‘आयसीसीआर’तर्फे भुतानला भगवान बुद्धांची प्रतिमा भेट
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारत आणि भुतान या दोन देशांमधील परस्परसंबंधांना बळकटी देण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात आयसीसीआरतर्फे भुतान सरकारला भगवान गौतम बुद्धांची मूर्ती भेट देण्यात आली. या प्रतिमेमुळे भारत आणि भुतानचे प्राचीन काळापासूनचे संबंध वृद्धिंगत होतील, अशी भावना यावेळी आयसीसीआरचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
बौद्ध गुरू रिंपोचे (गुरू पद्मसंभव) यांनी भारतातून बौद्ध तत्त्वज्ञान भुतानमध्ये नेल्याची मान्यता आहे. गुरू रिंपोचे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयसीसीआरतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुतानचे परराष्ट्र मंत्री तांदी दोरजी, डॉ. विनय सहस्रबुद्धे, भारताच्या भुतानमधील राजदूत रुचिरा कंबोज, आयसीसीआरचे महासंचालक दिनेश पटनाईक यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, भारत आणि भुतान यांच्यामध्ये प्राचीन काळापासूनचे संबंध आहेत. काळाच्या ओघात हे संबंध अधिकच दृढ झाले आहेत. भारत आणि भारतीय नागरिक भुतानला वेगळे मानतच नाहीत. भारत म्हणजे लोकशाहीच्या जीवंतपणाची जागतिक राजधानी आहे, त्याचप्रमाणे भुतान म्हणजे आनंदाचे जागतिक साम्राज्य आहे. त्यामुळे लोकशाही आणि आनंद हे एकमेकांच्या सोबत राहूनच पुढील मार्गक्रमण करतील आणि वसुधैव कुटुंबकम् ही उक्ती साध्य करतील. आयसीसीआरतर्फे भुतानला भेट म्हणून देण्यात आलेली भगवान बुद्धांची मूर्ती हे त्याचेच प्रतिक आहे, असेही डॉ. सहस्रबुद्धे यांनी यावेळी नमूद केले.
भारतीय नागरिक आणि भारत सरकारच्या मनात आमच्याविषयी असलेला स्नेह अतिशय महत्वाचा आहे. आगामी काळात भारत आणि भुतानची मैत्री नवी उंची गाठेल, असा विश्वास भुतानचे परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केला.