डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमती शंभर रूपयांच्या पार गेल्या आहेत. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन छेडण्यात आले होते. पण या दरवाढीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे.
हे आंदोलन स्थानिक कार्यकत्यांनी अभ्यास न करता घेण्यात आले होते हे दिसून येत आहे. केंद्राकडून पुरविल्या जाणाऱ्या पेट्रोलवर राज्य सरकारकडून २६ टक्के वँट आणि दहा टक्के अधिभार लावला जातो. आता पेट्रोलच्या किंमती भडकलेल्या असताना राज्य सरकारने हा अधिभार कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी ही रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.
पेट्रोलच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. या पेट्रोलच्या किंमतीने आता शंभर रूपयाची मर्यादा ओलांडली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच भर्दुड पडला आहे. पेट्रोलच्या किंमती वाढत असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाला प्रतिउत्तर देत चव्हाण यांनी सांगितले, केंद्र सरकारकडून पुरविल्या जाणाऱ्या पेट्रोलच्या किंमतीवर राज्य सरकारकडून २६ टक्के वँट आणि १० टक्के अधिभार असा ३६ टक्के कर आकारला जात असल्याने पेट्रोलच्या किंमती त्या प्रमाणात वाढतात.
भाजप सरकारच्या काळात पेट्रोलच्या किंमती वाढत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिभार निम्म्याने कमी करत नागरिकांना दिलासा दिला होता. मात्र आता सरकारकडून कोणताही निणर्य न घेता नागरिकांना दिलासा दिला जात नसल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. तसेच सरकारला मागील वर्षभरात पेट्रोलच्या अधिभारातून १६ कोटीचा लाभ झाला असून यातून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा दिल्यास शासनाला फरक पडणार नसल्याचे ही त्यांनी सांगितले.