जणांनी नवीन मार्ग चोखंदळेले आहेत. या काळात लोकांची जितकी दयनीय अवस्था झाली, त्याहीपेक्षा अधिक वेगाने जीवन-मृत्यूच्या या महायुद्धात जगायचे नवनवीन मार्ग शोधले गेले. मानवी नवनिर्मिती आणि सृजनक्षमता या काळातच आसमंतात झेपावताना दिसत आहे, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. यातील प्रकर्षाने उठून दिसणारी अचंबित कामगिरी म्हणजे काही महिन्यातच ‘कोविड’पासून संरक्षण देणार्‍या तीन प्रभावी ‘व्हॅक्सिन’ विकसित केल्या गेल्या. ज्या वेगाने शास्त्रज्ञांनी त्या विकसित केल्या, ज्या कुशलतेने त्या ‘व्हॅक्सिन’ प्रयोगात आणल्या आणि कित्येक लाख लोकांना त्या दिल्या, तो झपाटा आश्चर्यचकित करणारा आहे. जणू काल सगळं जग कसं अघळपघळ, दिशाहीन, भाकड आणि बापुडे वाटत होतं, तेच आज सुनिश्चित, खात्रीचं आणि आशादायक वाटत आहे. काही महिन्यांच्या कालावधीत कालचं लसी निर्माण करायचं तंत्रज्ञान आणि शास्त्रीय तत्त्वं, ऐतिहासिक कथा झाल्यात. नवीन तंत्रज्ञानाचा जबर विकास घडला, तो या कठीण आणि हताश काळात, हे शास्त्र हजारो मैलांच्या वेगाने पुढे आले. अनिश्चित परिस्थिती जेव्हा मानवाला जगण्यासाठीच आव्हान करते तेव्हा खर्‍या अर्थाने या पृथ्वीतलावर जगण्याला एक नवीन दिशा मिळते. कधी ती श्रीकृष्णाने रचलेली भगवद्गीता असते, तर कधी ती मानवनिर्मित जीवन संंरक्षित करणारी लस असते. याचाच स्पष्ट अर्थ असा की, अनिश्चितता जितकी वाटते तितकी नकारात्मक नाही. आपण सारेच जगण्यासाठी धडपड करतो. नवीन वाटा शोधतो. नवीन ज्ञान मिळवितो. नवनिर्मितीचा आनंद घेतो.


जगात काहीजण नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास असमर्थ ठरतात. तेव्हा आधीच तणावपूर्ण असलेले वातावरण अधिक कठीण आणि असाहाय्य होते. काही माणसं प्रखर तणावाचा आघात त्यांच्या आयुष्यावर झाला की, बधिर होतात. सुन्न होतात. त्या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेली मन:शांती आणि स्थैर्य त्यास मिळवता येत नाही. त्यामुळे त्यांना संकटमय परिस्थितीतून झुंझण्यासाठी जरुरी असणारे विचार आणि कृती करता येत नाही. नकारात्मकता अधिक बळावते आणि आता आपण असे अगतिक झालेलो आहोत, परिस्थितीचे गुलाम झालेलो आहोत, आता यातून आपण बाहेर पडणारच नाही, असा हताश सूर ते आळवत बसतात. हे विचारांचे दुष्टचक्र कुठल्याही भयानक वास्तवापेक्षा अधिक घातक आहे. असो.जगात सगळेच सारखे नसतात. सकारात्मक प्रवृत्तीचे लोक असतात, तसेच नैराश्यपूर्ण लोकही असतात. अस्थिर जगण्यात दिवस घालवताना संयम आणि चिकाटी असण्याची गरज आहे. आज महामारीच्या दुर्धर परिस्थितीत कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या. आर्थिक अडचणी समोर ठाकल्या आहेत. भविष्याची चिंता सतावते आहे. काही जणांचं दु:ख अमाप आहे. किती काळ आणि कुठवर हे सहन करायचं, या प्रश्नाचं उत्तर कठीण आहे. अशा परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी एक वास्तववादी ‘टाईम फ्रेम’ सेट करायला लागेल. तोपर्यंत आपल्या नकारार्थी विचारांना बासनात टाकायला लागेल.या जगात वेगळं असं आपलं आशावादी जग निर्माण करायला लागेल, आपल्या गाठीशी काय आहे, याचा आढावा घ्यायला लागेल. आपली जाण धारदार करायला लागेल. हुरुपाचा खोल श्वास घ्यायची सवय लावायला लागेल. आपली आशादायक संवेदना आता या घडीला आवश्यक आहे. तिला जागवायला लागेल. एखाद्या आवडत्या प्रक्रियेत किंवा छंदात मन रमवले, तर हे शक्य आहे. त्यामुळे भयाण विचारांपासून मन विचलित होईल आणि विधायक विचारात गुंतले जाईल.


मनात नकारार्थी भाव आले. हताश वाटले, तर ते सामान्य आहे, पण आपली निद्रित झालेली उमेद आणि जगण्याची ऊर्जा जागवली पाहिजे. माणसाला अनिश्चित परिस्थितीत आणि त्यावरील आपल्या प्रक्रियेत वाहत जाण्याची सवय मोडली पाहिजे. कारण, ही सवय निष्क्रिय आहे. ती आपले नैतिक खच्चीकरण करत जाते. जगात सद्यस्थिती अशीच आहे, सुस्त आहे, थंड आहे, तरीही या स्थितीत काहीजण आपली बुद्धी आणि क्षमतेच्या जोरावर आम डावपेच वापरत जीवनात ऊर्जा आणि कृतिशीलता आणत आहेत. आपल्याला या अपरिहार्य परिस्थितीतून जगाबरोबर प्रवास करण्यावाचून पर्याय उरला नाही आहे, याची जाणीव या लोकांना झाली आहे. हे एकदा उमगलं की, जाणता माणूस काय करणार? हा प्रवास कितीही गुंतागुंतीचा आणि कठीण असला तरी हा कसा सुसह्य आणि प्रसन्न करायचा यावर लक्ष केंद्रित करणार. या प्रक्रियेत मन मुक्त असेल, तर ते आपली संपूर्ण ऊर्जा आपल्या विचारांना, स्वप्नांना पूर्ततेकडे नेणार्‍या मार्गावर वळवणार. यामुळे आपली वृत्ती लवचिक बनते. आतापर्यंत भीतिदायक आणि अशक्य वाटणारे अस्थिर जग आता एक आव्हान वाटायला लागते. ते आव्हान खांद्यांवर पेलावेसे वाटते, तसेही पाहिले तर जग काही आपल्या पूर्ण नियंत्रणाखाली कधीच नव्हते, आजही नाही. कुणाला तसे वाटत असेल, तर तो निव्वळ भ्रम आहे. या घडीला मला माझं जीवन सुसह्य करण्यासाठी आज काय करता येणे शक्य आहे हा एकमेव विचार समर्पक, सृजनशील आणि व्यावहारिक आहे. ‘केल्याने होत आहे रे!’
 

- डॉ. शुभांगी पारकर