समत्वं योग उच्यते

    20-Jun-2021
Total Views |


yogsadhna_1  H

 

रोजच्या जीवनात आपण कितीही व्यस्त असलो, तरी आसन, प्राणायम, मन:शांतीसाठी ध्यान यांना वेळ दिलाच पाहिजे. कारण, रोजच्या योगसाधनेने कार्यकुशलतेबरोबर कामाचा दर्जाही वाढू लागतो. म्हणून योग हा रोजच्या दैनंदिनीतील एक अविभाज्य घटक असणे अत्यावश्यक आहे.

आज आपण सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जून २०१५ पासून भारताबरोबरच जगातील बरेच लहान-मोठे देश हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करु लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगच कोरोना या महासंकटाचा सामना करत आहे. या महामारीत प्रत्येक व्यक्तीची कोणत्या न कोणत्या प्रकारे हानी झाली. मनुष्यप्राणी या संकटासमोर जरी खचल्यासारखा वाटत असला, तरी तो त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतच आहे. या संकटकाळात योगसाधनेने बर्‍याच जणांना अगदी मृत्यूच्या दाढेतूनही खेचून आणले, तसेच नियमित साधना करणार्‍या साधकांना यापासून दूरच ठेवले.


आज ‘योग’ या विषयाशी नव्हे, या जीवनपद्धतीशी संपूर्ण जगाची तोंडओळख झाली आहे. आपण भारतीय याबाबतीत अतिशय भाग्यशाली आहोत. कारण, आपल्या देशाला योगाचा पाच-साडेपाच हजार वर्षांचा अमूल्य वारसा लाभला आहे. आज आपण जरी योगाकडे एक स्वतंत्र विषय म्हणून बघत असलो, तरी योग ही आपल्या पूर्वजांची कैक वर्षांची जीवनशैली होती. सूर्यनमस्काराने त्यांचा दिवस सुरु होऊन आसन, प्राणायम करत दिवस व्यतित होत असे आणि ध्यानधारणेने त्याची समाप्ती होत असे. पण, काळानुरुप या शैलीत बदल होत गेला. माणसाचे राहणीमान, व्यवसाय संस्कृती सर्वांमध्ये बदल होत आपण आजच्या स्थितीला येऊन पोहोचलो.
 

या वर्षीच्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’ची संकल्पना ही 'Yoga for well being' अर्थात ‘कल्याणासाठी योग’ अशी आहे. सद्यपरिस्थितीत प्रत्येकालाच शारीरिक, मानसिक आत्मबलाची आवश्यकता आहे. या सर्वांसाठी बहुआयामी अत्युत्तम सिद्धी म्हणजेच योग. भारतात तसेच बर्‍याच देशांत योग ही उपचार पद्धती म्हणूनही विकसित होऊन, ती त्याप्रकारे वापरली जाऊ लागली आहे. याला काही मर्यादा असल्या तरी फायदे मात्र अनेक आहेत. या पद्धतीकडे एक पूरक उपचार पद्धती म्हणून अतिशय सन्मानाने बघितले जाते. तसेच याच्या संवर्धनार्थ प्रयत्नदेखील केले जात आहे.
 

योग’ या शब्दाची उत्पत्ती ‘युज्’ या धातूवरुन झाली आहे. ज्याचा अर्थ आहे ‘जोडणे.’ योगही अशी किमया आहे, ज्याने माणसाचे शरीर आणि मन जोडले जाते. जीवात्म्याचे सूर परमात्याशी जोडले जाऊ लागतात. महर्षी पतंजलींनी जो योग सांगितला आहे, त्यात हेच अभिप्रेत आहे. पतंजलींनी सांगितलेल्या योगसाधनेची अष्टांगे आहेत.) यम ) नियम ) आसन ) प्राणायाम ) प्रत्याहार ) धारणा ) ध्यान आणि ) समाधी. पातंजल योगसूत्रानुसार एका योगसाधकाचे जीवनाचे अंतिम लक्ष्य हे समाधी असते. अर्थात, जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन होय.
 

