इतिहासाचा वाटसरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2021   
Total Views |


manas 3_1  H x
 
 
‘कोकण इतिहास परिषदे’चे कल्याण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक प्रा. जितेंद्र भामरे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाविषयी...
 
 
जितेंद्र यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातला. परंतु, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण बदलापूर, पडघा, टिटवाळा, आंबिवली, कल्याण या परिसरातच झाली. जितेंद्र यांचे वडील माध्यामिक शाळेत शिक्षक असल्यामुळे त्यांचा पगारही बेताचाच होता. त्यामुळे आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. त्यात वडिलांच्या वारंवार होणार्‍या बदलीचा परिणाम जितेंद्र यांच्या शालेय शिक्षणावरही झाला. जितेंद्र हे नववीत असताना नापास झाले. दहावीची परीक्षासुद्धा त्यांनी कशीबशी उत्तीर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी बिर्ला महाविद्यालयात प्रवेश घेतला. अकरावीपासूनच आवडते विषय मिळाल्याने शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची प्रथम श्रेणी कधी सुटली नाही.काव्यलेखनाची प्रेरणाही त्यांना महाविद्यालयीन जीवनातच मिळाली. एमएला त्यांनी ‘इतिहास’ विषयाची निवड केली. ते १९९७ पासून कोकण ज्ञानपीठ कर्जत वरिष्ठ महाविद्यालयात नोकरी करीत आहेत. महाराष्ट्रात त्यांना अनेक जण वक्ते, व्याख्याते, कवी, लेखक, इतिहास संशोधक, सूत्रसंचालक म्हणून ओळखतात. आपल्या नावापुढे एवढी भूषणं कधी लागतील, असं आयुष्यात कधीही वाटलं नसल्याचे जितेंद्र सांगतात.
 
 
जितेंद्र भामरे हे कल्याणमध्ये १९९५ पासून खर्‍या अर्थाने कार्यरत झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळेल का, हा प्रश्न त्यांच्या समोर होताच. पण, नोकरी मिळविण्यासाठी लाच द्यायची नाही, एवढे त्यांनी मनाशी पक्के केले होते. जीवनमूल्यांशी कुठलीही तडजोड न करता नोकरी मिळेपर्यंत त्यांनी दूधविक्री, हॉटेल चालविणे, स्टेशनरीचे दुकान चालविणे आणि खासगी क्लासेस अशी कष्टाची अनेक कामं केली. पण, योगायोगाने त्यांना नोकरी मिळण्यात कोणतीच अडचण आली नाही. जीवनमूल्ये जपत त्यांनी नोकरीसुद्धा मिळविली. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच ‘भारतीय विद्यार्थी सेने’चे त्यांनी काम सुरू केले होते. या कामामुळेच ते राजकारणाकडे कधी ओढले गेले, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. अनेक दिग्गज व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला. सूत्रसंचालन हादेखील जितेंद्र यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. आजवर त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले आहे. यानिमित्ताने त्यांच्यात दडलेला उत्तम वक्ताही श्रोत्यांना समजला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करण्याची त्यांना संधीही मिळाली. त्या संधीचेही जितेंद्र यांनी सोनेच केले. प्रसिद्ध इतिहास संशोधिका डॉ. वर्षा शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहासाच्या विविध विषयांवर त्यांनी १५ पुस्तके लिहिली आहेत. विशेष म्हणजे, त्यांची ही पुस्तके पदवीच्या पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षाच्या अभ्यास करणार्‍या कोकणातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्याही पसंतीस उतरली. ही पुस्तके त्यांनी शेठ प्रकाशन, मुंबई यांच्यासाठी लिहिली होती.
 
 
डॉ. श्रीनिवास साठे चालवित असलेल्या ‘कल्याण इतिहास मंडळा’चा चिटणीस म्हणून १९९० पासून त्यांनी काम पाहण्यास सुरूवात केली. स्थानिक इतिहासावर त्यांचेही काम सुरू होते. संपूर्ण कोकणासाठी डॉ. दाऊद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोकण इतिहास परिषदे’ची स्थापना जितेंद्र यांनी केली. विविध ठिकाणी परिषदेच्या शाखाही सुरू केल्या. पुढे ‘कल्याण इतिहास मंडळा’चे ‘कोकण इतिहास परिषद, कल्याण शाखा’ असे नामकरण करुन त्यांनी पहिली शाखा कल्याणमध्ये सुरू केली. ‘कोकण इतिहास परिषदे’चे संस्थापक-सदस्य असलेले जितेंद्र आता कल्याण शाखेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.
 
 
‘कोकण इतिहास परिषदे’च्या माध्यमातून कल्याणचा स्थानिक इतिहास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी ‘कल्याण हेरिटेज वॉक’ हा अभिनव उपक्रमदेखील त्यांनी सुरू केला. या उपक्रमांतर्गत जुन्या कल्याणच्या इतिहासाबद्दल, विविझ ठिकाणांबद्दल परिषदेचे सदस्य संपूर्ण माहिती देतात. त्यामुळे ऐतिहासिक कल्याणची माहिती विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते, शिवाय नागरिकांना आपण ज्या शहरात वास्तव्यास आहोत, त्याचा संपूर्ण इतिहासही लक्षात येतो.
 
 
प्रा. जितेंद्र भामरे यांची २००५ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी निवड झाली होती. त्यांनी कडोंमपा शिक्षण मंडळाचे सदस्यपदही भूषविले. या काळात कल्याणमधील साहित्य परिषद, नाट्य परिषद, सार्वजनिक वाचनालय, स्वागतयात्रा समिती या संस्थांमध्ये देखील त्यांनी काम सुरू केले. १६० वर्षं जुने असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे ते पदाधिकारी आहेत. या सार्वजनिक वाचनालयाचा इतिहास ‘ग्रंथकल्याणी’ या ग्रंथाच्या रुपात लिहिण्याची संधीही त्यांना मिळाली. त्यांनी नुकताच ‘चिंतामण विनायक उर्फ भारताचार्य वैद्य यांचे ऐतिहासिक लेखन व संशोधन : एक अभ्यास’ या विषयावर प्रबंध मुंबई विद्यापीठात सादर केला आहे. वैद्य या इतिहासात हरविलेल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करत असतात. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आणि कल्याणच्या रहिवासी असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावाचे टपाल तिकीट केंद्र सरकारने सुरु करावे, यासाठी त्यांनी राज्यपालांची देखील भेट घेतली आहे. प्रा. जितेंद्र भामरे यांच्या कामाची दखल अनेक संस्थांनी घेऊन, त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तेव्हा, प्रा. जितेंद्र भामरे यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून हार्दिक शुभेच्छा!

 
 
@@AUTHORINFO_V1@@