सातारा : मध्य रेल्वेत प्रवास करणाऱ्या महिलेला प्रवासादरम्यान चोरट्याशी झालेल्या झटापटीत जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असतानाच आता साताऱ्यातील लोणंद स्थानकादरम्यान एक्सप्रेसमध्ये 8वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे, लॉकडाऊन काळात रेल्वे प्रवासादरम्यान महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आता महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील 'रेल्वेचा प्रवास महिलांसाठी जिवघेणा ठरतो आहे' अशी चिंता व्यक्त केली आहे.
अतिशय धक्कादायक! रेल्वेचा प्रवास महिलांसाठी जिवघेणा ठरतोयं..
मध्यरेल्वे प्रवासात चोराने धक्का मारून विद्या पाटील यांचा जीव घेतला तर साताऱ्यात एक्सप्रेसमध्ये 8वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला तिने आरडाओरड करताच मुलीला ट्रेनमधून फेकलं नशिबाने ती वाचली (१/२) @RailMinIndiapic.twitter.com/HJSp9grogD
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे की, "रेल्वेचा प्रवास महिलांसाठी जीवघेणा ठरतो आहे. मध्यरेल्वे प्रवासात चोराने धक्का मारून विद्या पाटील यांचा जीव घेतला तर साताऱ्यात एक्सप्रेसमध्ये ८ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला तिने आरडाओरड करताच मुलीला ट्रेनमधून फेकले. मात्र, नशिबाने ती वाचली. या घटना पाहता रेल्वेतील महिलासुरक्षेच्या दृष्टीने अधिक कठोर पावले उचलणे गरजेचे आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले.
"लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये सशस्त्र पोलीस तसेच लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात सुरक्षारक्षक तैनात करण्याचे आदेश असतांना या दोन घटनात ते कुठे होते?" असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, "पाटील परीवार लोणंद पिडीता यांना रेल्वेने तात्काळ अर्थसहाय्य करावे." अशी मागणी त्यांनी केली.