आपल्यासारखे सामान्यजन जरी कट्टर योगासारखी कडक योगोपासना करू शकत नसलो, तरी आपल्या परीने जो काही योगाभ्यास आपण आपल्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक कुवतीनुसार करतो, त्यानेही आपल्याला असंख्य लाभ मिळतात. आजवर योगाची सामान्य माणसाला असलेली ओळख म्हणजे आसन, प्राणायाम आणि ध्यान इतकीच. पण, योग या सर्वापलीकडे जाऊन एक साधना आहे. हे आपणांस ज्ञात आहे की, आसनांमुळे आपल्याला शारीरिक तथा मानसिक स्थिरता, स्वास्थ्य लाभते. तसेच शारीरिक लवचिकता, चपळता अनुभवायला मिळते. प्राणायामामुळे मानसिक चंचलता, अस्थिरता कमी होऊन मनाला सुदृढता, सबलता लाभते. ध्यानामुळे मन शांत होऊ लागते. मनाच्या स्थिरतेला पुष्टी मिळू लागते. या सगळ्यांचा सामान्य माणसाला त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या वाढीबरोबरच भौतिक जीवनात सुख, स्वास्थ्य, संपन्नता तथा समाधान मिळवण्यास हातभारच लागतो.


प्राणायामाचे अनेक फायदे आहेत. नित्य योगसाधना करणार्‍या प्रत्येक साधकाला ते अनुभवताही येतात. आज आपण प्राणायामाचे नाक, कान, घसा यांच्या तक्रारींवर होणारे फायदे बघणार आहोत. योग साहित्यात प्राणायामाचे बरेच प्रकार सांगितले आहेत. पण, असे काही प्राणायामांचे प्रकार आहेत, ज्यांचा आपणांस नाक, कान, घसा यांच्या तक्रारींपासून आराम मिळवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. बर्‍याचशा घशांच्या दुर्धर आजारांसाठी प्राणायामांचा पूरक उपचार म्हणून आधार घेतला जात असून जगभर प्राणायामांच्या उपयुक्ततेवर संशोधनदेखील सुरु आहे.
 

प्राणायाम दुर्धर आजारांशी निगडित परिणाम कमी करू शकतात आणि काही आजार टाळूही शकतात. शिक्षक, गायक तसेच मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, विक्रेते यांसारख्यांना त्यांच्या व्यवसायाशी निगडित परिणाम, जसे- आवाज सतत बसणे, घोगरा होणे किंवा पूर्ण आवाज जाणे अथवा मोठ्याने बोलता न येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. पण, काही प्राणायाम जसे- ‘उज्जयी’, ’भ्रामरी’, ’सूर्यभेदन’, ’भस्त्रिका’ इत्यादींच्या सरावाने हा त्रास कमी किंवा पूर्ण नाहीसा करता येऊ शकतो. यासाठी एका अनुभवी योगशिक्षकाच्या योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.
 

या सर्वांना त्यांच्या आवाजाचा सर्वात जास्त वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या गलग्रंथी, स्वरग्रंथींवर ताण येऊन आवाज बदलू लागतो. घशाला सूज येऊन घसा कोरडा पडू लागतो. सारखा खोकला येऊ लागतो. थोडा फार असाच त्रास बहुतेकांना साधारण वयाच्या पन्नाशीनंतर जाणवू लागतो. घशांच्या ग्रंथी आकुंचन पावू लागतात. त्यामुळे आवाज बदलून घोगरा किंवा जाडा होतो. काहीवेळा बोलता बोलता एकदम आवाज बदलतो किंवा घशातून आवाजच निघत नाही. जेवण गिळण्यासाठी त्रास होतो, ठसका लागतो.
 

