नद्या आणि धरणांतून चीनचे भारतविरोधी जलयुद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2021   
Total Views |

jalyuddha_1  H



धरणांमध्ये साठवलेल्या प्रचंड जलसाठ्यांचा वापर चीन भारताविरोधात एक शस्त्र म्हणून कायमच करत आला आहे. त्यामुळे चीनविरोधातले हे जलयुद्ध जिंकण्यासाठी भारताने काय केले पाहिजे, यासंदर्भात या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा.

दि. १५ जून, २०२१. गलवान लढाईच्या एक वर्षानंतर सध्या भारत-चीन सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. मात्र, चीन भारताच्या विरुद्ध ३६५ दिवस ‘हायब्रिड वॉर’ किंवा ‘अनरीस्ट्रिक्टटेड वॉर’ किंवा कुठलेही नियम नसलेले युद्ध लढत आहे. त्यापैकीच एक प्रकार भारताविरोधात जलयुद्ध. चीनने आतापर्यंत ब्रह्मपुत्रा नदीवर सहा धरणे बांधलेली आहेत. याशिवाय २८ अजून नवीन धरणे बांधण्याकरिता प्रस्ताव चिनी सरकार समोर आहे. आता आपण माहिती करुन घेऊया ‘मेडोंग’ या चीनमधील एका महाकाय धरणाविषयी. चीनचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते यांनी ३ डिसेंबर, २०२०ला म्हटले होते की, “ब्रह्मपुत्रावर मोठे धरण बांधणे हा आमचा हक्क आहे.” ब्रह्मपुत्रा नदीवर जर मोठे धरण बांधले, तर त्यामुळे ब्रह्मपुत्रेत येणारे पाणी चीनला नियंत्रित करता येईल.” खरंतर चीन पाण्याचा वापर एक शस्त्र म्हणून अनेक वर्षे करत आहे. गेल्यावर्षी जूनमध्येच गलवान नदीमध्ये झालेल्या संघर्षामध्ये चीनने नदीचे पाणी हे काही काळाकरिता थांबवले होते. ‘ग्रेट बेंड’ नावाच्या एका शिखराजवळ ब्रह्मपुत्रा नदी वळण घेते आणि भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते.


तिथे नैसर्गिकरीत्या एक मोठी घळ निर्माण होते. ही घळ ३२० किलोमीटर लांब आणि पाच किलोमीटर रुंद इतकी विस्तृत आहे आणि तिथेच जगातील सर्वात मोठे मेडोंग धरण चीनकडून बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हे धरण भारतीय सीमेपासून केवळ ३३० किलोमीटर दूर आहे. परंतु, एवढे प्रचंड धरण जर बांधले गेले, तर यामुळे ईशान्य भारताची अन्नसुरक्षा आणि जलसुरक्षा नक्कीच धोक्यात येईल. याशिवाय या धरणांमध्ये प्रचंड पाणी साठवले जाईल, ज्याचा वापर चीन एक शस्त्र म्हणून भारताविरोधात करू शकतो. या लेखामध्ये या प्रचंड धरणामध्ये साठलेल्या पाण्याचा चीन एक कसा शस्त्र म्हणून वापर करू शकतो, यावर आपण लक्ष केंद्रित करूया. चीन या आधीसुद्धा हे धरण शस्त्र म्हणून कसे वापरत होता, याची माहिती भारतीयांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे चीनविरोधातले हे जलयुद्ध जिंकण्यासाठी भारताने काय केले पाहिजे, यावर आपण विचार करू.


चीनचे भारताविरुद्ध जलयुद्ध



उदाहरण क्रमांक एक. सतलज नदी ही सिंधू नदीची एक उपनदी. ती तिबेटमधून हिमाचल प्रदेशच्या किनवट जिल्ह्यामध्ये भारतात प्रवेश करते. दि. १ ऑगस्ट, २००० रोजी दुपारी १.३० वाजता ५० फूट एवढ्या मोठा पाण्याचा लोट अचानक पारी चू या उपनदीतून सतलजमध्ये तिबेटमधून आला. ५.१५ वाजेपर्यंत हे पाणी धरणामध्ये पोहोचले आणि सतलज नदीची पातळी काही क्षणांमध्ये १५ मीटर एवढी वाढली.त्यामुळे किनवट, शिमला मंडी हे जिल्हे जे नदीच्या आजूबाजूला आहेत, तिथे १००हून जास्त नागरिक वाहून गेले. १२० किलोमीटर हिंदुस्थान-तिबेट हा महत्त्वाचा रस्ताही जलप्रवाहात वाहून गेला. या पुराची तीव्रता इतकी प्रचंड होती की, ९८ वेगवेगळ्या प्रकारचे नद्यांवरील पूलदेखील पूर्णपणे वाहून गेले. म्हणजे अचानक आलेल्या या पुरामुळे आपले प्रचंड नुकसान झाले.


उदाहरण क्रमांक दोन. दि. ११ जून, २०००. अरुणाचल प्रदेशात अचानक सियांग नदीची पातळी १०० ते १२० फूट एवढी वरती गेली. त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत एकूण २६ माणसे आणि तीन मोठे पूल वाहून गेले. तसेच या नदीच्या आजूबाजूला असलेल्या चार जिल्ह्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.त्यानंतर ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ म्हणजे ‘इस्रो’च्या उपग्रहांनी जी माहिती समोर आणली, त्यामध्ये असे दिसले की, तिबेटमध्ये प्रचंड मोठे तलाव निर्माण झाले होते आणि अचानक त्या तलावातले पाणी भारतामध्ये सोडण्यात आले आणि हा मोठा पूर भारतामध्ये आला. उदाहरण क्रमांक तीन. २००४ मध्ये पारिचु या सतलज नदीच्या उपनदीवरती एक मोठे तळे/सरोवर/जलाशय निर्माण झाले होते. चीन याविषयी कुठलीही माहिती भारताला देण्याकरिता तयार नव्हता आणि हे पाणी अचानक सोडण्यात आले आणि यामुळे पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशमध्ये मोठे नुकसान झाले.