याप्रमाणेच ज्या व्यक्तींना Sinusitis (सर्व प्रकारचे) त्रास असतो, त्यांच्या नाकाच्या आजूबाजूला असणार्‍या पोकळ्यांमध्ये पाणी साठते. त्यामुळे त्यांच्या पोकळ्यांना सूज येते. हे एक कारण झाले. पण, त्याला इतरही कारणे आहेत. जसे- हवेतील प्रदूषण, अ‍ॅलर्जी तसेच विषाणूंचा प्रादुर्भाव इ. त्यामुळेही सूज येते. यामुळे तीव्र डोकेदुखी, सतत नाक वाहणे, नाक चोंदणे, घशात खाज येणे, घशाची आग होणे, चेहर्‍यावर सूज येणे, सकाळी उठल्या उठल्या श्वास घेण्यास त्रास असे अनेक अपाय होऊ शकतात. अशा अवस्थेत ‘भस्त्रिका’, ‘भ्रामरी’, ’उज्जयी’, ’अग्निसार’, ’अनुलोम’, ’विलोम’, ’सूर्यभेदन’ या प्राणायामांबरोबरच ‘जलनेती’, ’सूत्रनेती’, ’वमनधौती’, ‘कपालभाती’सारख्या षट्क्रियांचा अभ्यास उपयोगी ठरू शकतो. काही आसने जसे- ‘भुजंगासन’, ’शलभासन’ इत्यादींचा नियमित सरावही लाभदायी ठरू शकतो.


या आणि अशा अनेक व्याधी ज्या प्रदूषण किंवा अ‍ॅलर्जीमुळे होतात, त्यांना तोंड देण्यासाठी प्राणायाम हे रामबाण उपाय ठरू शकतात. यादृष्टीने सर्वत्र चाललेले संशोधनही प्राणायाम तथा षट्क्रियांच्या सरावाला प्राधान्य देतात. अशा आजारांमध्ये मन शांत ठेवणे खूप आवश्यक असते आणि ओंकार साधना ही त्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. आबालवृद्ध, स्थूल व्यक्ती सर्वांना प्राणायामाचे फायदे नियमित अभ्यासाने अनुभवता येऊ शकतात. पण, यात नियमितपणा ही अतिमहत्त्वाचा आहे.
या सर्व अभ्यासाबरोबरच शुद्ध ताजा सात्त्विक तंतुमय आहार, विश्रांती याचे वेळापत्रक पाळणे जरुरी आहे. आपण करत असलेल्या योगाभ्यासाविषयी पूर्णत: सकारात्मकता यासाठी खूप उपयोगी ठरु शकते. या सर्वांबरोबरच पंचमहाभूतांचे आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वही जाणले, तर योगसाधकाचे श्वसन, पचन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, प्रजनन, अस्थींचे, स्नायूंचे, मज्जांचे आरोग्यही सुधारते.


म्हणूनच आपण आपल्याला मिळालेल्या वारशाचा पूर्ण फायदा करुन घेतला पाहिजे. रोजच्या जीवनात आपण कितीही व्यस्त असलो, तरी आसन, प्राणायाम, मन:शांतीसाठी ध्यान यांना वेळ दिलाच पाहिजे. जसे विज्ञान प्रगती करते आहे, तसे माणसाचे जीवन अधिकाधिक स्पर्धात्मक तणावग्रस्त होऊ लागले आहे. या सगळ्याशी जुळवून घेण्यास आणि या स्पर्धेत टिकून राहण्यास योगसाधना अधिक सक्षमता, सबलता प्रदान करु शकते. मन एकाग्र करण्याची क्षमता वाढते, तसेच कोणताही ताणाचे संतुलन राखता येते.रोजच्या योगसाधनेने कार्यकुशलतेबरोबर कामाचा दर्जाही वाढू लागतो. म्हणून योग हा रोजच्या दैनंदिनीतील एक अविभाज्य घटक असणे अत्यावश्यक आहे. म्हणून भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे -‘समत्वं योग उच्यते।

- राजश्री शिंदे