उदाहरण क्रमांक चार. २०१२ सालीसुद्धा अरुणाचलच्या मैदानी भागात पासीघाट गावात सियांग नदीचे पाणी काही वेळ पूर्णपणे थांबले. त्यानंतर काही वेळातच प्रचंड वेगाने पाणी येऊ लागले. यामुळे पासीघाटमध्ये पाण्याखाली गेले. उदाहरण क्रमांक पाच. २०१७ साली सियांग नदीचे पाणी एकदम काळे झाले आणि दहा इंचाहून जास्त माती नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला दिसून आली. हे पाणी पिण्याच्या किंवा जनावरांनी वापरण्यासाठी योग्य नव्हते. त्यामुळे या भागातील शेतीवरही विपरीत परिणाम झाला. मासेमारीदेखील पूर्णपणे थांबली. त्यावेळी चीनने दावा केला होता की, तिथे झालेल्या भूकंपामुळे हे असे झाले असावे, जे पूर्णपणे असत्य होते.चीनने भारताला ब्रह्मपुत्रा नदीची जलपातळी, जलप्रवाहाविषयी वेळोवेळी माहिती देणे बंधनकारक होते. परंतु, चीनने तसे करणे अनेक वेळा पूर्णपणे थांबवले. असाच प्रकार ज्या वेळेला डोकलाममध्ये चीनची दादागिरी सुरू होती, त्या वेळेही निदर्शनास आला.


महाकाय धरणांचा ईशान्य भारतावर परिणाम


जर ‘ग्रेट बेंड’ या ठिकाणी चीनने जगातले सर्वात महाकाय धरण निर्माण केले, तर त्याचा ईशान्य भारतावर काय परिणाम होईल? काही चिनीप्रेमी सांगण्याचा प्रयत्न करतात, सियांग नदी जी चीनमधून येते, ती ब्रह्मपुत्रेला केवळ ३० टक्के पाणी पुरवते आणि ब्रह्मपुत्रेच्या इतर उपनद्या म्हणजे म्हणजे कामेंग, सुबानसरी, लोहित या ७० टक्के पाणी पुरवतात. याशिवाय अरुणाचलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या नद्यांना पूर येतो. म्हणून काही तथाकथित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ चार टक्के ब्रह्मपुत्रेचे पाणी हे चीनमधून भारतात प्रवेश करते. म्हणून जर ‘ग्रेट बेेंड’ धरण बांधले गेले, तर याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र, ही माहिती अतिशय चुकीची आहे. कारण, पावसाळ्यामध्ये या भागात प्रचंड पावसामुळे कुठलेही धरण या पाण्याला अडवू शकत नाही आणि ते पाणी केवळ वेगाने ब्रह्मपुत्रेत प्रवेश करून बांगलादेशमध्ये जाते आणि तिथेही महापुराची परिस्थिती निर्माण होते. परंतु, ज्या वेळेला पावसाळा संपतो, त्या वेळी पाण्याची खरी गरज असते आणि या वेळेला जर पाणी मिळाले नाही, तर त्याचा एकूणच जनजीवनावर विपरीतक परिणाम जाणवतो. म्हणून चीनने जर नद्यांचे पाणी अडवले, तर पावसाळ्यानंतर भारतात येणार्‍या नद्यांच्या जलपातळीत मोठी कपात होईल आणि भारताची जलसुरक्षाही नक्कीच धोक्यात येईल.


भारताने काय करावे?


अर्थातच भारताने दक्षिण पूर्वेकडील देश आणि बांगलादेशच्या मदतीने चीनने पाणी थांबवण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात या विरोधात दाद मागणे गरजेचे आहे. ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावरती या नदीच्या वरच्या भागातल्या आणि खालच्या भागातल्या देशांचा बरोबरचा अधिकार आहे. याशिवाय हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतही उपस्थित करता येईल. जगातले बरेचसे देश हे चीनला घाबरत असल्यामुळे संयुक्त राष्ट्रात किती देश भारताच्या बाजूने बोलतील, हे सांगता येणे कठीण आहे. म्हणून भारताला स्वतःहून ही लढाई लढावी लागेल.युद्धकाळामध्ये ही धरणे भारतीय लष्कराला ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याकरिता अतिशय चांगली टारगेट होऊ शकतील. परंतु, युद्ध नसेल, त्या वेळेला चीनचे हे जलयुद्ध कसे थांबवायचे, हे भारतासमोर असलेले मोठे आव्हानच आहे. आपण ब्रह्मपुत्रा नदीच्या भारतातील उपनद्यांवर धरणे बांधून बिनपावसाळी काळामध्ये लागणार्‍या पाण्याची गरज काही प्रमाणामध्ये पूर्ण करू शकतो. परंतु, चीनला वटणीवर आणणे, हे ईशान्य भारताच्या जलसुरक्षा आणि अन्नसुरक्षेकरिता तितकेच महत्त्वाचे आहे. त्याकरिता चीन विरुद्ध एकत्रित लढाई लढून भारताच्या सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकदीचा वापर करून चीनला अशी धरणे न बांधण्याकरिता भाग पाडणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@